स्वामी : काव्यमय प्रेमगाथा

68

>> डॉ. विजया वाड

रणजित देसाई. अद्भुत लेखणीचे स्वामी. याच सिद्धहस्त लेखणीतून रमा-माधवाची सुगंधी प्रेमकथा साकारली…

खाद्या पुस्तकाच्या 1962 ते 2007 या काळात 26 आवृत्त्या निघाव्यात. 27वी 2009ला निघावी, हे केवढे भाग्य. खरे ना? श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या अल्पायुषी पण अत्यंत कर्तबगार कारकीर्दीचा आलेख म्हणजे रणजित देसाई यांची काव्यमय ‘कादंबरी’ स्वामी. रमा-माधवाचे प्रेम यात इतके संयतपणे व्यक्त होते की, वाचताना एखादी प्रेमगाथा वाचत आहोत अशी वाचकांची स्थिती होते. लहान वयात पेशवाईची वस्त्रे अंगावर घातली नि मोठी जबाबदारी किती नेटाने पार पाडली त्या कर्तृत्वाचा आलेख स्वामीत जागोजागी प्रत्ययाला येतो. ऊर अभिमानाने भरून येतो.

खरे तर ऐतिहासिक कथा लिहिणे हा रणजित देसाई यांचा छंद. पण वि.स. खांडेकर यांनी देसाईंपाशी आग्रह धरला की, त्यांनी ‘माधवराव पेशवा’ कादंबरीरूपात वाचकांच्या हाती सुपूर्द करावा. अहो ऐतिहासिक कथा लिहिणे आणि कादंबरी लिहिणे यात महद्अंतर आहे. हे अवघडलेपण कादंबरी लिहिताना लेखकासही पदोपदी जाणवले. मग अनेक ठिकाणं, व्यक्ती यांच्या भेटीगाठी अपरिहार्य ठरल्या आणि या साऱ्यातून साकारली एक अजोड कादंबरी – ‘स्वामी’.

‘स्वामीकार’ म्हणून समाजात मान्यता पावलेले रणजित देसाई म्हणतात, ‘‘एखादा गायक आयुष्यभर संगीताच्या मैफली करीत असतो, पण त्यातल्या काही थोडय़ाच मैफली रंगून जातात. राग तेच! रियाझही तोच! पण नेमक्या अमूकच मैफली का रंगतात याचे उत्तर ना गायकाजवळ असते ना रसिक श्रोत्यांजवळ! ‘स्वामी’ रसिकमान्य झाली, एक कलाकृती जमून गेली, एवढंच समाधान आज माझ्याजवळ आहे.’’

या कादंबरीत आनंदीबाई यांचे पात्र ठसठशीत रंगविले आहे. अतिशय रूपवान, दागिन्यांची खूप हौस असलेली ही स्त्री. आपला पती कर्तबगार आणि सत्ताधारी असावा असे कोणत्या स्त्रीस वाटत नाही? पण माधवराव यांच्या कारकीर्दीत त्यांना फारसे महत्त्व नव्हते अन् रमाबाई आणि आनंदीबाई यांच्या वयातही फारसे अंतर नव्हते असे ‘स्वामी’कार म्हणतात. तसेच आपण इतिहासतज्ञ नसल्याने जे वाचले, जे आठवले त्याच्या अनुरोधाने कादंबरीतले प्रसंग शब्दांकित केले असेही नमूद करतात.

माधवराव पेशवा म्हणून फार प्रभावी ठरले. त्यांची कारकीर्द अल्पायुषी जीवनामुळे ‘अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ अशी झाली हा अत्यंत दुर्दैवाचा भाग. पण आई-मुलाचे नाते करारीपणाच्या ओघात करपून जावे हा दैवदुर्विलास मनास इतका डाचतो की डोळे थांबत नाहीत. गोपिकाबाई अंतकाळी माधवरावांना भेटल्या नाहीत याचा अर्थ त्यांना माधवरावांबद्दल प्रेम नव्हते असा थोडाच होतो? पण त्या जुन्या पिढीतल्या होत्या. करारी होत्या नि प्रतिज्ञेसाठी करारी माणसे ज्या कठोरपणे स्वतःस वागवितात त्याचाच आविष्कार होत्या.

आता रमाबाईंकडे वळूया. रमा-माधव यांची हळूवार प्रीती, राज्यकारभार हाकताना जे चार-दोन विसाव्याचे क्षण हाती येत त्यातला हा मधुवा! शैलीही शालीन! माधवरावांना फार थोडे आयुष्य लाभले. राजयक्ष्मा! पण ते रमेची व्याकुळ मनःस्थिती ओळखतात नि तिची समजूत काढतात. आपण अल्पायुषीच आहोत हे ध्यानात आल्यावर ते रमेला म्हणतात, ‘‘रमा जीवन किती वर्ष जगला याला फारसा अर्थ नाही. जीवन कसं जगला याला अर्थ आहे. नाहीतर चंदनाचे नावही राहिले नसते. सगळय़ांनी वटवृक्षाचंच कौतुक केलं असतं! जो आनंद चंदनाच्या माथी लिहीलाय तो आम्ही उपभोगतो आहोत.’’

समीप आलेल्या मृत्यूचे स्वागत करणारे माधवराव पेशवे वाचकांना मात्र कंपायमान नि हळवं हळवं करतात. मृत्यूची हाक ऐकणाऱया पतीला रमाबाई जेव्हा ‘स्वामी’ म्हणून अंतसमयी हाकारतात तो प्रसंग तर हृदयाचे पाणी पाणी करतो.

‘लेखणीने जे लिहावे, तीस नमोस्तुभ्ये म्हणावे
इतिहासे रंगोनी जावे, शब्दशब्दी मन गुंतावे
हा न केवळ इतिहास, हा तर वाङ्मयाचा श्वास
हा न केवळ एक प्रवास, हा तर सत्याचा आभास
‘स्वामी’ संगे तीही गेली, धगधगत्या ज्वालांची जाहली
एक कहाणी अमर झाली, रमा-माधवासंगे गेली’

प्रिय वाचकांनो, सती जाणे सोपी का गोष्ट आहे? तेही इतक्या तरुण वयात? त्यासाठी नुसते प्रेम असून भागत नाही. पराकोटीचे धारिष्टय़ अंगी असावे लागते. हूं की चूं न करता अग्नीच्या ज्वाला अंगावर झेलणे सोपी गोष्ट आहे? अलबत् नाही! पण कादंबरी काळजाचा ठाव घेत तेथेच संपते. ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी पदरासोबत. तो श्वेतपदर मनात रूततो. हुंदका आत आत जिरतो नि प्रेमाचे ते उदात्तीकरण स्तिमित करून जाते. शब्दप्रभू कादंबरीकार वाचनानंतर मनभर उरतो हेच शब्द प्रपंचाचे यश!

‘स्वामी’ रणजित देसाई
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठ- 417, मूल्य – 160 रुपये

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या