याला जीवन ऐसे नाव

550

>> डॉ. विजया वाड

ज्योत्स्ना देवधरांच्या कथा. एक बहुरंगी जीवनानुभव असेच म्हणावे लागेल.

ज्योत्स्ना देवधर या लेखिकेचा ‘घालमेल’ हा कथासंग्रह खरोखर वाचनीय झाला आहे. प्रकाशन वर्ष 2014 असले तरी त्यातील कथा मात्र खूप आधीच्या काळातल्या आहेत हे रुपयांच्या मूल्यावरून लक्षात येते. पण मानवी भाव-भावना रुपयांच्या मूल्यापेक्षा फार वेगवेगळय़ा असतात. राग, लोभ, मोह, माया, शरीरसंबंधाची इच्छा कालातीत आहे. आता मत्सरग्रस्त लोकांची संख्या वाढली आहे. कारण महत्त्वाकांक्षा ही एकाच वर्गाची मक्तेदारी राहिली नाही. तळागाळापर्यंत तिने हातपाय पसरले आहेत. अर्थात महत्त्वाकांक्षा असणे हे प्रगतीचेच लक्षण आहे.

असो, तर मानवी भावनांचे सशक्त प्रकटीकरण म्हणजे ज्योत्स्ना देवधर यांचा ‘घालमेल’ हा कथासंग्रह. तर पहिल्याच ‘घालमेल’ या कथेत कथानायिका अनिता हिची घालमेल ही प्रत्येक सापत्य विधवेची घालमेल आहे. जिचा नवरा तरुण वयातच गेला आहे अशी अनिता दोन चिमण्या जिवांची आई आहे. एक मुलगी, एक मुलगा. मुलीला सासरी ठेवली आहे. नाशकात. मुलाला पुण्याला आईकडे आणि अनिता? पोटासाठी मुंबईत. जिवाची नुसती कुतरओढ. दर शनिवारी एकदा मुलीकडे एकदा मुलाकडे फेरी. त्यात नवा साहेब येणार ही खात्रीलायक बातमी समजल्यावर जिवाचा थरकाप. आपले शिक्षण कमी. तो नक्कीच म्हणणार, ‘आय ऍम गेटिंग अ बेटर क्वालिफाइड पर्सन इन युवर प्लेस.’ किती नि कशी दया भिकेत मिळणार?’ ‘इन्स्टिटय़ूट डोण्ट रन ऑन मर्सी! दे रन ऑन एफिशिअन्सी’ हेच म्हणणार ना तो?

पगार पाचशे. त्यातच सासरी-माहेरी मुलांसाठी पैसे द्यावे लागतात. त्यांचा मेंटेनन्स! जाऊ मुलीला सांभाळते… म्हणजे केवढे उपकार नं?… ‘बाळांना नीट सांभाळ हं आनि’… जाणारा जातो. सुटतो. जो जगत राहतो त्याला सगळय़ा गोष्टींचा सामना करावा लागतो. सगळय़ा अडचणींवर मात करावी लागते. परिस्थितीशी मुकाबला करावा लागतो.

