मायलेकीचं अतूट नातं!

286

>> डॉ. विजया वाड

बेट्टी मेहमूदीचे नॉट विदाऊट माय डॉटर. माझ्या मुलीशिवाय मी अमेरिकेला परत जाणार नाही. मायलेकीचा हा खडतर प्रवास आपले मनोबल नक्कीच उंचावतो.
कुठली आई आपल्या लेकीवर प्रेम करीत नाही? आपली लेक हे प्रत्येक आईसाठी सुखनिधान असते. ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक मायलेकीचे सूतगूत, मायलेकींची प्रेमगाठ आणि मायलेकींचे अतूट बंध यावरचे अक्षर वाङ्मय आहे.
बेट्टी एका इराणी डॉक्टरच्या प्रेमात पडते. त्याचे वास्तव्य तेव्हा अमेरिकेत असते. प्रेम ही अशी एक अनाकलनीय गोष्ट आहे की ती जात, धर्म, पंथ, देश… साऱया वेशी सहजी ओलांडते. भान विसरून हे प्रेम मग फक्त नरमादी या पातळीवर उतरते. दोघे जगाला विसरून विवाहाच्या पवित्र (?) (हे पुस्तक वाचाल तर विवाहाचे पावित्र्य, स्त्र्ााrचा आदर, सहानुभाव या शब्दांचा विवाहाच्या बाबतीतला अर्थ गळून पडेल) बंधनात अडकतात अन् त्यातून प्राणप्रिय अशी मुले स्त्र्ााr-पुरुष जन्माला घालतात. बेट्टीचे आत्मकथन लीना सोहोनी यांनी मराठीत इतके सुंदर केले आहे की, वाचताना तुमचे हृदय पिळवटून निघेल. तो अनुवाद वाटू नये इतके सहजसुंदर अनुवादन. लीना सोहोनींचा हा अनुवाद तब्बल तीनशे पानांचा आहे.
मिशिगन या अमेरिकेतील शहरात बेट्टीचे वास्तव्य असते आणि मुडी तिच्या आयुष्यात येतो. हुशार, देखणा, भूलतज्ञ डॉक्टर प्रेमात पडायला एवढे पुरेसे आहे ना! अन् मग या विवाहातून मुडी नि बेट्टी एक कन्यारत्न जन्माला घालतात- माहतोब. चंद्रप्रकाश हा त्याचा अर्थ. ही मुलगी म्हणजे बेट्टीच्या मायेची पोतडी बेट्टीचे सर्वस्व!
नवरा इराणी असतो. मुडी आग्रह करतो, ‘‘चल पंधरा दिवस. माझा देश बघ, इराणचे सौंदर्य बघ, माझ्या घरचा पाहुणचार घे, छोटी सुट्टी घेऊन जाऊ, पंधरा दिवसांत परतू अमेरिकेत.’’
ज्या माणसाने अमेरिकेत डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे त्याला इराणमध्ये कसा व्यवसाय करता येईल? आता त्याची कर्मभूमी ही युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकाच असणार हे बेट्टी जाणून असते. ती आपल्या नवऱयावर विश्वासून इराणला जायला तयार होते. पुसट शंकाही दैव माणसाला देत नाही, दुर्दैव कधी पुढय़ात येऊन उभे राहणार याची! नाहीतर माणसे सुखासुखी दुर्दैवाच्या दशावतारांना कशी सामोरी गेली असती? सांगा ना! जिवंतपणी मरणयातना भोगायला माणसे कशी तयार होतील हो? पण आपण नको तेवढा विश्वास आपल्या प्रिय माणसावर टाकतो नि मग मरणयातनांना आमंत्रित करतो. हा दुर्दैवी अनुभव म्हणजे ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे शब्दचित्र.
बेट्टी इराणमध्ये पाऊल टाकते. ‘हेल अमेरिका’ इतका अमेरिकेचा द्वेष करणारा हा देश. पावलोपावली त्याचे प्रत्यंतर बेट्टीला येते. फक्त डोळे दिपतील असे पडदानशीन आयुष्य स्वीकारणे, ‘हे फक्त पंधरा दिवसांसाठी आहे’ अशी मनाची समजूत घालून आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे अन् पंधरा दिवसांनंतर ती क्रूर भविष्यवाणी… ‘आपल्याला इतक्या लवकर परत जाता येईल असे वाटत नाही, बेट्टी!’ इति डॉ. मुडी! दुर्दैवाचा पहिला दणका. …आणि मग दणक्यावर दणके. मुडीचा पूर्णपणे राक्षसी अवतार सामोरा येतो. मरेपर्यंत मारझोड म्हणजे काय याचा जिवंत अनुभव बेट्टी घेते. इतका मार की डोके भिंतीवर आपटणे, लाथाबुक्क्यांनी कंबर ढिली करणे, चालताना मरणयातना होणे, कधी डोळय़ांसमोर अंधारी येणे असा सारा राक्षसी प्रकार हा माणूस ‘डॉक्टर’ आहे. शिक्षण आणि संस्कृती यांचा दुरान्वयानेही संबंध नाही.
ज्या माणसाबद्दल पराकोटीचा द्वेष वाटतो त्याच्याबद्दल प्रेम दर्शविणे किती अवघड गोष्ट आहे ना प्रिय वाचकांनो? माहतोबचे इराणी शाळेत शिकणे, त्यासाठी दोघींनी मुडीचा मार खाणे, पळण्यासाठी इराणी माणसानेच बेट्टीला मदत करणे, पळून जाताना लळालोंबा करीत लेकीला घेऊन जाणे हेच तर आहे जिवावर उदार झालेल्या बेट्टीचे जीवनचित्र. मुडीपासून पळून जातानाचा संघर्ष वाचून आपण गोठून जातो. पकडले जाण्याच्या अनेक शक्यता समोर दिसत असताना बेट्टी जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर उतरते तेव्हा वाचकही मनोमन सुखावतो आणि हुश्श म्हणतो. माणसातल्या राक्षसाचे दर्शन, अबोध माणुसकीचे दर्शन, बेट्टीचे आईबाप, बेट्टीला मदत करणारी अमेरिकन एम्बसी नि तिथली माणसं, बेट्टीच्या शरीर अत्याचारांकडे थंड दुर्लक्ष करणारी जवळची नातलग माणसे असे अनेक पदर या कादंबरीला असले तरी लक्षात राहते ते मायलेकीचे अपरंपार प्रेम, माया, दृढविश्वास! बेट्टीच्या नरकयातना संपल्यावर एक सुरक्षित, आपल्या देशातलं वास्तव्य जेव्हा सुरू होते तेव्हा वाचकाच्या मनातही आनंद फुलतो.
बेट्टीचे पहिल्या नवऱयापासून झालेले दोन्ही मुलगेसुद्धा आता तिच्याजवळ राहतात. तिची तिन्ही अपत्ये. हे पुस्तक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱया आपल्या मुलींना जरूर वाचायला सांगा पालकांना. प्रेम करताना ‘डोळस’ होतील. दुर्दैवाच्या खाईत त्या कोणीही अडकू नयेत असे मला अगदी मनापासून वाटते म्हणून सांगितले.

‘नॉट विदाऊट माय डॉटर’
लेखक – बेट्टी महमुदी
अनुवादक – लीना सोहोनी
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ – 447 किंमत – 500 रु.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या