मार्गदर्शक जीवनपट

231

>> प्रशांत गौतम

जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयातील इंग्रजीच्या प्राध्यापक डॉ. ज्योती धर्माधिकारी-कुलकर्णी यांनी आजपर्यंत विपुल प्रमाणात लेखन केले. आजपर्यंत त्यांनी जे लेखन केले ते ‘प्रिझम’ या ग्रंथात समाविष्ट आहे. धर्माधिकारी यांचा हा पहिला लेखसंग्रह 2017 साली साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेत प्रसिद्ध झाला तर ‘विश्वातील सामर्थ्यशाली’ हा दुसरा ग्रंथ 2018 साली साकेत प्रकाशनने प्रसिद्ध केला.

लिखाणासाठी हाती घेतलेला विषय रंजकपणे मांडणे आणि शैलीदार लेखन करणे असा त्यांचा गृहपाठ असतो. शिवाय त्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक असल्याने बहुश्रुत वाचनाने झालेलेही लेखन वाचकांना आवडत आले आहे. प्रस्तुत ‘प्रिझम’ या लेखसंग्रहात सुरुवातीचे तीन लेख हे इंग्रजी वाङ्मयाची विस्तारात चर्चा करणारे आहे. हिंदुस्थानी इंग्रजी साहित्याची ओळख, इतिहासाचे पुनर्लेखन आणि इंग्रजी साहित्य, हिंदुस्थानी इंग्रजी वाङ्मय लोकप्रियतेचे नवे पर्व या प्रकरणातून त्यांनी साक्षेपी वेध घेतला आहे.

प्रस्तुत लेखसंग्रहात वाङ्मय चर्चा करणारे, व्यक्तीविशेष, ललित, प्रासंगिक आणि सामाजिक असेही बहुआयामी लेखन येते त्यातील बहुतांश लेख सत्ताबाधित राजकारण आणि स्त्री, मी सक्षमा, जग दोघांचे समानतेचे लिहिली सखी, स्त्री शिक्षण, तिला खुणावणारी क्षितिजे यातून स्त्रियांविषयांचे वैविध्यपूर्ण लेखन येते. या संग्रहातील लेखांच्या लालित्यपूर्ण शीर्षकातून ते व्यक्तही होत जाते.

‘प्रिझम’ या पहिल्या संग्रहानंतर लगेच त्यांचा ‘विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रीया’ हा संग्रह आला. या संग्रहात त्यांनी जगातील कर्तबगार स्त्रियांचा विस्ताराने घेतलेला हा आढावा आहे. या विषयाचा अभ्यास करताना जागतिक पातळीवरील कर्तबगार स्त्रियांची निवड करताना खरेच कसोटी लागली असावी. पुस्तकासाठी त्यांनी जगातल्या 128 कर्तबगार स्त्रियांची यादी तयार केली. ती संक्षिप्त करीत 38 झाली. शेवटी त्यातील अकरा नावे निश्चित झाली. डॉ. वंगारी मथाई, आंग सान स्यू ची, मलाला युसूफभाई, डॉ. अंजेला मर्केल, डॉ. मेरी क्युरी, मदर तेरेसा, रोझा पार्क्स, इंदिरा गांधी, आयजेन पू, ओपरा विनफ्रे आणि जेनेट मॉक या अकरा कर्तबगार स्त्रियांचा प्रदीर्घ लेखरूपाने ज्योती धर्माधिकारी यांनी सचित्र आढावा घेतला आहे. विश्वातील या अकरा स्त्रियांपैकी पाचजणी नोबेल पुरस्काराने सन्मानित असून अन्य कर्तबगार महिला विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या आहेत, तर डॉ. मेरी यांना दोनवेळा नोबेल सन्मानाने गौरविण्यात आले आहे. ग्रंथलेखनासाठी त्यांनी नावाची निवड चोखंदळपणे केली. विश्वातील कर्तबगार स्त्रियांचा जीवनपट चरित्रात्मक पद्धतीने मांडत असताना त्यांनी अपार मेहनत घेतली. त्यातूनच हा दर्जेदार ग्रंथ सिद्ध झाला आहे.

पर्यावरणाचे नेतृत्व करणारी डॉ. वंगारी मथाई (केनिया), राजकर्मी संन्यासिनी-आंग सान स्यू ची (म्यानमार), आधुनिक सावित्रीबाई – मलाला युसूफझाई (पाकिस्तान), राजकीय शास्त्रज्ञ – डॉ. अँजेला मर्केल (जर्मनी), विज्ञान योगिनी – डॉ. मेरी क्युरी (पोलंड), मानव धर्माच्या महामेरू मदर तेरेसा (हिंदुस्थान), वर्णद्वेषाविरुद्ध एल्गार – रोझा पार्क्स (अमेरिका), प्रियदर्शिनी – इंदिरा गांधी (हिंदुस्थान), वृद्धांच्या सन्मानासाठी लढणारी संघर्षव्रती आयजेन – पू (अमेरिका), ओ फॅक्टरची जादूगार ओपरा विनफ्रे (अमेरिका), रीडिफायनिंग वुमनहूड – जेनेट मार्कर (होनोलुलू) यांचा घेतलेला शोध व केलेले लेखन
प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरक ठरेल. त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून देईल यात शंका नाही. डॉ. रमा मराठे यांनी या संग्रहासाठी विवेचक प्रस्तावना दिली आहे.

विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया
प्रकाशन – साकेत प्रकाशन, संभाजीनगर
पृष्ठे – 240, मूल्य – 150 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या