गोनिदांची मानसकन्या

89

>> डॉ. विजया वाड

शितू निरपेक्ष… निखळ प्रेमाची कहाणी.

गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे मौज प्रकाशनगृहाने काढलेले ‘शितू’ हे ‘जुनं ते सोनं’ या सदरात मोडणारे पुस्तक. या पुस्तकाची 1961 साली, शालेय आयुष्यात मी पारायणे केली होती, इतके वेड लावले होते. ‘शितू’ ही व्यक्ती न राहता समष्टी होते हे खरे यश. प्रेम हा जीवनाचा अविभाज्य घटक, किंबहुना स्थायीभाव असला पाहिजे हेच ‘शितू’ वाचता वाचता मनावर ठसते. गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या लेखणीचे हे सामर्थ्य आहे. नव्याने ‘शितू’ची आवृत्ती निघायला हवी. लेखक जगण्यासाठी देशावर राहिले तरी त्यांची कोकणची, मूळ प्रदेशाची ओढ त्यांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येते. आपली माती माणसाच्या अंतरात्म्यात जागी असते. ज्यांना लेखनशक्ती आहे त्यांच्या शब्दातून ती प्रतीत होते नि त्यांची पुस्तके होतात तेव्हा ती वाचकांच्या हृदयावर राज्य करतात.
एखाद्या माणसाच्या नशिबाचा दुःख हाच स्थायीभाव असतो. सटवाईने पाचव्या दिवशी कपाळावर ‘अभागी’ हा शिक्का मारलेला असतो. जीवन म्हणजे अशा व्यक्तीसाठी गिच्च अंधारात विरलेली वाट. वारंवार रस्ता चुकतो, भय वाटते, सारे सोसण्यासाठीच आपला जन्म आहे असा निराशावाद घोंघावू लागतो आणि अशा अशांत आयुष्यात प्रेमाची एक झुळुक येते. आयुष्याला आशेची किनार मिळते. ‘जगावे’ वाटू लागते. खरंच हीच तर दुर्दैवी शितूच्या कथेची अनवट खेळी आहे.
कोकणची पार्श्वभूमी इथल्या तांबडय़ा मातीत आहे. झाडाझाडांत आहे. नारळी पोफळीत आहे. सारवण, खारवणात आहे आणि अभंग अशा प्रीतीत आहे.
‘सजणा, कसं सांगू तुला, तुझ्यावरी जडली प्रीत
स्पर्शाचे वेड न तिजला, तू तर रे मनमीत’
अशी एका कुळवाडणीची ही प्रेमकथा.
आप्पा हे केळशीचे खोत. सबंध गावाचेच नव्हे, देवाचेसुद्धा लाडके. त्यांचं स्वच्छ आवार, शेणाने सारवलेलं घर, फुले फुलून आलेली बाग, सोबत नारळी पोफळी नि या भाग्याच्या जोडीला स्वच्छ सुंदर मन.
एका पाठोपाठ ज्या मुलीचे दोन नवरे मेले अशा स्त्रीची-मुलीची हालत काय वर्णावी? ‘पांढऱया पायाची’ या शब्दावलीचा अर्थही जिला कळत नाही असं कोवळं वय नि ‘घोखाई’ ही कोकण्यांनी लावलेली विशेष उपाधी. अहो, आपल्या पायांकडे ती दहादा बघते, पण एक पांढरा ठिपका नजरेस पडत नाही पोरीच्या. मग आपल्याला ‘पांढऱया पायाची’ का बरं म्हणतात? तिच्या निरागस मनाला पडलेला प्रश्न काळीज हेलावून टाकतो. ज्याच्या बायका मरतात त्यास समाज ना कोणते दूषण देतो, ना असले नामकरण! स्त्रीच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन दूषित आणि अनुदार राहिला आहे हेच खरे, पण बाप आप्पा खोताच्या दरवाजात तिला आप्पांच्या पायाशी आणून सोडतो आणि शितूचे नष्टचर्य कमी कमी होत जाते.
