खेळकर अनुभवकथन

>> प्रा. डॉ. वैभव ढमाळ

महाराष्ट्रातील आजच्या घडीचे एक तरुण व नामांकित वत्ते-लेखक प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘व्याख्यानांचे आख्यान’ हे पुस्तक म्हणजे साहित्य क्षेत्रातील वाचन-श्रवण संस्कृतीच्या भक्तीपोटी 25 वर्षांहून अधिक काळ कार्यप्रवण असलेल्या चिंतनशील वक्ता-लेखकाचे खेळकर अनुभवकथन आहे.

‘व्याख्यानांचे आख्यान’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. प्रा. जोशी यांनी नुकतीच त्यांच्या वत्तृत्व साधनेची पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत. या रौप्य महोत्सवी कारकीर्दीमध्ये व्याख्यानांच्या अनुभवाव्यतिरिक्त वक्ता म्हणून त्यांची स्वतःची होत गेलेली जडणघडण, साहित्यिक समारंभ, आयोजकांच्या गमती जमती, श्रोत्यांचे मानसशास्त्र, व्याख्यानांचे बरे-वाईट अनुभव यांविषयी विस्ताराने लिहिले आहे. या व्याख्यान प्रवासाचे आख्यान म्हणजे हे अनुभव कथन होय.

वत्ते जसे स्वतः घडत असतात तसेच श्रोतेही त्यांना घडवत असतात. प्रा. मिलिंद जोशी यांची अनुभवसंपन्नता, तीव्र स्मरणशक्ती, चिकित्सक निरीक्षणशक्ती, भाष्य करण्याची मार्मिक व मिश्कील शैली आणि वत्तृत्वाविषयीच्या आंतरिक तळमळीतून निर्माण झालेले हे पुस्तक वाचक-श्रोते-संयोजक व साहित्य चळवळीमध्ये काम करणाऱया प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे.

व्याख्यानांची गरज असणाऱया बाल-तरुण-प्रौढ जनांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, हे श्रोते दर्जेदार व्यासपीठांच्या दुष्काळामुळे सभास्थानी नाहीत. जर ते सभास्थानी नाहीत तर मग कुठे आहेत? व्याख्यानांची आवड-सवड आणि गरज नसलेला हा मोठा समूह मोबाईल, टीव्ही, वेब-सीरिज, गेमिंग, व्हॉटस्ऍप-फेसबुक इत्यादींच्या जंजाळात अडकून पडला आहे. समाजाचा एक मोठा घटक सभास्थानी व्याख्यानांचा आस्वाद घेण्यात दंग नाही, यापेक्षा तो विविध समाजमाध्यमांच्या आभासी जगात हरवला आहे हे अधिक धोकादायक आहे. त्यांना चांगले ऐकायला-पाहायला मिळत नाही, यापेक्षा ते फार वाईट ऐकत-पाहत आहेत हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. मोबाईल, टीव्ही, गेमिंग, वेब सीरिजसमोरचा सर्व वयोगटांमधील समाज लवकरात लवकर सभागृहांमध्ये आणून बसविणे ही काळाची गरज आहे. यासाठी ‘व्याख्यानांचे आख्यान’ हे पुस्तक साहित्य संस्था, वाचनालये, व्याख्यानमालांचे आश्रयदाते व संयोजक तसेच सुजाण श्रोतृवर्गाला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

‘व्याख्यानांचे आख्यान’ या पुस्तकामध्ये एकापेक्षा एक सरस अशा पंधरा लेखांचा समावेश आहे. प्रा. मिलिंद जोशी यांची व्याख्याने आनंददायक, व्यासंग खुसखुशीत आणि समयोचित असतात. व्याख्यानासारख्या गंभीर विषयावरचे चिंतनशील व अनुभवसमृध्द व्याख्यात्याचे हे खेळकर अनुभव वाचकांना हसवतात, रमवतात, विचार करायला प्रवृत्त करतात.

बार्शीतला एक शाळकरी मुलगा ते महाराष्ट्रातील नामांकित वक्ता असा त्यांचा व्याख्यान प्रवास प्रत्येक वयोगटातील वाचकांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा भजन-प्रवचन-कीर्तन, संगीत-नाटक, सण-उत्सव आणि ‘व्याख्याने ऐकून’ महाराष्ट्रातील अग्रगण्य वक्ता व लेखक होऊ शकतो. आपल्या सामाजिक संस्कारांचा व लेखन-वाचन-श्रवण संस्कृतीचा केवढा मोठा प्रभाव असू शकतो याची असंख्य उदाहरणे आपल्याला महाराष्ट्रात सापडतील.

