आभाळ व्यापून उरलेली आवली

356

>> डॉ. विजया वाड

तुकयाचे आकाशपण सगळय़ांनाच ठाऊक आहे. पण हे आकाश पेलणारी आपली नेहमीच दुर्लक्षित राहिली.

संत तुकारामांची दुसरी पत्नी एवढीच नि इवलुशीच ओळख त्या माऊलीची. संत तुकारामांची महती काय वर्णावी? विठ्ठल त्यांचा श्वास होता नि विठ्ठल त्यांचा ध्यास होता. संत तुकाराम सर्वसामान्य माणसाला खूप खूप आपले वाटावेत असे एक असाधारण व्यक्तिमत्त्व, त्यात ते सदेह वैकुंठाला गेले. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुतूहलमिश्रित आदर दाटून येतो. ‘तुका झालासे कळस’, ‘तुका आकाशाएवढा’ असे आपण लाडाने म्हणतो, पण ‘आवली’चे काय? तिची प्रतिमा इतिहासाच्या पानातून कशी उमटते? एक अतिशय भांडखोर, शिवराळ, कजाग, कर्कशा स्त्री! तर अशा या बाईची कथा, व्यथा म्हणजे ‘तुकयाची आवली’ हे पुस्तक. मंजुश्री गोखले यांचे शब्द पुस्तकाची वाचनीयता वाढवतात.

ज्याचे सारे लक्ष फक्त विठ्ठलभक्तीत आहे, त्याची संसारकथा म्हणजे आवलीचे जीवन. कल्पना करा, शून्य मिळकत घरी आणणाऱया नवऱयाची भक्ती अन्नपाण्यासाठी काय हो कामाची? जिचे मूळ नाव जिजाई, तिला तुकोबा आवली म्हणत. खरे तर जो तो द्रष्टय़ा माणसामागे धावतो, पण त्याच्या संसाराचे महावस्त्र विणणारी स्त्री मात्र दुर्लक्षितच राहते. आवलीची गोष्ट म्हणून तर महत्त्वाची ठरते. तिचा विलक्षण जीवन प्रवासवाचताना मन चक्रावते. पती आकाशाएवढा झाल्यावर त्याची सावली तरी कशी बनणार ना? पत्नीची गुदमरच!

आवली 14 खणांच्या ऐसपैस वाडय़ात राहणारी श्रीमंत, तालेवार अशा आप्पाजी गुळवे यांची लाडाची लेक. घरीदारी विठू माऊलीचे नाव तोंडी असणाऱ्या लोकांचा आवलीला राग येऊ लागला होता. या पुस्तकात विठोबा- रखुमाईला बोलते केलेय ते फार छान वाटते. देहूचे बोल्होबा आंबिले म्हणजे मोठे प्रस्थ! आवलीचे वडील आप्पाजी यांच्याकडे त्यांनी आपला मधला मुलगा ‘तुकाराम’ यांच्यासाठी मागणी घातली. बोल्होबाचे घर तालेवार होते. फक्त एकच अडचण होती की, तुकाराम याला दमेकरी, दुखणाईत बायको नि एक पोर होतं लहानगं! ‘‘तुमच्या आवलीस सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून नेतोय’’ असं बोल्होबांनी म्ह्टलं नि आप्पाजी जाम खूश झाले. ते लग्न लागलं नि आवली तुकोबाची पत्नी म्हणून या घरी आली.

या पुस्तकातल्या विठोबा- कनकाई आणि बोल्होबा हे तुकारामांचे आईवडील या लग्नाने अतिशय आनंदित झाले होते. आवलीचं लग्न अगदी थाटात पार पडलं आणि देहूकर मंडळी अगदी तृप्त होऊन गेली. आवलीच्या माहेरचं गुणाबाई हे व्यक्तिमत्त्व फार सुरेख रंगविलं आहे, पण अजिबात न बोलणारी आवली बघून तुकाराम बुवा म्हणाले, ‘‘आप्पाजींनी मला फसवलेलं दिसतंय. त्यांची मुकी मुलगी माझ्या गळय़ात बांधलीय.’’ यावर फणकारून ‘‘मी काही मुकी नाही. मला चांगलं बोलायला येतंय’’ म्हणणारी आवली वाचकांच्या मनात घर करते.