अनिता शेवटी पुण्यास आईला सांगते.
‘बिजवर असूदे, घटस्फोटित असो… बघ एक पुरुष! नवरा म्हणून, जो माझ्या लेकरांना सांभाळेल.’
शेवटी जिवाची कितीही घालमेल झाली तरी रूक्ष व्यवहार उरतोच. असो यालाच जीवन म्हणतात.
एक अतिशय जमलेली कथा म्हणून या कथेकडे बघता येईल. वाचकांना वाचता वाचता अंतर्मुख करील अशी ही कथा ‘घालमेल’. ज्योत्स्ना देवधर यांनी या जगातून एक्झिट घेतल्यावर आलेला हा कथासंग्रह. 27 फेब्रुवारी 1926 ते 17 मार्च 2013 अशा जीवनपटाच्या तारखा गुगलवर दिसतात; पण कथा कोणत्या काळातली यापेक्षा ती किती अस्सल वाणाची यास्तव सारे महत्त्व उरते.
अशा कथागुच्छांमध्ये लक्षात राहील अशी आणखी एक कथा ‘याचि जन्मी’.
आजी आणि नातवाची कथा.
कर्तृत्ववान आजी नातवाला नकोशी होते. का? ती त्याला झाकोळतेय?
तिचा मुलगा मरून गेलाय. सून दुसरे लग्न करून निघून गेलीय. आजीचे यजमान, मुलाचे आजोबा स्वर्गवासी झालेयत. घरात ही दोघंच. आजीला नातू फार हवाय, पण नातवाला तिच्या सहवासाचं ओझं वाटू लागलं आहे. आजीच्या डोक्यावर वयोपरत्वे परिणाम झाला आहे आणि सायकिऑट्रिक ट्रीटमेंटसाठी तो आजीला डॉ. आनंद वीरकर यांच्याकडे घेऊन येतो.
गंमत बघा! या आनंदला मेडिकलला प्रवेश मिळावा म्हणून याच आजीनं तिच्या कर्तृत्वाच्या काळात शब्द टाकला होता. त्याला आर्थिक मदतही देऊ केली होती. ते सारं आनंदला आठवतं आणि मग?
‘केल्या उपकारा स्मरूनी, ठेविले आपल्याच सदनी
माय जैशी जपतो आपण, तैशी केली सेवा त्यांनी
परि मायेचे कवच तोडुनी, आजीस वाटे जावे इथुनी
नातवास घ्यावे जवळी अन्, मिठीत घ्यावे आपुला म्हणुनी
ही आजीची म्हणजे इंदुताईची इच्छा. मनभर एकच खंत आहे.
आपला रत्नासारखा मुलगा आपण गमावला. कर्तृत्वाचा जसा कैफच चढला होता. हे शल्य मनाला डाचत होते. पण आता कितीही टाहो फोडला तरी गेलेला जीव परत येणार होता थोडाच? मग नातवावर मायेचे अतिक्रमण – त्याला नकोशा असलेल्या आजीचे. नातवाने तर स्पष्ट शब्दांत सांगून टाकले आहे, ‘आजीला पूर्ण बरं वाटल्याशिवाय घरी पाठवू नका. पैशाला कमी नाही.’ हे काय? आनंद सरांशी बोलून हा आजीला न भेटता निघूनही गेला? आजीला होणाऱया मरणप्राय दुःखाची कल्पना वाचक करू शकतात.

अनपेक्षित धक्कातंत्र देऊन लेखिका ज्योत्स्ना देवधर यांनी ही वेगळय़ा वळणाची कथा संपविली आहे. या कथेचा शेवट सांगणे हा अपराध मी करणार नाही. वाचकांच्या उत्सुकतेला तडा जाऊ देणार नाही. ‘सरोगेट मदर’वरही त्या काळात बाईंनी कथा लिहावी याचे नवल वाटते. स्त्री-पुरुष तुलनेत संकटकाळी स्त्रीचा कस अधिक लागतो. ती संघर्ष अंगावर नव्हे, तर प्रसंगी शिंगावरही घेते, असा सूर लेखिकेच्या मनातून कागदावर उतरतो तेव्हा स्त्री वाचक नक्कीच सुखावतील अन् पुरुषवाचक विचारमग्न होतील.
ज्योत्स्ना देवधर यांची भाषा अलंकारिक नाही. ती हृदयाला सहज स्पर्श करणारी आहे. सोपे लिहिणे अति अवघड असते, पण तेच मग मनात, आत आत झिरपते, हे का मी रसिकांना वेगळं सांगायला हवं?
घालमेल, रेट, प्राक्तन, सोबत, मी ही अशी, मुंगळे, पाच दिवस, बेरीज, याचि जन्मी, राही, अंकुर, अडचण, अब्रू, डिसेक्शन, कमल अशा स्त्र्ााrप्रधान कथांचा हा नजराणा आहे.
कमल ही एका शाळेत शिकणाऱ्या, नुकतीच छाती येऊ लागलेल्या मुलीची कथा आपल्याला अस्वस्थ करून सोडेल. आपला नसलेला ‘उपरा’ बाप कसा असह्य होतो ती वेदना उरात डुचमळेल. जेव्हा कथा नायिकेची व्यथा वाचकाची स्वतःची व्यथा बनते तेव्हा ते खऱया अर्थाने लेखकाचे यश असते. ज्योत्स्ना देवधर या बाबतीत यशस्वी लेखिका नक्कीच आहेत.
आपण हा कथासंग्रह जरूर जरूर वाचा रसिकांनो. या जीवनस्पर्शी कथा वाचून आपण नक्की संपन्न व्हाल.

‘घालमेल’
लेखिका – ज्योत्स्ना देवधर
प्रकाशक – निशिगंधा प्रकाशन
पृष्ठे – 144
मूल्य – रु. 180/-

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या