आठवणींची जाळीदार पिंपळपाने

>> अस्मिता येंडे

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला एकटे राहणे आवडत नाही. आपल्या मनातील भावना, आपली मते, आपला आनंद, राग व्यक्त करण्यासाठी कोणीतरी हवे असते. मानव समुहाने राहणारा आहे. लहान असताना व्यक्तीचं जग हे त्याचं कुटुंब असतं. पण जसजशी ती व्यक्ती मोठी होत जाते, समाजात वावरायला लागते, एक माणूस म्हणून त्याची जड़णघडण सुरू होते… आयुष्याच्या या प्रवासात अनेक व्यक्ती माणसाच्या आयुष्यात येतात आणि जातात… काही थांबतात आणि काही वेळ संपली की निघून जातात… आपल्या आजूबाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहत असतो. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, विचार करण्याची पद्धत वेगळी. या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात.

काही व्यक्ती आपल्यासाठी इतक्या खास असतात की, त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास जगण्याची उमेद देऊन जातात. प्रसिद्ध गिर्यारोहक, लेखक वसंत लिमये म्हणजे सतत उत्साही, मनाने ताजेतवाने असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आली ज्यांच्यासोबत त्यांचे एक सुंदर ऋणानुबंध निर्माण झाले. अशा व्यक्तींवरील सुंदर लेख पुस्तक स्वरुपात एकत्रित केले आहेत ते पुस्तक म्हणजे ‘पाने आणि पानगळ’. व्यास क्रिएशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे शीर्षक लक्ष वेधून घेते.

आयुष्यात तुम्ही किती संपत्ती कमावली हे महत्त्वाचे नाही, तर या प्रवासात तुम्ही किती माणसं कमावली हे महत्त्वाचे आहे. लेखक वसंत लिमये हे असे व्यक्तिमत्त्व आहे ते जिथे जातील तिथे सगळ्यांना आपलेसे करतील. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या जीवनाच्या झाडाला हिरवीगार पाने डवरली आहेत. माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे आहे. झाडाची जी पाने पिवळी होऊन गळून पडतात, तशी आयुष्याच्या झाडावरील काही पाने काळाच्या ओघात गळून पडली. पण ती पिंपळपाने वसंत लिमये यांनी आपल्या हृदयाच्या वहीत जपून ठेवली आहेत.

‘पाने आणि पानगळ’ या पुस्तकात 29 लेख आहेत. प्रत्येक लेखातून त्या व्यक्तीच्या भेटी, आठवणी, त्या व्यक्तीचे व्यक्तिचित्रण अत्यंत तरल भावनेने त्यांनी केले आहे. यात अशी व्यक्तिमत्त्वेसुद्धा आहेत जी या जगात नाहीत पण त्यांच्या आठवणी लेखकाच्या मनात कायम आहेत आणि पुढेही असणार आहेत. असे म्हणतात, माणूस जिवंत असताना त्याची किंमत कळत नाही, पण तो गेल्यानंतर त्याची उणीव भासते, हो ना!
पुस्तकातील पहिलाच लेख त्यांनी आपल्या आईवर लिहिला आहे. आई आणि मुलाचं नातं आपल्याला माहीत आहेच. आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातली खास मैत्रीण असते, गुरू असते, आपल्याला समजून घेते. वृद्धत्व हे दुसरे बालपण असते. या दुसऱया बालपणात लेखकाला आपल्या आईच्या चेहऱयावरील निरागसतेचे दर्शन घडते. हा लेख खरोखर खूप सुंदर लिहिला आहे. तसेच अभिनेता सुबोध भावे, अभिनेते सचिन खेडेकर, कवी कुसुमाग्रज, लेखक अरुण साधू, अभिनेते श्रीराम लागू अशा अनेक दिग्गज व्यक्तींवरील लेख या पुस्तकात वाचायला मिळतात.

प्रत्येकासोबतच्या आठवणी, गमतीजमती वेगवेगळ्या आहेत. सोबत त्यांच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्ती, मित्र, गिर्यारोहणानिमित्ताने भेटी झालेल्या व्यक्ती अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींच्या स्मृती लेखकाने हळुवारपणे जपल्या आहेत. ओघवती लेखनशैली, साधी-सरळ मांडणी आणि नेमकेपणा यामुळे पुस्तक सहजपणे वाचले जाते.

‘‘वसंत लिमये हे एक हिरवेगार डवरलेलं झाड आहे, ज्यावर हिरव्या पानांची जत्रा फांद्या-फांद्यांवर बहरात आलेली आहे.’’
कवी किशोर कदम यांनी मलपृष्ठावर लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत… पुस्तकात व्यक्तीची सुंदर रेखाटनेसुद्धा आहेत. मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. मुखपृष्ठ आणि रेखाटने नीलेश जाधव यांनी सजवली आहेत. लेखक वसंत लिमये हे निसर्गात रमणारे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करताना विविध माणसे त्यांच्या मनात रुजली गेली आणि त्यांचे आयुष्याचे झाड बहरत गेले. त्यांचे आयुष्याचे झाड असेच कायम हिरवेगार राहो, त्याचा बहर कायम राहो… आठवणींना उजाळा देणारी ‘पाने आणि पानगळ’ नक्की अनुभवा!

पाने आणि पानगळ
लेखक – वसंत वसंत लिमये
प्रकाशक – व्यास क्रिएशन्स
मूल्य – रुपये 240/-

आपली प्रतिक्रिया द्या