दिव्यत्वाची येथे प्रचीती!

169

>> डॉ. विजया वाड

एपीजे अब्दुल कलामांचे अग्निपंख.. नेहमीच अवकाशापल्याडचे शोधणारे.. या पंखांनी नेहमीच शुभंकराचे स्वप्न पाहिले… आणि सत्यात उतरविले..

अर्पण पत्रिकेपासून जे पुस्तक हृदयाचा ताबा घेते, असे प्रत्येक तरुण मुलाच्या संग्रही असावे, असे पुस्तक म्हणजे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक. मूळ इंग्रजी पुस्तक आहे ‘विंग्ज ऑफ फायर’. एका परमसुंदर, परमपवित्र माणसाचा जीवन प्रवास. प्रत्येक वाचकाच्या मनात कोणत्याही वयाच्या टप्प्यावर प्रचंड आशावाद निर्माण करणारा. हे पुस्तक कलाम साहेबांनी आपल्या मातापित्यांच्या स्मृतीस अर्पण केले आहे. ती कविताच आहे हृदयातून उमटलेली.

आपल्या मनोगतात कलाम साहेब म्हणतात, ‘मी जे आयुष्यात काही मिळवले ते त्या जगन्नियंत्याच्या मदतीमुळेच.’ केवढा हा विनम्रभाव. ज्या अद्वितीय असामीने अवकाशयान, क्षेपणास्त्रे तयार केली त्या व्यक्तीची ही भावना पाहून नतमस्तक व्हायला होते. ते देवाचे कौतुक करतात तेव्हा धर्मातीत होतात. ‘‘ही सर्व क्षेपणास्त्रे, अवकाशयाने ही त्याचीच निर्मिती आहे. कलाम नावाच्या लहान माणसाला त्यासाठी ‘त्याने’ निवडले आहे. भारतातील करोडो लोकांना असे दर्शविण्यासाठी की, स्वतःला कधीही कनिष्ठ निराधार समजू नका. आपण सर्व जन्मतः त्या दैवी शक्तीचा, अग्निबिंदूचा अंश घेऊन येतो. या अग्नीला पंख लाभावेत यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करीत राहावे आणि मग त्या प्रकाशाने जग मांगल्याने भरून जावे. देवाचे आशीर्वाद सदैव तुम्हावर बरसत राहावेत.’’ नम्रतेच्या परिपूर्णतेचे प्रतीक म्हणजे आ. कलाम साहेबांचे शब्द आपल्याला खूप काही शिकवून जाणारे.

कलाम साहेबांचा जन्म गरीब घरात झाला होता. वडील जैनुलबदीन आणि सर्वश्री लक्ष्मणशास्त्री या हिंदू-मुसलमान मैत्रीची चित्तरकथा फार सुरेख रंगविली आहे. अल्लाला उद्देशून सहज संवाद साधणारा मित्र जलालुद्दीन आपल्याला खूप आवडावा. आपल्या वाटय़ाला आलेल्या परिस्थितीबद्दल कधीही खंत व्यक्त न करणारा, आपल्या मित्राच्या शैक्षणिक प्रगतीने सुखावणारा, आयुष्याने आपल्या ओंजळीत जे टाकले त्याबद्दल आपल्या वागणुकीतून कृतज्ञता व्यक्त करणारा जलालुद्दीनसारखा मित्र मिळाला हे कलाम साहेबांचे भाग्य. कलामांच्या गावात एस.टी.आर. माणिकम् नावाचे एक राष्ट्रभक्त होते. ते बरीच पुस्तके बाळगून होते. तेथून कलामांना बरीच पुस्तके वाचायला मिळाली. बालपणी तीन उच्चकुलीन हिंदू मित्र त्यांच्यासोबत असत. सनातनी, हिंदू ब्राह्मण कुटुंबातले होते. पण भिन्न धर्म, घरचे कट्टर धार्मिक आचरण यामुळे ते तिथे नि आपण वेगळे आहोत अशी भावना कलामांच्या मनात कधीही निर्माण झाली नाही.

