परीक्षण – जिद्दीचं आणि तंत्रज्ञानाचं व्यापक दर्शन

33

>> अंजली पटवर्धन

आता अंतराळात जाण्यासाठीचे तंत्रज्ञान पुष्कळ अद्ययावत झाले आहे. पण सुरुवातीला अंतराळात उपग्रह आणि मानवाला पाठविण्यासाठी शास्त्र्ाज्ञांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शास्त्र्ाज्ञांच्या त्या अथक परिश्रमांचे सखोल चित्रण अतुल कहाते यांनी त्यांच्या ‘अंतराळ स्पर्धा’ या पुस्तकातून केले आहे. रॉकेटनिर्मितीचे तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता, रॉकेटनिर्मितीच्या बाबतीत आणि त्याद्वारे मानवाला, उपग्रहाला अंतराळात पाठविण्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये लागलेली चढाओढ, केवळ राजकीय चढाओढीसाठी काम न करता प्रचंड ध्येयासक्तीतून रॉकेटनिर्मितीमध्ये विविध प्रयोग करणारा रशियाचा कोरेलियॉव्ह आणि मूळ जर्मन असणारा, पण अमेरिकेसाठी काम करणारा फॉन ब्राऊन याचे रॉकेटनिर्मितीच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान आणि त्यांना करावा लागलेला पराकोटीचा संघर्ष, अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना या सगळय़ाचे व्यापक दर्शन कहाते या पुस्तकातून घडवतात.

दुसऱया महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जॉन फाऊलरवर जर्मनीसाठी रॉकेटनिर्मिती करण्याची जबाबदारी हिटलरने सोपवलेली असते. रॉकेटद्वारे शत्रूच्या प्रदेशावर बॉम्ब टाकणे किंवा क्षेपणास्त्र्ा डागणे याच उद्देशाने ही रॉकेटनिर्मिती करायची असते. पण केवळ युद्धासाठी रॉकेटनिर्मिती न करता रॉकेट अंतराळात पाठविण्याची फाऊलरची महत्त्वाकांक्षा असते. मात्र त्यासाठी राजकीय वातावरण अनुकूल नसते. दरम्यान, ही रॉकेटनिर्मिती सुरू असतानाच हिटलरचा मृत्यू होतो आणि जर्मनीत प्रचंड अस्थैर्य निर्माण होते. रॉकेटनिर्मितीचे तंत्रज्ञान शत्रुराष्ट्रांच्या हातात पडू न देण्यासाठी नाझी सैनिक आपल्याला आणि आपल्या सहकाऱयांना ठार मारतील अशी भीती फाऊलरला वाटते. मोठय़ा शिताफीने तो स्वतःची आणि सहकाऱयांची एस. एस. संघटनेच्या तावडीतून सुटका करून घेतो आणि अमेरिकेला शरण जातो.

सुरुवातीला अमेरिकेचा विश्वास संपादन करण्यात फाऊलरचा बराच वेळ जातो. शेवटी एकदाची त्याच्यावर रॉकेटनिर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र अमेरिकेलाही फक्त युद्धासाठीच रॉकेटचा वापर करायचा असतो, पण फाऊलर मनोमन रॉकेट अंतराळात सोडण्याचे स्वप्न बाळगून असतो. इकडे रशियामध्ये सर्गई पावलोविच कोरेलियॉव्ह या रॉकेटशास्त्र्ाज्ञाला क्रूरकर्मा म्हणून प्रसिद्ध असलेला राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन देशद्रोहाच्या तथाकथित आरोपावरून छळछावणीत डांबतो. कोरेलियॉव्हलाही अंतराळात रॉकेट पाठविण्याची जबरदस्त महत्त्वकांक्षा असते. पण छळछावणीत त्याच्यावर इतके अनन्वित अत्याचार होत असतात की, त्याने जगण्याची आशा सोडलेली असते. पण अनपेक्षितपणे त्याची त्या छळछावणीतून सुटका होते आणि त्याच्यावर रॉकेटनिर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येते. अर्थातच रशियाचा रॉकेटनिर्मितीचा उद्देशही फक्त युद्धापुरताच मर्यादित असतो आणि कोरेलियॉव्ह तरीही अंतराळात रॉकेट पाठविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतो.

कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांनी रॉकेटनिर्मितीनंतर ते अंतराळात पाठविण्यासाठी घेतलेल्या विविध चाचण्यांचे आणि त्या दोघांच्याही कर्तृत्वाचे, त्यांच्या भावनिक आंदोलनाचे समांतर चित्रण कहाते यांनी केले आहे. यातील कोरेलियॉव्हचे प्रसिद्धीपराङ्मुख राहून आपल्या कामाला तन-मन-धनाने वाहून घेणे मनाला स्पर्श करणारे आणि प्रेरणा देणारेही आहे. त्याचबरोबर जॉन फाऊलरचं कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या महत्त्वाकांक्षेला चिकटून राहणेही स्फूर्ती देणारे आहे.

कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांनी रॉकेटच्या घेतलेल्या विविध चाचण्या, अंतराळवीरांच्या अंतराळात पोहोचल्यानंतरच्या भावना, चाचण्या घेताना आणि अंतराळवीर अंतराळातून परत येईपर्यंतची अंतराळ शास्त्र्ाज्ञाची मनःस्थिती, अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर अंतराळ शास्त्र्ाज्ञाला होणारा मनस्वी आनंद या सगळय़ाचं वर्णन वाचणं हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो. चाचण्यांदरम्यान काही अंतराळवीरांचा, चाचणीसाठी अंतराळात पाठवलेल्या कुत्र्यांचा झालेला मृत्यू या घटना वाचकाला विषण्ण करतात. तसेच अंतराळवीरांना अंतराळात पाठविताना करावी लागणारी तयारी, अंतराळवीरांना तोंड द्याव्या लागणाऱया मुख्य अडचणी, अंतराळवीरांना दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करायला लागणे, अंतराळात संभाव्य समस्यांपेक्षा अन्य काही समस्या उद्भवल्या तर अंतराळवीराला दाखवावे लागणारे धाडस आणि प्रसंगावधान याबद्दल वाचताना या कामातील जोखीम आणि जीवन-मृत्यूच्या सीमेवर असताना सेकंदा सेकंदाला असणारे महत्त्व लक्षात येते. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे आणि सत्ताधाऱयांच्या आडमुठेपणामुळे, अहंकारामुळे कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांच्यासारख्या प्रतिभावंतांची कशी गळचेपी होते याचे विदारक दर्शन या पुस्तकातून घडते.

रॉकेटसंबंधित तंत्रज्ञानाचे अगदी सोप्या भाषेत विवेचन केल्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय झाले आहे. तंत्रज्ञानासोबत मानवी भावभावनांचे संमिश्र चित्र अतिशय सहजतेने या पुस्तकातून उमटत जाते आणि माणसाचे मन आणि बुद्धी या दोहोंनाही आवाहन करते. म्हणूनच ते मुळातून वाचावे असे आहे.

अंतराळ स्पर्धा

लेखक – अतुल कहाते

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठ – 220 मूल्य – 250 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या