अभिप्राय – अजोड वीराची शौर्यकथा

122

>> डी. एन. मोरे

मराठेशाहीच्या अस्त काळात आपल्या पराक्रमाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा योद्धा म्हणजे यशवंतराव होळकर.

मालाकार चिपळूणकरांनी त्यांच्या ‘इतिहास’ या अत्यंत गाजलेल्या निबंधात हिंदुस्थानातल्या पराक्रमी पुरुषांची एक नामावली प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये विक्रमादित्य, पोरस, छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, महाराजा रणजीतसिंग यांच्याबरोबरच यशवंतराव होळकरांचे नावही आदर आणि कौतुकाने घेतले होते. मराठेशाहीचे दुर्दैव हे होते की, 1995 मध्ये सवाई माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर एकापाठोपाठ एकेक कर्तबगार माणसे कालवश झाली. त्यात महादजी शिंदे, तुकोजी होळकर, देवी अहिल्याबाई, सेनापती हरिपंत फडके आणि नाना फडणवीस. जवळजवळ सात – आठ वर्षे पुण्यातच दुसरा बाजीराव, शिंदे आणि होळकर ही मंडळी घुटमळत राजकारण करीत बसल्याने उत्तर हिंदुस्थानातून मराठेशाही मूलतः उखडली गेली. दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये चांदताऱयाबरोबर मराठय़ांचा भगवा 18 वर्षे 1782 पासून फडकत होता तो 1800 च्या सुमारास खाली उतरवला गेला. तेथे युनियन जॅकचे आगमन झाले.

यशवंतरावांचे म्हणणे तरी काय होते? ‘हिंदूंनी साऱयांनी एकत्र येऊन फिरंग्यांविरुद्ध लढा लढावा. त्यांना समुद्रापार लोटून द्यावे! हिंदूंची एकजूट झाली पाहिजे. आम्ही तर आमरणान्त इंग्रजांशी लढणार आहोत, पण आम्ही एकटय़ानेच लढावे व इतरांनी केवळ तमाशा बघत राहावे का?’

यशवंतराव या धडपडीपायी किती दूरवर धावले, इंग्रजांना त्यांच्यामागे पळावे लागले हे बघितल्यावर आश्चर्य वाटते. लाहोर, अमृतसरपर्यंत व्यासगंगा नदी पार करून अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत हा माणूस पोहाचला होता. अत्यंत प्रवाही, शैलीदार, अभ्यासपूर्ण भाषेत कादंबरीकार ओगल्यांनी तो सारा चरित्रपट मराठी वाचकांसमोर ठेवला आहे.

मराठी साहित्यात यशवंतराव होळकरांविषयी गैरसमजच जास्त. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देणारे हे लिखाण आहे हे नक्की!

कादंबरीचे मुखपृष्ठही अत्यंत आकर्षक आहे.

 

महाराजा यशवंतराव होळकर

लेखक अनंत शेकर ओगले

प्रकाशक – व्यास क्रिएशन

पृष्ठ – 128 मूल्य – 160 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या