मास्तरांनी एकदा सामाजिक पातळीनुसार शेवटच्या बाकावर बसविले तो प्रसंग मनात काहूर उठवितो. पण देवळाचे मुख्य पुजारी मास्तरांना निरोप पाठवतात. ‘या निष्पाप, निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचे बीज पेरू नका. भिन्न धर्मियांमध्ये तेढ उत्पन्न करू नका.’ हे वाचून तर डोळय़ात अंजनच पडावे. सायन्स शिकविणारे श्री. शिवसुब्रमणिसा कर्मठ ब्राह्मण कुटुंबातले, पण या आपल्या विद्यार्थ्याला प्रेमाने जेवू खाऊ घालतात, तेव्हा प्रस्थापित समाजरचनांना धक्का देऊन दूर करणारी माणसे त्याही काळी होती हे वाचून सुख वाटते. आदरभार वाढतो. कॉलेजच्या तिसऱया वर्षाला असताना वैचारिक वादळाला कलामांना तोंड द्यावे लागले. एकीकडे धार्मिक अध्यात्मिकतेवर पोसलेला पिंड आणि दुसरीकडे वैज्ञानिकतेची कास धरलेला विद्वत समाज.
1968 साली इंडियन रॉकेट सोसायटीची स्थापना करण्यात आली. तसेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्वतंत्र विभाग म्हणून स्थापना करण्यात आली. या सर्वांचा कलाम साहेब महत्त्वाचा भाग होते. विक्रम सारभाई यांच्या सोबत बराच काळ काम करण्याचे सौभाग्य कलाम साहेबांना लाभले. त्यांच्या बरोबरचा बौद्धिक वाद-संवाद म्हणजे बुद्धीची धार वाढवणारा व्यायाम होता. ऊर्जेचा स्रोत होता. 1975 मध्ये इस्रो ही सरकारी संस्था बनली. इस्रो कौन्सिलची स्थापना झाली. अनेक अवकाश संशोधनांची व्यवस्थाच झाली. 1976 मध्ये कलाम साहेबांचे वडील हे जग सोडून गेले. त्यांना जेव्हा जेव्हा बरे वाटत नसे तेव्हा तेव्हा त्यांचा हा पुत्र धावून रामेश्वरमला जाई. पण पिताजींना डॉक्टरवर पैसे खर्चलेले आवडत नसत. ‘अरे तुझी भेट हेच माझे औषध आहे’ असे ते म्हणत. वडिलांच्या पश्चात आई फार जगली नाही. एस.एल.व्ही. 3 चे चौथ्या टप्प्याचे ‘अपोजी’ रॉकेट ज्याची चाचणी फ्रान्सला व्हायची होती त्यासाठी ते फ्रान्सला निघाले होते खरे तर, पण आई गेल्यावर आधी रामेश्वरम् अन् आईचे अंत्यसंस्कार. युगानुयुगे जीवन-मृत्यूचा खेळ चालूच असतो ना! कुराणातले एक वचन त्यांना आठवले ‘तुम्ही मिळविलेली संपत्ती आणि तुमची मुले हा फक्त मोह आहे. अल्लाच्या निकट राहणे हेच खरे सुख!’
10 ऑगस्ट 1979 चार टप्प्यात विभागलेले एस.एल.व्ही. रॉकेट सकाळी ठीक 10.58 ला अवकाशात उडाले अन् 317 सेकंदाने 560 किमी अंतरावर समुद्रार्पण झाले. अकाली मृत्यू डॉ. ब्रह्मप्रकाश या विद्वत पुरुषाने सांत्वन केले. तो प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी उतरला आहे. प्रो. धवन या अपयशाची मीमांसा करीत असता त्याची संपूर्ण जबाबदारी कलाम साहेबांनी जाहीरपणे घेतली. धैर्याची केवढी कसोटी ना?

त्यांची इंदिरा गांधी यांच्या सोबतची भेट, देशाभिमानाचे अमर प्रतीक असे कलाम साहेबांचे चार शब्द हा भाग अत्यंत वाचनीय झाला आहे. सुप्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉ. राजा रामण्णा यांचा सहवास कलामांना लाभला. पटकन मित्रत्वाचे नाते जोडणारे रामण्णा आपल्याला विद्वत्ता आणि साधेपणा यांचे नाते जोडणारे प्रतीक वाटतात. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न बा…बा… बा… केवढे उत्तुंग यश नि किती पराकोटीचा साधेपणा! शेवटी असीम सुंदर आहे. अमूक एका पद्धतीने जगले तरच सुखी होता येते असा कोलाहल मनाला घेरून टाकत असताना आतल्या आवाजाचे ऐकणे हे सोपे काम नाही. पण अंती तेच आनंदाकडे, सुखाकडे नेते. त्यांच्या जोहरा या बहिणीने त्यांच्या इंजिनीअरिंगच्या फीसाठी आपल्या बांगडय़ा गहाण टाकल्या होत्या, हा आतला आवाजच ना? माधुरी शानभाग यांनी केलेला भावानुवाद अप्रतिम! काळजात घर करणारा आणि आशावाद, प्रयत्नवाद जागविणारा आहे. अभिनंदनीय आहे. वाच रसिका! पुनः पुन्हा वाच. श्रीमंत, गर्भश्रीमंत हो ‘अग्निपंख’ तुमचे मन ढवळून काढेल.

अग्निपंख
आत्मचरित्र – ए. पी. जे. अब्दुल कलाम
लेखिका – माधुरी शानबाग
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पृष्ठ – 179, मूल्य – 175

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या