दाद देताना

>> अरविंद दोडे

मैफलीत दर्दी श्रोते जेव्हा ‘वाहव्वा, क्या बात है’ अशी दिलखुलास दाद देतात तेव्हा कलावंताला धन्य धन्य वाटतं. कवी, लेखक, चित्रकार, शिल्पकार, गायक, वादक आदी कलाकार या ‘वाहव्वा’चे भुकेले असतात. दाद देण्याची उत्स्फूर्त ऊर्मी सच्चा रसिकाला आतूनच येते. अशाच काही गोष्टी आयुष्यात घडत असतात. पुस्तकवाचन, पर्यटन, आदरणीय व्यक्तिचित्रण, निसर्गदर्शन, विवेकाचे दीपप्रज्वलन, यादी पुष्कळ वाढवता येईल, अशा काही विषयांवर ललित समीक्षासंग्रह ‘वा’ म्हणताना हा आला आहे. तो वाचून वाचनीय समीक्षेचा सुरेख आनंद मिळतो आणि वाचक ‘वा’ म्हणतो.

‘वाचककेंद्रित समीक्षा’ हा नवा समीक्षा प्रकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सादर केला आहे. साधारणतः समीक्षा ही रुक्षच असली पाहिजे, असा इतिहास आहे. त्यामुळे चार समीक्षक एकमेकांचा तिरस्कार करून ‘अरे वा’ म्हणतात. बाकी कोण किंमत देते त्यांना? पदव्यांसाठी नाइलाज म्हणून समीक्षाग्रंथ अभ्यासले जातात. सामान्य वाचक समीक्षा कधी न वाचता पुस्तक चांगले किंवा वाईट ठरवतात. या गोष्टींचा ऊहापोह न करता अनेक लेख लेखकाने रसदार आणि कसदार लिहिले अहेत. विंचुर्णीचे धडे (गौरी देशपांडे), चौघीजणी (अनुवाद ः शांता शेळके), अन्न हे पूर्णब्रह्म (शाहू पाटोळे), पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र (स्नेहलता दातार), सांध्यपर्वातील वैष्णवी (ग्रेस), उंच वाढलेल्या गवतासाठी (अरुणा ढेरे), सावित्री (पु. शि. रेगे), गोटय़ा (ताम्हणकर), आहे मनोहर तरी (सुनीता देशपांडे), मौनराग (महेश एलकुंचवार) अशा दर्जेदार पुस्तकांचा आस्वाद कसा घ्यावा, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक.

याशिवाय माहितीपूर्ण पुस्तकांबाबत गोडी वाटावी म्हणून काही आवश्यक ग्रंथांचा परिचय करून दिला आहे. या आस्वादाचा अभ्यास इतके ललितरम्य आहे की, बहुसंख्य वाचकांनी वाचायलाच हवा. ‘वाचन साक्षरता’ हा प्रकार म्हणजे काय वाचावं, याचे मार्गदर्शनपर धडे आहेत.
परिशिष्टात समीक्षेचा परिचय करून देताना लेखकाने पूर्वपीठिका सांगितली आहे. समीक्षेचे काही प्रकार आहेत. लेखककेंद्रित, वाचककेंद्रित, सदर्भाधिष्ठाrत, संहिताकेंद्रित, स्त्रीवादी, मार्क्सवादी, मनोविश्लेषणात्मक, आदिबंधात्मक… हुश्श! सारेच रूक्ष, पण एक अभ्यासक म्हणून रसास्वाद घेताना, वाचक दाद देताना मनोमन सुखावतो आणि म्हणतो, ‘वा!’ मराठीतला हा बहुधा पहिलाच समीक्षाग्रंथ असावा, जो वाचकास सहज समजू शकतो. टुकार टीव्ही मालिकांमुळे जीवनातील साहित्यमूल्ये हरवत चालली आहेत. ती जपण्यासाठी अशा वाटाडय़ांची फार गरज आहे.
‘वा!’ म्हणताना

लेखक – डॉ. आशुतोष जावडेकर
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे – 30
पृष्ठ – 192, मूल्य – रुपये 250/-

आपली प्रतिक्रिया द्या