मुलांच्या भावविश्वात डोकावणाऱया गोष्टी

>> एकनाथ आव्हाड

असं म्हणतात – कोणतंही काम करताना त्या कामात आपण आपला जीव ओतला, आपल्या अंतःकरणातील जिव्हाळा त्या कामावर शिंपडला की त्या कामाचा कीर्तिसुगंध अगदी सहजगत्या सर्वदूर पोहचतो. याच गोष्टीचा अनुभव आपल्याला अमृता भालेराव या उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिकेच्या कार्याबाबत येतो. त्यांच्या कामाची व्याप्ती, सातत्य, विविधता आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठीची त्यांची जिद्द या साऱयाच गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, बाडगी, तालुका पेठ, जि. नाशिक येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱया भालेराव या शिकणे – शिकविणे ही प्रक्रिया अधिक आनंददायी, विद्यार्थीभिमुख करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गाणी, गोष्टी या मुलांना खाऊइतक्याच प्रिय असतात हे त्या जाणून आहेत. म्हणूनच गाणी, गोष्टींची सोबत मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांना महत्त्वाची वाटते.

गोष्टीतून मुलांचं भावविश्व सहजगत्या उलगडणारं एक नवंकोरं पुस्तक घेऊन अमृता भालेराव या मुलांच्या भेटीला आल्या आहेत. या पुस्तकाचे नाव आहे – ‘फुलं – मला भेटलेली’. फुलांमुलांमध्ये एकवटलेल्या गोष्टी यात आहेत.
खरंतर मुलं ही सुंदर साजिऱया फुलांसारखीच असतात आणि फुलं ही गोडगोजिऱया मुलांसारखीच असतात. कोमल, निखळ, निर्मळ, आनंदाने डोलणारी… फुलं जशी रानभर दरवळतात तशीच मुलंही घरभर बागडतात.

पहिलीच श्रीनिवासनची गोष्ट वाचताना गोष्टीतला भाबडा श्रीनिवासन आपल्याला मनोमन भावतो. लेखिकेला नदीकिनारी मातीची पिंड बनवायला शिकवणारा, पैसे देताच ते घेण्यास नकार देणारा, आपल्या लहान बहिणीचे संगोपन करणारा आणि इतरांच्या मदतीला धावणारा स्वाभिमानी, मेहनती श्रीनिवासन गोष्ट संपल्यानंतरही आपल्या डोळ्यांसमोर सतत उभा राहतो हेच या गोष्टीचे खरे यश.

‘चिऊचा गुलाब’ ही गोष्ट वाचताना चिमणीचं दुखरं पिल्लू जगावं म्हणून वर्गातील मुलांची चाललेली मनस्वी धडपड पाहून आपलं अंतःकरण भरून येतं. मुलांच्या समजूदरपणाचं आपल्यालाही कौतुक वाटतं. खूप प्रयत्न करूनही शेवटी ते चिमणीचं पिल्लू दगावतं. मग ते पिल्लू जिथं पुरलं जातं तिथेच एक गुलाबाचं रोपटं लावलं जातं. मग एक दिवस त्या रोपटय़ावर जेव्हा पहिलं गुलाबाचं फूल येतं तोच चिऊचा गुलाब. चिमणीच्या पिल्लाला दिलेली ही आगळीवेगळी भावांजली मनाला स्पर्शून जाते.

मुलांच्या हट्टापुढे मोठमोठे नतमस्तक होतात. कारण मुलांचे हट्ट हे मुलांसारखेच लडीवाळ असतात. जादूचं औषध या गोष्टीतली धाराच पाहा ना. एक डोळा लाल झाला म्हणून डोळ्यांत औषध टाक माझ्या असं सतत बाईंच्या मागं टुमणं लावते. बाईसुद्धा हुशार – पाण्याचे दोन थेंब डोळ्यांत टाकून औषध टाकल्याचं समाधान धाराला देतात. गोष्टीत धाराचं येऊन बाईंना बिलगणं… बाईंशी मनमोकळं बोलणं… धाराच्या समाधानासाठी बाईंना काही करणं यातून धारा आणि बाईंच्या नात्याचा सुंदर गोफ सहज विणला जातो.

अबोलीचा गजरा, अमावस्येची चंद्रिका, गजरेवाली आणि राजलता या गोष्टीही छान जमून आल्या आहेत. त्यावाचूनच त्यांची गोडी चाखावी.
मला वाटतं – मुलांच्या सोबत वावरताना ज्या ज्या गोष्टी घडतात त्यातूनच अमृता भालेराव यांना काही कथाबीजं सापडतात. मग पुढे त्या कथाबीजांतून सुंदर गोष्टी कागदावर अवतरतात. मुलांचंच भावविश्व साकारणाऱया या सर्व गोष्टी असल्यामुळे या गोष्टी मुलांच्या मनाचा अचूक ठाव घेतात.

खरंतर मुलांचं भावविश्व कथेतून मांडणं ही तशी सोपी गोष्ट नाही. पण अमृता भालेराव या मुलांसाठीच काम करत असल्यामुळे आणि मुलांच्या सहवासात अधिकाधिक वेळ त्या घालवत असल्यामुळे मुलांची मनं त्या सहज वाचतात, जाणतात. मुलांची भाषा त्यांना आपसूक उमगते. मुलांना काय हवं काय नको त्या अचूक ओळखतात. म्हणूनच मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी या मुलांना आपल्या वाटतात, हे विशेष.

फुलं – मला भेटलेली (बालकथासंग्रह)
लेखिका – अमृता भालेराव
प्रकाशक – संवेदना प्रकाशन
पृष्ठ – 64, मूल्य – रुपये 100/-

आपली प्रतिक्रिया द्या