बालपणीचं निरागस विश्व

129

>> अस्मिता प्रदीप येंडे

बालपण म्हणजे तो सुखद काळ ज्यात स्वार्थ, फसवेगिरी नसते, अभिमान नसतो. बालपण म्हणजे आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ, ज्यात असते ती फक्त ’निरागसता’.

ज्येष्ठ कवयित्री शकुंतला चौधरी यांचा ’जमाडी जंमत’ हा बालकाव्यसंग्रह म्हणजे बालपणीची शिदोरीच जणू. या संग्रहातील कविता वाचताना पुन्हा बालपण जगतेय असा भास झाला. हीच तर या संग्रहाची कमाल आहे. शारदा प्रकाशनाने हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात कवयित्रींनी प्राणी, पक्षी, निसर्ग, तंत्रज्ञान, देशप्रेम इत्यादी विविध विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत. लहान मुलांच्या मनाचे प्रतिबिंब उत्तमरीत्या कवयित्रींनी पुस्तकरूपी पाण्यावर उमटविले आहे. कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यातून सुंदर रचना केलेल्या आहेत.
‘जमाडी जंमत’ या संग्रहातील ‘बदल’ ही कविता आपल्याला बदललेली स्थिती दर्शवते.
‘आई’ या स्वराचा आता विसर पडला.
‘मॉम’ हे व्यंजन चिकटले तोंडाला!
सगळेच बदलले आहे. आई जिवंतपणीच मॉम झाली. बाबा डॅड झाले. ताईची वेणी तोकडी झाली. आई-वडील नोकरीला असल्याने मुलाकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मनातले सांगायला कुणीच नसते हीच स्थिती आहे सध्याची. मुलं आजी-आजोबांसोबत राहतात. कारण आई- वडील नोकरीला जातात. त्या मुलाला खेळणी देतात, पण वेळ नाही, पण त्याच्या मनाची स्थिती या दोन ओळींतून कळते –
अरे, पण मी काही रोबोट नाही ना,
हवे तेव्हा, हवे तसे मला नाचवायला…
‘मी ? की मिठाईचे दुकान ?’ या कवितेतील बाळ गोंधळलेले आहे. त्याला आई रसगुल्ला म्हणते तर बाबा अंजीर बर्फी म्हणतात. कुणी रव्याचा लाडू तर कुणी जिलेबी म्हणतं. त्यामुळे बाळाला प्रश्न पडलाय, नेमका मी आहे तरी कोण ? या बाळाची गंमत या कवितेत अनुभवायला मिळते.
शिक्षण म्हणजे महत्त्वाची पायरी. मुलांना शाळा, शिकवणी त्यात ढीगभर अभ्यास असतो. त्यात एवढे विषय, पुस्तके, वह्या यांचे ओझे. ‘असा कसा रे अन्यायी?’ या कवितेतील मुलगा देवाकडे तक्रार करतोय की,
देवा असा कसा रे तू अन्यायी?
जीव चाललाय आमचा दप्तराच्या ओझ्यापायी,
तुझी पाठ मोकळी, तीवर कसलेच ओझे नाही!
कवयित्रींनी मुलांच्या मनाला पडलेल्या प्रश्नांना या कवितेतून मांडले आहे. ‘ये रे ये रे पावसा’, ‘कट्टी बट्टी’ या कवितांमधून पावसाला येण्याची विनंती करत आहेत. ‘झाडे लावू, झाडे जगवू’ असा संदेश दिलेला आहे.
‘दूर गेली भातुकली’ या कवितेतील मुलगी आपल्या आईला सांगतेय, ‘‘किती रम्य होतं गं आई तुझं बालपण. अंगण, तुझी बाहुली, तुझी भातुकली. आता सगळीकडे फ्लॅट संस्कृती आल्यामुळे ना अंगण, ना बालपण. बालपण हरवून बसलेल्या मुलीची व्यथा या कवितेतून मांडली आहे. ‘भारतभूची कीर्तिध्वजा’, ‘बालक आम्ही मातृभूमीचे’, ‘भगीरथाकडून घेऊ धडे इत्यादी राष्ट्रभक्तिपर कविताही या संग्रहात आहेत. तसेच ‘मोहजाल’, ‘जादूचा दिवा’ या कवितांतून तंत्रज्ञानाचे स्वरूप दाखवले आहे. तंत्रज्ञानाने आपण घेरलेलो आहोत याची प्रचीती येते.
खरंच, जर ‘मेकओव्हर’ करायला जंगलातले प्राणी सलोन मध्ये आले तर… कल्पना तशी छान आहे, पण जर आली तर त्या सलोनवाल्याचं काय होईल याची गंमत ‘मेकओव्हर’ या कवितेतून येते. सिंह येतो केस सेट करायला, तर अस्वल येतो केसांचा गुंता सोडवायला. माकड जातं केमिस्टकडे ‘लायसिल’ मागायला, मगर जाते डेंटिस्टकडे दात साफ करायला. ही सगळी गंमत अनुभवायला मिळते..
कवयित्री शकुंतला चौधरी यांचा ‘अक्षरलेणं’ हा पहिला काव्यसंग्रह. ‘एका साध्वीची योगसाधना’, ‘चैत्रपालवी’ हे दोन ललित लेखसंग्रह लिहिले आहेत. त्यानंतर वाचकांसाठी, खासकरून बालमित्रांसाठी ‘जमाडी जंमत’ भेटीला आलेले आहे. या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ लेखिका डॉ. सुमन नवलकर यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे तसेच कवयित्री सुधा मोकाशी यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय मनोवेधक आहे. कवितांना साजेशी चित्रेही दिलेली आहेत. शारदा प्रकाशनाने हे पुस्तक वाचकांपर्यंत आणले त्याबद्दल धन्यवाद. ‘जमाडी जंमत ’ हा बालकाव्यसंग्रह पुन्हा बालपणीच्या आठवणींत रममाण व्हायला लावेल हे नक्की!
जमाडी जंमत
कवयित्री – शकुंतला चौधरी
प्रकाशन – शारदा प्रकाशन, ठाणे
मूल्य – 80 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या