आप्पांच्या मायेचा झुळझुळ झरा आणि एक संरक्षित नि निश्चिंत आयुष्य शितूच्या वाटय़ाला येते. आप्पांची मुले सदू नि विसू ही या कादंबरीतील दोन आणखी प्रमुख पात्रे. दोघांचे स्वभाव भिन्न. सदूशी शितूला काही देणे घेणे नाही, पण विसूशी असे मैतर जमते जसा…
‘विशुद्ध पाण्याचा निर्मळ झरा
प्रेममय जीवनाचा सूर स्वर खरा
जिथे लाभे मैत्रीचे सुंदर गीत
तिथे लोभावे जीव अन् फुले प्रीत’
पण हे सारे मोठेपणी. विसू वांड. अभ्यासाची आवड नसणारा. शितूला मारणारा, पण बाळपणीचा खटय़ाळ मैतर. ज्याचे मारणे लागत नाही असा दोस्त. पण तो शिकायला मामाच्यात जातो.
शितूची परवड मनभर! विसूशिवाय काही गोड लागत नाही. आप्पांच्या सेवेत काही कधीच कमी न पडू देणारी शितू आपला मैतर विसूची एकतर्फी वाट बघत राहते. महाडास मामाकडे राहून विसू शिकू लागतो. तो वांड बछडा शिकून सवरून परततो नि त्याच्यावर वेडय़ासारखे प्रेम करणारी शितू फुली फुलून येते. तसे तिचे शरीरही बहरले आहे. मोहाच्या फुलांनी सुंदर सुगंधी झाले आहे. विसू तिला नजरेत साठवत बघतो तेव्हा ती लाजून खाली बघते. त्याच्याकडे बघायचं टाळते. ‘‘का लाजतेस? जणू तुझी माझी आजच ओळख झालीय.’’ यावत ती बोलावं लागू नये म्हणून आत सटकते. ‘विसूदादा’ हे संबोधनच लहानपणापासून वापरत आलीय, पण विसूवर तिचं श्रद्धायुक्त एकनिष्ठ प्रेम.
कादंबरीत आप्पांचे जाणे जिवाला चटका लावून जाते नि त्या मन-विषण्ण अवस्थेत वाटण्या करूया म्हणणारा सदू व्यवहारी जगाचे दुष्ट दर्शनही वाचकास घडवितो.
या जगाला खंत नाही कोण कोठे सांडले
मीच माझे, माझ्यासाठी, हिशोबाचे मांडले
हेच व्यवहारी जगातले कटु सत्य, सदूचे पात्र रंगवीत, लेखकाने शब्दांकित केले आहे. शितूचा तर स्नेहाधार संपला. मायेचे छत्र हरपले. आता विसूचे जेवणही कुळवाडीण करते. गावभर कलकल. खोताचे घर नासले.
माणसे माणसांशी असे का वागतात? प्रत्येकाच्या रक्तपेशी सारख्या असून? विसूचे शितूवर मनःपूत प्रेम आहे. पण शितूला कितीही आग्रह केला तरी ती ‘रातची’ झोपडीवरच जाते. लग्नास नाकारते. मरण बरे याहून असा विचार करते.
शेवट येथे सांगत नाही. एव्हाना तो आपल्या मनात कारुण्याच्या धबधब्याखाली विसावलाही असेल.
‘दैव ज्यात दुःखे भरता दोष ना कुणाचा। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।’ या गदिमांच्या ओळी आठवा फक्त, उत्तर मिळून जाईल.
आणि ही गोष्ट सांगणारा म्हातारा कोण? विसू का? होय हो! मरण नाकारणारा… जिवंत मरण भोगणारा. ‘शितू, शितू गं…’ म्हणून हाकारणारा तोच तो… विसूच! ही प्रेमकथा आज घडीलाही वेड लावणारी नि म्हणूनच पुनःपुन्हा वाचावीशी वाटणारी… ‘शितू’.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या