अभिप्राय – बालकवींच्या भूमीतील कथा

>> एम. के. भामरेबापू

दोन मानवी मनांच्या स्पंदनांचा सूर जुळला की, माणूस अधिकच घट्ट बिलगतो, तेथे फुललेली मैत्री हीच खरी मैत्री असते. त्या अर्थाने धरणगावचे नानाश्री प्रा. बी. एन. चौधरी यांचा ‘कस्तुरीगंध’ कथासंग्रह नुकताच वाचला. एका दिग्गज साहित्यिकाची व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ती कलाकृती वाचून मी दिपलो. एका भावनिक आवर्तनात गुंतून गेलो.

यातल्या कथा खान्देश भूमीतल्या, मातीतल्या आहेत. म्हणूनच हा गंध अवघ्या परिसराला सुगंधित करणारा आहे. पदोपदी या मातीचे, येथल्या माणसांचे, येथील स्थळांचे, भावभावनांचे दर्शन या कथासंग्रहात घडते. लेखक किती वेगळ्या दृष्टिकोनातून घटनांकडे, माणसांकडे व परिस्थितीकडे पाहतो ते जाणवते.

वास्तव जगलेल्या, गरिबी भोगलेल्या माणसाचे साहित्य हेच खरे बोलके साहित्य असते. वेदनांचे चटके ज्याने भोगले आहेत त्यांनी लिहिलेले साहित्य वेद होतात. म्हणूनच ‘कस्तुरीगंध’ वाचनीय आहे. बी. एन. नाना हे चित्रकार  आहेत व व्यंगचित्रकारही आहेत. त्यामुळे आपल्या शब्दकुंचल्यांनी हा माणूस हुबेहुब शब्दचित्र साकारतो.

या कथांमधला साधेपणा मनाला भावणारा आहे. या नुसत्या भारंभार कथा नाहीत, तर माणुसकीचे दर्शन घडवणारा कॅलिडोस्कोप आहे. संवेदनशील मनाचा दर्पण आहेत. गरिबीतले चटके, नियतीचे फटके, वेदनांचे दाह सहन करत त्यातून मार्ग काढण्याचा संदेश देणारे दिशादर्शक आहेत. ‘माझा हात असाच प्रेमाने हातात घेत जा’ ही एका भिकाऱ्याची मागणी तमाम मानवजातीला माणुसकीच्या स्पर्शाची महती शिकवून जाते. ‘गुलाबाचे कलम सुरतेत रुजले’ हा अनुभव सुखावणारा आहे. ‘आई मेड मोजे’ ही कथा हृदयाला पीळ पाडणारी आहे. मातृप्रेमाची व वात्सल्याची महती सांगणारी आहे. ‘माय, ममता आणि अगतिकता’ या कथेत लेकीला नको, पण बाळाला औषध घेणारा बाप वाचकाला रडवून जातो. निर्जीव मूर्तीपेक्षा सजीव बालकाला प्रसाद वाहणारा लेखकातला खरा भक्त ‘माझे गणपती दर्शन झाले’ म्हणून सांगतो आणि देव माणसात शोधायचा संदेश देतो. साहित्य जेव्हा आपल्याशी वा आपल्या भावविश्वाशी साधर्म्य साधतं तेव्हा ते अधिक रुचकर लागतं. या कथा तशाच आहेत.

‘कस्तुरीगंध’ या समर्पक शीर्षकामुळे कथासंग्रहाबद्दल मनात सहज कुतूहल वाढतं. संग्रहात एकूण 44 कथांचा समावेश आहे. पुस्तक हातात घेऊन एकदोन ओळी वाचल्या की, पूर्ण कथा संपेपर्यंत ते सोडवत नाही.

कस्तुरीगंध (कथासंग्रह)

 लेखक : प्रा.बी.एन.चौधरी   प्रकाशन : चपराक, पुणे

 पृष्ठे : 208,  मूल्य : रु. 350/-