वास्तवातील परिकथा

466

>> डॉ. विजया वाड

काही माणसे कालातील असतात. बाबा आमटे हे असंच असाधारण व्यक्तिमत्त्व होतं. एक वेगळी वाट त्यांनी चोखाळली होती आणि त्या वेगळ्या वाटेवर त्यांना साधनाताई आमटे यांनी स्नेहल साथ दिली होती. त्यांचीच ही अजरामर साहित्य कृती ‘समिधा’.

एखाद्या परिकथेत शोभणाऱया अशा प्रेमकहाणीतून बाबा आमटे आणि साधनाताई यांचा संसार सुरू झाला. समाजसेवा आणि आधुनिकता यांचा मधुरमेळ घालत त्यांनी खूप स्वप्ने साकार केली. सगळ्यात महत्त्वाचे काय तर या दोघांच्या प्रयत्नातून हजारो माणसे घडली. इंदू घुले आणि मुरली आमटे यांच्या वादळी सहजीवनाची ही सुंदर कहाणी आहे. राम शेवाळकर यांची प्रस्तावना लाभलेले हे एक असामान्य हृद्गत आहे. साधनाताईंची भाषा साधी, सोपी, सरळ आणि मनभावन आहे. हे पुस्तक सीताकांत प्रभू यांनी शब्दबद्ध केले आहे. 5 मे 1926 ते 9 जुलै 2011 हा ताईंचा जीवनप्रवास तर बाबांचा जीवनालेख 26 डिसेंबर 1914 ते 9 फेब्रुवारी 2008 असा! म्हणजे ताई बाबांनंतर फार जगल्या नाहीत. हीच जीवनसाथ पुस्तकात शब्दबद्ध करताना प्रेम, श्रद्धा, समर्पण, लिव्ह ऍण्ड लेट लिव्ह- जगा आणि जगूद्या ही जीवन निष्ठा, कल्पना, स्वप्ने सत्यात उतरवण्याची अमर्याद धडपड आणि जिद्द बघून मन अंतर्बाह्य थरारते.

इंदू घुले केवळ दहा वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले. काळ जुना. 1936चा. केशवपन प्रथा. पण इंदूच्या वडिलांनी पत्नीस सांगितले होते. नको करू केशवपन. मग आईने पती इच्छा प्रमाण मानली. इंदूला त्या वेळी 2 महिन्यांची बहीण होती. सुमा! इंदूची देवावर श्रद्धा होती. आईचा उजवा हात म्हणजे इंदू. भराभर कामे उरकी. ज्या वेळी बाबा प्रथम इंदूकडे आले तेव्हा लांबजटा, पोटापर्यंत रुळणारी काळीशार दाढी, खांद्यावर मोठी कपडे भरलेली पिशवी, शुभ्र धोतर, भगवा अंगरखा नि एका खांद्यावर कांबळे अशा रुपात. एक दंडसन्यासी आले आहेत असे इंदूने आईला सांगितले तेव्हा आई हसून म्हणाली, ‘‘अगं, हा तर आमटय़ांचा मुरली!’’
त्यानंतर ते इंदूच्या मोठय़ा बहिणीच्या लग्नाला म्हणून आलेही, पण ते या तरुण, देखण्या, कामसू साध्यासुध्या इंदूच्या प्रेमात पडले. तिलाही तो वैरागी वेशातला तरुण भावला होता. तेजस्वी वाटला होता. त्यांनी मोलकरणीपासून ते आईपर्यंत, इंदूची सर्व माहिती गोळा केली होती. अखेर 9 ऑगस्टला हे लग्न पक्के झाले. लग्न होईपर्यंतचा काळ संस्मरणीय होता. आधी लग्नाचा विचारही मनात नव्हता मुरलीच्या. पण इंदूला पाहून तो आला नि ‘विचार येताच मी विवाहित झालो’ असे त्यांनी म्हटलेय. ते लग्न झाले मात्र 18 डिसेंबर 1946 साली. भट भिक्षुकांना आयुष्यात पुढे कधीही थारा न दिलेल्या या माणसाने लग्नापुरते ते सहन केले. एकदाच आयुष्यात कमलाबाई होस्पेट यांनी या लग्नातील जबाबदारीत सिंहाचा वाटा घेतला होता. त्या म्हणजे इंदू नावाने सासरी आल्या साधना आमटे बनून. त्या काळात बायकोला मदत करणारा, जोडीने स्वयंपाक घरात उभा राहणारा नवरा? बाप रे बाप! साधनाताई मग सासरच्यांच्या दोडक्या झाल्या, बाबांमधला प्रियकर आणि पती एकाच वेळी कार्यरत होते. बाबांच्या आईने या लग्नाआधी कित्येक वर्षे बंधमुक्त जगात प्रवेश केल्याने आमटे कुटुंब याबाबतीत दुःखी होते. साधनाताई एक सुरेख वाक्य लिहून ठेवतात. ‘‘हे सुंदर प्रेमाचे रोप रोज लावतात; पण ते रोप वाढत असताना त्याच्या सभोवताल येणारे गैरसमजुतीचे तण काढून टाकायचा प्रयत्नही करत नाहीत.’’ सांसारिक आयुष्यातले हे सत्य खरेतर प्रत्येक विवाहितेने अनुभवले आहे. खरे ना? लग्नानंतर वरोरा येथील हरिजन वस्तीने केलेले उत्स्फूर्त नि प्रेमळ स्वागत, घरातील संन्यासी जीवनप्रवाहाचा पसारा, हे सारे वेगळेच. पण अत्यंत वाचनीय प्रसंग पुस्तकात आले आहेत. पहिली काही प्रकरणे अशी सांसारिक आहेत.

