नात्यांचे विविध रंग

317

>> विजया वाड

य. गो. जोशींच्या शेवग्याच्या शेंगा… एकाच घरातील प्रत्येक नात्याचे अंतरंग उलगडणाऱया…

प्रिय वाचकांनो, आपल्यातले जे अतिज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी एक प्रेमळ कहाणी पडद्यावर पाहिली होती. बेबी नंदा या गुणी नटीने त्यात प्रमुख भूमिका केली होती. त्या रुपेरी स्वप्नाचे नाव होते ‘शेवग्याच्या शेंगा!’ प्रसिद्ध कथाकार य. गो. जोशी यांची ही चित्रकथा. त्याच नावाच्या कादंबरीचा परिचय मी आपणास करून देत आहे.

एका जुन्या, मोठय़ा घरातल्या चांगल्या माणसांची ही गोष्ट आहे. त्यांची आयुष्यकथा सांगताना शेवग्याच्या शेंगांचे परसातले झाडही एक व्यक्तिरेखा बनून कथेत वेळोवेळी माणसांइतकेच रंग भरते. तेव्हा पुणे फार गजबजलेले नव्हते. रस्ता कितीतरी उशिरा चालू होत असे. आपण ज्या घराबद्दल बोलत आहोत त्या घराला मालकीण नव्हती. सतारीची तार चटकन् तुटावी तसा त्या घराच्या मालकिणीने विहिरीत जीव दिला होता. काका मात्र विहिरीच्या काठावर बसून भरल्या डोळय़ांनी आत डोकावून बघत.

श्रीनिवास, नारायण, अमृत ही काकांची मुले. अन् छोटी, गोडशी छकुली, तारका! आई गेली तेव्हा आठ-दहा महिन्यांची होती. तेव्हापासून काकाच तिची आई होते. तिची वेणीफणी ते प्रेमाने करीत. आईबद्दल या चौघांना काका नेहमी काही न काही भावभरे सांगत असत. फार हळवे झाले होते मुलांच्या बाबतीत.
काळ थांबत नाही. आईविनासुद्धा मोठे व्हावे लागते, व्हावेच लागते. समर्थ रामदासांनी म्हटले आहे ना… ‘मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ अगदी खरे आहे ते.
या कादंबरीतील ‘सुशिला’ ही स्त्री वाचकांचे लक्ष वेधून घेते. काका विधुर म्हणून दाखवायला आणलेली ही तरुण पोर! ही तीन मुलांची नि तारकेची आई होणार? का? गरिबीमुळे? काका स्वभावतः शरीरासक्त नाहीत. ते सुशिलाला मुलगी मानतात. सुशिलाचे पैशापायी अडलेले लग्न लावतात अन् सुशिला या घराची, मुलांची मावशी होते. त्या घराला, काकांच्या मुलांना खूप माया लावते.

यथावकाश श्रीनिवास, नारायण, अमृत यांची लग्ने होतात. नि घराला तीन सुना प्राप्त होतात. तारका मात्र भावंडांचा आँखो का तारा असते.
तारकेचे मावशी सुशिला आणि तिचे पती विष्णुपंत यांच्याशी मोठे स्नेहबंध जुळलेले असतात. ही दोघेही तारका आणि तिची तीन भावंडे यांचे लहानपणापासूनच खूप लाड करतात. काका मात्र विहिरीच्या काठावर बसून आपल्या बायकोशी गूज करीत रहातात. माणसे या जगातून गेल्यावरच त्यांची किंमत कळते का? काकांच्या साठीशांतीला पत्नीची आठवण त्यांना बेचैन करते.

या घराची सुखदुःखे ते शेवग्याचे झाड साक्षीदार बनून बघत आहे, इतकाली वर्षे. हळूहळू घरात नव्या सुना हक्क प्रस्थापित करू बघतात नि तारका वन्सं ‘उपऱया’ आहेत असं त्यांना वाटू लागतं. तारका मात्र असं कोणी बोललं की चवताळून उठते. दादाच्या बायकोनं घरात घेतलेल्या नव्या भांडय़ांवर स्वतःच्या पतीचे फक्त नाव घातलेले तिला कसे सहन व्हावे? दादा तिचा तसा नानू तिचाच! नि अमृतही! पण…
कलहाविना न रंगे… संसार कथा कोणाची
का विझू विझू होई… ही प्रीत अंतरीची?
पाही दुरून कोणी… क्षण ऊन सावल्यांचे
हाती कितीक उरले… प्रारब्ध शांततेचे
ऋषितुल्य होऊनिया… सुखदुःख पहायाचे
‘इतुकेच नशिबी’ म्हणते… ते झाड शेवग्याचे!
होय! हे शेवग्याच्या शेंगांचे झाड कथेचा ‘नायक’ बनते. मोठी वहिनी शेवग्याच्या शेंगा माहेरी नेण्यास काढते तेव्हा तारकेला राग येतो.
झोपेतच काकांचे आयुष्य संपते नि तारका खऱया अर्थाने पोरकी होते. शेवग्याच्या शेंगांची आमटी करायला गेलेल्या सुनेच्या हातून झाडाची एक फांदी तुटते नि त्यावरून घरात धर्मयुद्ध पेटते. खरे तर हा एक अपघात! पण भांडण एवढे विकोपाला जाते की एक भाऊ त्या झाडावरच कुऱहाड उगारतो, दुसरा ती ओरबाडतो तर हा तांबारतो. ‘‘आता हे झाड हलवून हलवून उखडतो बघ, नेस्तनाबूत करतो.’’

भांडणांची कारणे फार क्षुल्लक असतात, पण ती केव्हा उग्ररूप धारण करतील हे सांगता येत नाही. या झाडावरून घर, इस्टेट यांच्या वाटण्यापर्यंत वेळ यावी? काय हा दैवदुर्विलास? त्यात त्या छोटय़ा बहिणीचीही वाटणी? किती तुझे माझे! ‘याच्या घरी जर राहिलीस तर माझ्या घरी पाऊल टाकता येणार नाही’ ही भाषा?

मांजर उंदीर शोधते त्याप्रमाणे माणसेही प्रसंगाच्या उंदरावर टपलेली असतात. रक्तमांस खाल्ले म्हणजेच हत्या होते? अन् कोणाच्या मनाची शिकार केली तर ती हत्या होत नाही का? तारकेच्या मनाच्या चिंध्या चिंध्या होतात.
वहिनींनी माहेरी न्यायला शेंगा काढल्या त्या सर्वच्या सर्व शेंगा घेऊन तारका मावशीकडे काय जाते, सारे घर पेटून उठते. तारका रडत भावाला विचारते, ‘त्या घरावर, त्या झाडावर माझा काहीच हक्क नाही दादा?’

शेवटी रक्ताची ओळख ‘पाण्यापेक्षा दाट!’ अशीच ना? परत सारे उमगून एकीचे कमळ फुलते. पंगत झडते. आनंदाचा ‘वळीव’ बरसतो नि शेवग्याचे झाड ते सारे स्थितप्रज्ञ ऋषीप्रमाणे बघत असते. ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड. नाही का मित्रांनो! संतोष, आनंद, कौटुंबिक सुख या सुखक्षणांवर वाचकांना ते शेवग्याचे झाड नि तारका घेऊन जातात. या सुखासाठी वाचा, शेवग्याच्या शेंगा.

‘शेवग्याच्या शेंगा
य. गो. जोशी
पृष्ठ – 144
प्रसाद प्रकाशन – 1973
किंमत – 7 रु.

आपली प्रतिक्रिया द्या