दखल – नातेसंबंधांची सुरेख गुंफण

191

>> डॉ. सुरेश सावंत

साने गुरुजी म्हणाले होते : ‘करील मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभूशी तयाचे।’ त्यापुढे जाऊन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते : ‘करील मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे। जडेल नाते प्रभूशी तयाचे।’

याचा अर्थ इतकाच की, बालसाहित्य आणि बालशिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बालसाहित्याला फार मोठी समृद्ध परंपरा आहे. तथापि बालसाहित्य हा एकूण साहित्यक्षेत्रातील उपेक्षित घटक आहे. कारण ज्यांच्यासाठी ते लिहिले जाते, तो घटक म्हणजे मूल, तेच मुळात उपेक्षित आहे.

एकनाथ डुमणे यांचा ‘थेंबफुले’ हा बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या संग्रहात एकूण 32 कविता आहेत. कवितांचे विषय बालकुमारांच्या अभिरूचीला आवडतील असेच आहेत. बालकुमार वाचकांना पशू-पक्ष्यांचे जग नेहमीच आकर्षित करीत असते आणि म्हणून त्या विषयावरच्या कविताही त्यांना आवडतात. ‘थेंबफुले’ ह्या संग्रहात चिऊताई आहे, मनीमाऊ आहे. माकड आहे, बोकड आहे, बैल आहे, उंदीर आहे, कुत्रा आहे, वानर आहे, घोडा आहे, कोंबडा आहे, मेंढी आहे, गाढव आहे. एका झाडाला तर बगळ्यांचीच फुले उमलली आहेत.

बालकुमारांना निसर्गाचे अनाम आकर्षण असते. ‘थेंबफुले’ या संग्रहात आभाळात ढगांनी गर्दी केली आहे. विजा नाचत आहेत, वारा वाजत आहे, गारा टपटपत आहेत, पावसाची ‘थेंबफुले’ रपरपत आहेत. मुलांचा नेहमीचा आवडता खेळगडी चांदोबा ढगाआडून वाकुल्या दाखवतो आहे. बालकुमार वयातील मुलांना अद्भुतरम्यतेचे भारी आकर्षण असते. जादुगार, राक्षस, परी हे विषय बालकुमारांच्या मनाला मोहिनी घालतात. या कवितेतही एका बालकाच्या स्वप्नात परी आली आहे आणि ती त्याला घेऊन ढगात गेली आहे.

हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बालकुमारांना नातेसंबंधांचा बोध लवकर होत नाही. म्हणून कवी एकनाथ डुमणे यांनी ‘नाते’ या कवितेत नातेसंबंधांची फार छान गुंफण केली आहे. बालसाहित्य लिहिणं ही केवळ करमणुकीची गोष्ट नसते, तर ती जबाबदारीची गोष्ट असते. ही गोष्ट लक्षात घेऊन बालसाहित्यिकांनी लेखन केले पाहिजे. बालसाहित्यातून उदात्त जीवनमूल्यांचा परिचय होणे अपेक्षित असते.  आजच्या बालकुमारांना संगणक, उडत्या तबकडय़ा, अवकाश, अंतराळ, मोबाईल, सागरतळ, पर्वतशिखरे यांचा ध्यास लागला आहे. आता असे विषय बालसाहित्यात येणे अपरिहार्य झाले आहे.

बालसाहित्यिकाला बालमानसशास्त्राची चांगली जाण असावी लागते. जो मूल जाणून घेऊ शकतो, तोच उत्तम बालसाहित्याची निर्मिती करू शकतो. ज्याला मुलात मूल होऊन वावरता येतं, त्याचं साहित्य बालकुमार वाचक आवडीने स्वीकारतात. एकनाथ डुमणे हे पेशाने शिक्षक असल्यामुळे आणि बालकुमारांच्या भावविश्वाशी ते समरस होत असल्यामुळे त्यांना बालमानसशास्त्राची चांगली जाण आहे, हे ‘थेंबफुले’ वाचताना आपल्या लक्षात येते.

या कवितेतील एक मुलगा आजोबांना रस्ता ओलांडायला मदत करतो. ही वरवर साधी गोष्ट वाटत असली, तरी यातून कवी बालकुमार वाचकांना मानवी मूल्यांची ओळख करून देतो आहे, हे आपल्या लक्षात येते. बालसाहित्यातून बालकांच्या विचारांचा विकास व्हावा आणि भावनांचा परिपोष व्हावा, हे अपेक्षित असते. पण त्यासाठी कथाकवितेतून रुक्ष उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नसते. एकनाथ डुमणे यांच्या बालकवितेत रंजन आणि संस्कार यांचा ताल आणि तोल नीट सांभाळला आहे, असे दिसते.

पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश ‘झाड’ या कवितेतून मिळतो. बालसाहित्याची भाषा सुलभ, सुगम आणि सोपी हवी. या दृष्टीने विचार करता ‘थेंबफुले’मधील कवितेची भाषा ही बालकुमारांच्या वयोगटाशी संवादी आहे.

बालसाहित्यातून अंधश्रद्धा आणि कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरांचा पुरस्कार तर होत नाही ना, याची बालसाहित्यिकाला दक्षता घ्यावी लागते. आपल्या बालसाहित्यातून बालकुमारांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविता आला तर उत्तमच. यादृष्टीने एकनाथ डुमणे यांची ‘डॉक्टर मामा’ ही कविता लक्षात घेण्यासारखी आहे.  गंडे-दोरे बांधून आजार बरा होत नाही. त्यासाठी डॉक्टरांचीच आवश्यकता असते, असा संदेश ही कविता देऊन जाते.

एकेकाळी बालसाहित्यात केवळ नागरविश्वच येत असे. आता ग्रामीण भागातून लेखक-कवी लिहू लागल्यामुळे ग्रामीण जीवन बालसाहित्यातून येऊ लागले आहे. ‘थेंबफुले’मधील कवितेला ग्रामीण जीवनाचा स्पर्श आहे, हे त्यांच्या ‘कबड्डी’ या कवितेतून लक्षात येते. या संग्रहातील बहुतांश कवितांचे विषय ग्रामीण जीवनाशी संबंधित आहेत.

बालसाहित्य हे केवळ बालकांसाठी नसते, तर ते पालकांसाठी आणि शिक्षकांसाठीही असते. ‘थेंबफुले’ हा संग्रहदेखील बालकांसह पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून आनंद घ्यावा, असाच झाला आहे. एकनाथ डुमणे यांचा ‘थेंबफुले’ हा पहिलाच संग्रह असल्यामुळे यात पहिलेपणाच्या काही खुणा आहेत आणि त्या तशा असणेही स्वाभाविक आहे.  दा.मा. बेंडे यांनी केलेली संग्रहाची पाठराखण आणि प्रमोद दिवेकर यांचे मुखपृष्ठ पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात.

थेंबफुले’ (बालकवितासंग्रह)

कवी : एकनाथ डुमणे

प्रकाशन : तेजश्री प्रकाशन

पृष्ठ : 36 मूल्य : 50 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या