विकास आणि प्रकाश ही दोन मुले म्हणजे अपत्य वैभव. शाळेत नियमित जाऊ लागले तेव्हा कुणी मित्रच नव्हते. ‘‘बाबा, आम्हाला मित्र विकत आणून द्या,’’ असेही म्हणत दोघे. म्हणजे बघा! बरे राहणे, जगणे, साप, विंचू, इंगळ्या, घोरपड, अजगर, वाघ, कोल्हे, लांडगे यांचे समवेत. वाचून कसे विचित्र वाटते ना? कृष्ठरोग्यांची बाबांनी केलेली सेवा सर्वपरिचित आणि एकमेवाद्वितीय आहे. आनंदवनाचा ‘स्वयंसेवा’ हाच स्थायीभाव! त्यामुळे रात्रीची भांडी बाबा घासत. देशी-परदेशी अनेक पाहुण्यांचे स्वागत आनंदवन करीत असे, मुले आईला इंदू म्हणत.

बाबांना झालेले विविध आजार नुसते ऐकले तरी मनाचा थरकाप उडतो. बाबा ऑपरेशनसाठी मुंबईत गेले असता दाट जंगलातला वड पूजेसाठी निवडून गीताईची अठरा आवर्तने आणि एकशेआठ प्रदक्षिणा घालणारी इंदू मन थक्क करते. शेवटी त्या म्हणतात, माझा विश्वास, माझी श्रद्धा फळाला आली. 1956 साली सिस्टर लीला नावाची ग्रीक बाई आनंदवनात आली. त्याच सिस्टर लीलाने दिल्लीस गेल्यावर घडविलेली ‘इंदिरा भेट’ स्वप्नवत वाटावी. इंदिराबाई भेट संपल्यावर गाडीपर्यंत पोचवायला आल्या! अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, देवेंद्रभाई गुप्ता, प्रेमभाई, सुब्रमण्यम आणि अनेक गांधीवादी कार्यकर्ते येथे येत. आनंदवनात गरीब, श्रीमंत कोणी नव्हते. साऱयांचा आर्थिक स्तर एक ठेवण्याकडे आमटे कुटुंबाचा कटाक्ष होता.

1958-59ला त्यांनी हिमालय यात्रा केली. सुमारे महिनाभराचा प्रवास झाला. बाबांच्या मागे दुखण्यांची रांग लागे… पण पत्नीने सारे सोशिकपणे निभावले. साधना बाई म्हणतात, ‘‘साऱया दुखण्यांना सामोरे जात महारोग्यांचे जीवन बाबासाहेबांनी घडवले असले तरी त्यांचे संसार मी उभे केले.’’ काही पत्रे या पुस्तकाचा सुंदर भाग आहेत. वि.स. खांडेकरांचा पत्रभाग अतिसुंदर! आनंदवनात येणारे जगभरातले पाहुणे नि आपले पु.ल.ही! आनंदवनाला आर्थिक योगदान देणारे कुसुमाग्रज भावून जातात. विश्राम बेडेकरांचे पत्र, मालतीबाईंच्या चार ओळी! किती सुंदर आठवणी! प्रकाश मंदा आमटे विवाह सोहळा हृदयस्पर्शी. बारावे प्रकरण डोळ्यांना अश्रूंचा अभिषेक घालते. सप्तपदीतील सहा फेऱया पत्नीच्या नि सातवी बाबा नावाच्या अवलियाची! नर्मदेच्या कुशीतून विभक्त होण्याची. रसिका, खूप श्रीमंत होशील हे पुस्तक नव्याने वाचून.

‘समिधा’
साधना आमटे
पृष्ठ – 185
किंमत – 200
पॉप्युलर प्रकाशन

आपली प्रतिक्रिया द्या