झुंझार मुलीची कथा

>> शशिकान्त लोखंडे

कॅनडातील वृत्तपत्रकार तिमिरी एन. मुरारी यांची ‘द तालिबान क्रिकेट क्लब’ ही कादंबरी आतापर्यंत आठ देशांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तिचा मराठी अनुवाद अमृता दुर्वे यांनी केला आहे.

काबुलमधील सर्वस्तरीय वास्तव सांगणारी, हेलावून टाकणारी विलक्षण कथा या कादंबरीत आहे. प्रेम, धैर्य, दृढ आकांक्षा, भावावेग, आकर्षण, आवड आणि जुलूम या संबंधीची चित्रणे तित आहेत. क्रिकेट माध्यमातून स्वातंत्र्य मिळविण्याच्या संधीकरिता धडपडणाऱया अफगाण तरुण-तरुणींची ही जिगरबाज गोष्ट आहे. तथापि हरएक अफगाण माणसाला नित्य आयुष्यात धोके कसे पत्करावे लागतात आणि प्राथमिक, साध्या गोष्टींपासून कसे वंचित राहावे लागते याची जरी ही कहाणी असली तरी प्राप्त धोकेदायक परिस्थितीतूनही सुंदर आयुष्य घडविण्याची उमेद लोकांमध्ये कशी आहे, याचाही निर्देश या कादंबरीत आहे.

ही गोष्ट आहे तरुण रुख्सानाची. अफगाणिस्तानातल्या ‘काबुल डेली’ नामक वृत्तपत्र कचेरीत ती पत्रकार म्हणून काम करते आहे. घरी आजारी म्हातारी आई आणि धाकटा भाऊ जहान यांची ती जिवापाड काळजी घेत राहते. तथापि तालिबानच्या राज्यात तिचे आयुष्य तिच्या लेखणीमुळे एका वेगळय़ाच संकटात सापडते आहे. अशा वेळी अफगाणिस्तानची पर्यायाने तालिबानची जगात वेगळी अस्तित्व प्रतिमा घडवण्यासाठी तालिबान क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा करतात. जिंकणारी टीम पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरते, त्यातून जगभरात अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व होणार असते.

याबाबत रुख्साचे दुःख वेगळे आहे. तालिबान हे क्रिकेट खेळ नियमानुसार व खेळाच्या सचोटीने कधीच होऊ देणार नाहीत याची तिला मनोमन खात्री आहे. टीम तयार करण्याची मुभा सर्वांनाच आहे, पण हा खेळ अफगाणिस्तानात कोणी कधीही खेळलेला नाही. सख्सानाशिवाय हा खेळ कुणालाच येत नाही. तिला स्वातंत्र्य, मोकळीक हवी आहे. अफगाणिस्तानातील तालिबान हे स्वातंत्र्य, मोकळीक कुणासही देऊ इच्छित नाहीत. ही कादंबरी म्हणजे तिचं अंतस्थ आत्मकथन आहे.

ही कादंबरी दोन भागांत आहे. दुसऱया भागात परवेझ आणि वीर यांचं कथन आहे. अखेर ती आपल्या भावी पतीसह-वीरसह पाकिस्तानात पोहचते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अन्वर खान त्यांचं स्वागत करतो. स्टेट टीमचे पासपोर्टही न उघडता ते परदेशीय पाहुणे या अर्थाने त्यांना समजून घेतलं जाते. तरीही ‘‘पक्ष्याला किंवा प्राण्याला त्याच्या पिंजऱयाचा दरवाजा उघडा दिसावा, तसं आमचं झालं होतं. पलीकडच्या स्वातंत्र्याची आम्हाला भीती वाटत होती. यात काही धोका तर नाही.’’ पृ. 294. हा ताण म्हणजे अनोळखी व्यक्तींपासून असणारा ओळखीचा धोका होता. वीर आणि रुख्साना कराचीत विमानानं उतरतात. त्यात परवेझ, कवाद, नामदार, ओमेद तिच्यासोबत होते. ते क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यानिमित्ताने पाकिस्तानात होते. अशीही स्वातंत्र्य ध्यासाची गोष्ट आहे.

अफगाणिस्तान स्त्रीवर प्रचंड पारंपरिक धार्मिक अशी कुबंधने आहेत. मानसिक गुलामी व शारीरिक छळवाद यामुळे स्त्री जीवन कोमेजून जळून खाक रोज होत आहे. अशावेळी मुक्तीमार्ग- क्रिकेट प्रशिक्षणाच्या माध्यमाने शोधणारी नायिका येथे आपल्याला दिसते. विशेष म्हणजे ती कौशल्याने जाचातून मुक्त होते. ही कादंबरी म्हणजे तिच्या मुक्तीची गाथा आणि जाहीरनामा आहे. मुक्तीचे प्रतिनिधित्व रूप म्हणजे ही नायिका होय. संबंध कादंबरी ताण, संघर्ष मानसिक नाटय़ यांच्या सुरेख उभारणी आहे. तिमिटी एन. मुरारी यांनी ही कादंबरी लिहून जगातील स्त्री वर्गाला जागृत केले आहे, हे विशेष होय. प्रतिवर्षी धर्म माणसाला किती निःसत्व करतो याचेच हे लक्षण म्हणता येईल.

विशेष म्हणजे अमृता दुर्वे यांनी केलेला अनुवाद अस्सल मराठी भाषेचे सौष्ठव घेऊन आला आहे. कुठेही वाचन अडखळत नाही. एवढी ओघवती मराठी शैली अमृता दुर्वेची आहे. एक वेगळे अफाट अनुवादविश्व समजून घेण्यासाठी रसिक वाचकांनी ही कादंबरी आवर्जून लक्षात घ्यावी, अशीच महत्त्वाची आहे.

द तालिबान क्रिकेट क्लब
लेखक – तिमिरी एन. मुरारी
अनुवाद – अमृता दुर्वे
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ – 296, मूल्य – रुपये 320/-

आपली प्रतिक्रिया द्या