चिरतरुण कथा!

416

>> डॉ. विजया वाड

शैलजा राजेंची स्वतःची अशी खास शैली आहे. त्यामुळे त्यांच्या कथा कोणत्याही काळात वाचकांच्या मनाला स्पर्शून जातात.

शैलजा राजे हे नाव एकेकाळी मराठी वाचकांच्या मनावर राज्य करीत होते. त्यांच्या कथांतील घरगुती नातेसंबंध सर्वांना इतके जवळचे, मनभावन वाटत की, त्यांना वाचकप्रिय लेखिका होण्याचे अहोभाग्य लाभले. ‘तू माझा सांगाती’ हा असाच या लेखिकेचा अतिशय लोकप्रिय कथासंग्रह. निशिगंधा प्रकाशनाने 2006 मध्ये पुण्यातून प्रकाशित केलेला एकूण 14 कथांनी हा संग्रह नटलेला आहे.

पहिलीच ‘मुक्त मी’ ही कथा एक शापित प्रेमकथा आहे. खूप वेगळी. प्रत्येकच माणूस तरुणपणी प्रेमात पडतो. किमान आकर्षणाच्या भोवऱयात तरी नक्कीच सापडतो. माणसं वेडी नसतात, वय वेडं असतं. कथेचा नायक शाम नि कथानायिका शकू! कॉलेजची ब्युटी क्वीन. याच्याहून वरचढ परिस्थितीतली, पण सारीच प्रेमं यशस्वी होत नाहीत. काही शेवटापर्यंत जातात नि लग्नाची माळ पाहू शकतात. काही अल्पजिवी ठरतात, मन ओरखडय़ांनी घायाळ होते नि झुरत, मरत, मरत राहते. जिवंत मरण! बहुशः श्रीमंतस्थळी प्रेयसी निघून जाते नि मग प्रियकराच्या वाटय़ाला भग्न स्वप्ने येतात. शकूही अशीच गेलीय श्यामच्या आयुष्यातून. घर नंतर ‘बोलके’ होते. ‘तरी मी सांगत होते दाताच्या कण्या करून श्रीमंत मुली अशाच बेभरवशी असतात’ असे आयाबायाचे बोलही ऐकू येतात.

हा धोका पचवून कथानायक आयुष्यात एक विशिष्ट उंची गाठतो अन् ‘ती’ सामोरी येते. कथानायक पन्नाशीत! ती मात्र तशीच! विशीत! तरुण, सुंदर, पण घायाळ! हे काय गौडबंगाल आहे? असं कसं शक्य आहे? असे विचार कथानायकाच्याच नव्हे तर वाचकांच्याही मनात घोळत असताना कळते की समोर ‘ती’ नव्हे तिची मुलगी आहे. त्याची ‘ती’ स्वर्गस्थ आहे. कथानायकाकडे आलेल्या या मुलीशी कथानायक का लग्न करतो? बापाच्या वयाचा नवरा? तर मुलीच्या गर्भात वाढणाऱया अवैध संततीला कायद्याने ‘वैध’ ठरवता यावे म्हणून.

असंभाव्य घटनांनी आयुष्य जेव्हा पार बदलते तेव्हा अशी कथा जन्माला येते. ‘घराबाहेर’ ही मीना या साध्यासुध्या संसारी स्त्रीची कथा आहे. आपण संसार करतो म्हणजे काय? रोजचेच दळण दळतो. तेच तेच सामान्य, अळणी, बेचव, बिनफोडणीचे जीवन! मीनाही त्याला अपवाद नाही. करे तो भी क्या?
पण अचानक पतीच्या खिशात पैसा सुळसुळू लागतो. कुठून आला हा लक्ष्मीचा फेरा? कशी काय लक्ष्मी इतुकी प्रसन्न झाली? तिला मोठाच प्रश्न पडतो. ‘नोकरीत बढती? तरीही इतकी?