कनकाई एकटीच आवलीला जिजा म्हणायची. बोल्होबांच्या घरी कामाला असलेली सई हिजबरोबर आवलीची घट्ट मैत्री होती. सई रंगाने काळी होती आणि माणकू या तिच्या नवऱ्याची त्या काळय़ा रंगामुळे दोडकी होती. माणकू ‘‘मला काळी बायको नको’’ म्हणून रुसून बसायचा तेव्हा आवलीने हुशारीने डाव टाकला. ‘‘विठूराया सावळा चालतो, मग सई का नाही? ताबडतोब विठूभक्ती सोड.’’ विठ्ठलवेडा ताळय़ावर आला. त्याने आपले वर्तन बदलले. कारण विठोबाशिवाय त्याच्या जीवनाला अर्थच नव्हता ना!

ही इवलीशी कथा आपल्या पुस्तकात अंतर्भूत करून ‘काळ्या’ मुलींना सोसाव्या लागणाऱ्या यातनांवर जणू लेखिकेने प्रहार केला आहे. म्हणून तिचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते. काशी नि म्हाद्या या दोन पोरांना प्रश्न पडे, इतरांचे बाबा काम करून पैसे कमावतात, मग आपलेच वडील सारखे देवळात का जाऊन बसतात? आईचे फाटके लुगडे… आपली उपासमार… काहीच त्यांना दिसत नाही? अशात आप्पाजी येतात नि रया गेलेली जिजा बघून बापाचे मन तुटते. येतात ते यवढा भलामोठ्ठा खाऊ घेऊन की, मुले खूशम खूश.

‘हे सार्वत्रिक सत्य आपले अंतःकरण चुरगळून टाकते. चिंध्या नेसलेली आपली, तालेवार बापाची पोर शेणी विकायला जाते? आवलीचा तोंडाळपणा, आक्रस्ताळेपणा दिसतो इथे तिथे वाङ्मयात, पण तिने काय सोसले ते लक्षात घ्यायला पाहिजे. आप्पाजी तुकारामांची समजूत काढतायत. विठ्ठल ते ऐकतो नि त्यालाही कसनुसे होते. भक्तांचे अनंत अपराध पोटात घालणारा विठ्ठल… त्याचे अपराध कोण हो पोटात घालणार? ‘‘त्या काळय़ाचा मुडदा बशिवला’’ असं म्हणणाऱ्या आवलीने तसे का म्हटले हे कोण लक्षात घेतो? वारंवार हेच आणि हेच! भक्तिरसात दंग तुकोबांना काम करणे जमतच नाही अन् आवलीचा रुद्रावतार बघून विठ्ठलही घाबरतो. तुकारामबुवा लक्ष ठेवीत असलेल्या बाळाजीच्या खळय़ात पाचखडी धान्य पांडुरंग ओततो ते तुक्यासाठी! बाळाजी इतका चांगला की, त्यातलं ‘‘एक खडी धान्य तुक्याला’’अशी घोषणाच तो करतो.

संताचे, नेत्याचे, समाजसेवकाचे पत्नीव्रत ही किती कठीण गोष्ट आहे हे ‘तुकयाची आवली’ वाचून पटते. तिचा संताप, तिचा उद्रेक जायज वाटतो. तुकारामांच्या पोथ्या इंद्रायणीत तरल्या तो प्रसंग तर मनभावन. तिची अखेरची झोप आपलं मन पार भिजवून टाकते. शेवटी ‘कर कटेवरी ठेवुनिया उभा विठ्ठल’ मनभर उरतो.

तुकयाची आवली
लेखक –  मंजुश्री गोखले
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस,
मूल्य – 180 रुपये, पृष्ठ- 188

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या