‘हे तर त्या मंतरलेल्या दिवसांचे देणे’ या लेखामध्ये लेखकाला त्याच्या बाल-कुमार वयात लाभलेल्या (पोषक) सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व साहित्यिक वातावरणाचा सूक्ष्मातिसूक्ष्म तपशील दिला आहे. ‘आयुष्यानं दिलेली सर्वात सुंदर भेट’ या लेखामध्ये प्रा. शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान ऐकून शब्दशक्तीच्या अफाट ताकदीचा विलक्षण अनुभव कथन केला आहे. या अनुभवामुळे व प्राचार्यांचा जवळून सहवास लाभल्यामुळे लेखकाचे जीवन अंतर्बाह्य बदलून गेल्याचे ते सांगतात. ‘मी दम्यावर विजय मिळवला’, ‘अक्कलखाती जमा’, ‘भाषणांपूर्वीचे दिव्य’, ‘क्षण असे कसोटीचे’ या लेखांमध्ये अनेक बऱयावाईट अनुभवांविषयी बारकाईने लिहिले आहे. तरुण वक्त्यांसाठी हे सर्व लेख विशेष मार्गदर्शक ठरतील.

‘उमेदवारीचे दिवस आणि व्याख्यानातील गमती जमती’, ‘निमंत्रणांचे पक्षी’ या लेखांमध्ये त्यांना व्याख्याता म्हणून आलेले बहुविध अनुभव मार्मिक भाषेमध्ये सांगितले आहेत. बऱया-वाईट अनुभवांसोबत विविध प्रवृत्तीच्या आयोजक-संयोजकाची स्वभाववैशिष्टय़े गमतीशीरपणे मांडली आहेत. विनोदी प्रसंग व किश्श्यांची रेलचेल असलेले हे लेख फार खुसखुशीत झाले आहेत.
व्याख्यानांच्या निमित्ताने लेखकाचे महाराष्ट्रभर भ्रमण झाले. शेकडो गाव-शहरांमधील साहित्यिक, सामाजिक परिस्थितीची जाण त्या भ्रमंतीने आली. ‘भूमी आणि श्रवण संस्कृती’ या लेखामध्ये प्रत्येक गाव-शहराची अनेक वैशिष्टय़े लेखकाने तीक्ष्ण निरीक्षण शक्तीने नोंदवली आहेत.

‘व्यासपीठ नावाची पंढरी’ हा लेख नव्या-जुन्या आयोजक/ संयोजकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा एक धीरगंभीर उपक्रम असतो.
‘संधी दार ठोठावत असते!’ हा या पुस्तकातील एक महत्त्वाचा लेख आहे. योग्य वेळी संधीचा करून घेतलेला प्रभावी उपयोग याविषयीचे स्वानुभव सांगणारा हा लेख आहे.

कोरोनाच्या वातावरणात आज आपण सर्वजण काळाला शरण गेलो आहोत. माणसाचे व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन आमूलाग्रपणे बदलले आहे. साहित्य व व्याख्यान विश्वातही मोठे बदल झाले. प्रा. जोशींसारखे संवेदनशील वत्ते-लेखक अशा परिस्थितीकडे कशा प्रकारे पाहतात तसेच श्रवण संस्कृतीमध्ये कोणते नवे बदल झाले याचे निरीक्षण या लेखात नोंदवले आहे.
‘बोलावे नेटके’ हा या पुस्तकामधील शेवटचा लेख ‘‘वत्तृत्व ही केवळ शब्दांची आतषबाजी नसते तर श्रवण, वाचन, मनन आणि चिंतन यांसह केलेली जीवनाची उपासना असते’’ असे सांगणारा आहे. प्रा. मिलिंद जोशींसारख्या आजच्या काळातील नामवंत वक्त्याचे वत्तृत्व शास्त्राविषयीचे या लेखामधील विचार अत्यंत मोलाचे आहेत.
श्रवण संस्कृती संपन्न होण्यासाठी केलेली ही एक मनोज्ञ कृती आहे. साहित्य जगत त्याची निश्चितपणे नोंद घेईल.

व्याख्यानांचे आख्यान
लेखक – प्रा. मिलिंद जोशी
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.,
पृष्ठ – 166, मूल्य – रुपये 230/-

आपली प्रतिक्रिया द्या