‘‘तुला पाटल्या-बांगडय़ा कर,’’ असे म्हणण्याइतकी?
‘‘हे पैसे, ही सुबत्ता कोठून आली?’’ ती विचारतेच. कारण? अनपेक्षित सधनता येणार कुठून? ती वाममार्गाने तर नाही ना गृहात आली? चार मुलांची आई. साध्यासुध्या संसारात रमलेली! तिला या कृत्रिम, अवचित श्रीमंतीने गोंधळायला न होते तरच नवल.
नवरा थातूरमातूर मखलाशी करतो. ती करावीच लागते. त्याला कारण मिळालेली लक्ष्मी उष्टी असते. तुष्टीची नसते. नवऱयाच्या हातात सुटाच्या कापडाचं गठूळ! काय चाललंय काय?
हरामाचा एक छदामही न चालणारी माणसे जगात फार विरळा असली तरी ती ‘आहेत’ ही गोष्ट सर्वांस ज्ञात आहे.

‘‘भिकेचे डोहाळे असणाऱया माणसाला इतका ‘भार’, इतकं ‘सुख’ कसं सोसवणार? बिल्वर पाटलीचं?’’ सासूचं छद्मी बोलणं तिला साहवत नाही. ती दुखावते. फार कष्टी होते.

‘श्रममूल्याविना मज काही नको
सहजी ‘घ्यारे घ्यारे’ ऐशीवृत्ती नको,
ठेवी निर्मळ तू चित्त आता
हेच मागणे तुज भगवंता!

ही धारणा असलेल्या नायिकेला घराबाहेर पडण्यावाचून गत्यंतर आहे का? अप्रतिम कथा! पुस्तकाचे शीर्षक आहे ‘तू माझा सांगाती’ शीर्षकाला या पुस्तकात समापनाची कथा म्हणून आली आहे. सुधा आणि महेश ही प्रेमातली, बुलबुलची जोडी. त्यांचे भावजीवन – कामजीवन खास शैलजा राजे शैलीत वर्णिले आहे. एकमेकांचे शरीर आकर्षण तरुणपणी असतेच, पण या जोडीला त्यासोबतच एकमेकांच्या आवडी-निवडींबद्दलही आदर आहे. त्याने मशीनच्या, वंगण लागलेल्या, बरबटलेल्या, काळय़ा हातांनी जवळ घेतले. तरी सुधाची नो तक्रार बरं का! आणि महेशही तिच्या

गाण्या-वाचण्याच्या आवडीचा आदरच करणारा सहचर. खरोखर असे भाग्य अपवादात्मक जोडप्यांनाच लाभते जे शरीरापलीकडे जाऊन सहचाराच्या आवडीचाही आनंदाने स्वीकार करतात. लग्नाला जेमतेम आठ महिने झालेयत नि तिला पाचवा महिना चालूय. दिसीमाशी पोटातली गोड चाहूल तिच्या जीवनाला संपन्न करीत आहे. तशात महेश भरभक्कम पगाराची नोकरी सोडून देतो नि साऱया घराचा नूरच पालटतो.

‘जे आपुले म्हणून केले जवळी जवळी सदा
त्यास सहवासही आपुला वाटू लागला विपदा!
ही का ‘माझी’ ‘माझी’ माणसे आणि नाती?
कोठे गेली नोकरी संगे वाहुनी सारी प्रीती?’

अशी अवस्था. वहिनीचे सोडा हो! प्रत्यक्ष आईसुद्धा परक्या नजरेने लेकराकडे अविश्वासाने बघतेय?
एकटी बायको गोंधळून गेलीय घरातली माणसे अशी वागताना बघून! तिचा नवऱयाच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास आहे. तिला हेही कळते आहे की, दर महिन्याला भरभक्कम रक्कम देणारी नोकरी सोडल्याने उत्पन्न अनिश्चित होणार आहे. कारण ‘नोकरी टू धंदा! एक अवघड साधा! पैसा कधी मोप कधी खिसा खाली! साराच वांधा!’ पण तो अतूट विश्वासच साऱयांना वरचढ ठरतो. ‘तू माझा सांगाती’ एक उत्कृष्ट कथा! अवश्य वाचा! श्रीमंत व्हाल!

तू माझा सांगाती
लेखक –  शैलजा राजे
प्रकाशक – निशिगंधा प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 216,  मूल्य – 210 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या