नर्मदेच्या लढ्याचा मौखिक इतिहास

परिक्षण – गणेश उदावंत

नुकतेच म्हणजे सप्टेंबर २०१७ मध्ये नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाचे लोकार्पण झाले. त्या अगोदरच लेखिका नंदिनी ओझा यांचे ‘लढा नर्मदेचा’ हे पुस्तक वाचकांसमोर आले आहे. हे पुस्तक म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनातले दोन प्रमुख आदिवासी नेते केशवभाऊ वसावे आणि केवलसिंग वसावे यांच्या प्रदीर्घ मुलाखती आहेत.

नर्मदा नदीवरच्या प्रचंड मोठय़ा धरण प्रकल्पामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांमधल्या आदिवासी लोकांना विस्थापित व्हावे लागणार होते. १९८५ साली सर्वप्रथम मेधा पाटकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या गटाने धरणग्रस्त परिसराचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, विस्थापित आदिवासींच्या पुनर्वसनाकडे सरकार दुर्लक्ष करते आहे. यातून हळूहळू ‘नर्मदा बचाव आंदोलन’ उभे राहिले आणि १९९० पासून त्याने जोर धरला. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका किंवा आंदोलनातील दोन प्रमुख आदिवासी नेत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती मिळवणाऱ्या मुलाखतकर्त्या नंदिनी ओझा या १९९० पासूनच या कामाशी जोडल्या गेल्या.

गुजरात राज्यातील सौराष्ट्र हा भाग पाण्यापासून वंचित आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात मुळात ही कल्पना आली की, मध्य प्रदेशात उगम पावून महाराष्ट्राच्या सीमेवरून गुजरातमध्ये प्रवेश करून पश्चिम समुद्राला मिळणाऱ्या नर्मदा या प्रचंड नदीवर धरण बांधल्यास सौराष्ट्रासकट सगळ्याच गुजरातला त्याचा लाभ होईल. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर तीनच वर्षांत म्हणजे डिसेंबर १९५० मध्ये सरदार पटेल मरण पावले.

परंतु नर्मदा नदीवर धरण व्हायला हवे, ही कल्पना खुद्द पंडित नेहरूंनाच पटली होती. पंडितजींच्या डोळ्यांसमोर देशाच्या विकासाचे रशियन मॉडेल होते. प्रचंड मोठे कारखाने, मोठी धरणे, भव्य प्रकल्प राबवून देश अद्ययावत, प्रगत करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे एप्रिल १९६१ मध्ये खुद्द पंडितजींच्याच हस्ते नर्मदा प्रकल्पाचा शुभारंभ झाला. सरदार पटेलांच्या स्मृत्यर्थ त्यांचे नाव ‘सरदार सरोवर प्रकल्प’ असे ठेवण्यात आले.

आता या प्रकल्पाचे फायदे एकट्या गुजरात राज्यालाच मिळणार असे नसून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानातसुद्धा या प्रकल्पाचे पाणी व वीज मिळणार आहे.

पण मेधा पाटकर आणि इतर आंदोलकांना हे मान्य नाही. हे धरण होताच कामा नये, अशी त्यांची एकांतिक आणि आक्रस्ताळी भूमिका आहे. त्यांच्यासोबत लेखिका अरूंधती रॉय, अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आनंद पटवर्धन वगैरे बरीच मंडळी आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की, हे सगळे विरोधक डाव्या विचारांचे आहेत.

नंदिनी ओझा यांनी केशवभाऊ व केवलसिंग या आंदोलनातल्या दोन नेत्यांना जे प्रश्न विचारले आहेत, त्यावरूनही आपल्या लक्षात येते की, ही डावी मंडळी आपला वैचारिक अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करीत असतात. ते कसेही असो, पण आंदोलनात प्रत्यक्ष काम केलेल्या दोघा कार्यकर्त्यांचे मनोगत हा एक महत्त्वाचा मौखिक दस्तऐवज आहे. तो शब्दांकित करून नंदिनी ओझा यांनी एक महत्त्वाचे काम केलेले आहे. नर्मदा प्रकल्पाचा इतिहास लिहिणारे भावी इतिहासकार आणि आदिवासींच्या खऱ्याखुऱ्या कल्याणासाठी झटणारे समर्पित कार्यकर्ते, त्यातून योग्य तेवढा बोध घेऊ शकतील.

लढा नर्मदेचा
लेखिका – नंदिनी ओझा
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पृष्ठ – 270, मूल्य – रु. 340

आपली प्रतिक्रिया द्या