परीक्षण – सुजाण पालकत्वाचा प्रभावी मंत्र

>> आराधना कुलकर्णी

मी विवेकानंद यांच्या मते, ‘मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण! संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय.’ या अनुषंगाने व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, व्यावसायिक, नैतिक विकास होणे तसेच राष्ट्रीय एकात्मता, विश्वबंधुत्व या वृत्ती घडणे ही शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. हे सर्व साधणे म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होय. यासाठी शिक्षण व संस्कार ही दोन साधने महत्त्वाची आहेत.

शाळा व कुटुंब या दोन्ही स्तरांवर ही ािढया औपचारिक व अनौपचारिकरीत्या घडत असते. म्हणून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची जबाबदारी शिक्षक आणि पालक यांनी संयुक्तपणे पेलायची असते. बालपण हा जीवनाचा पाया आहे. त्यात संस्कारांची जितकी भर पडेल तितके व्यक्तिमत्त्व समृद्ध होत जाते.

पालकत्व ही एक कला आहे आणि ती भावनिक व शास्त्राrय अंगांनी विकसित करता येते. यादृष्टीने पालकांना सजग करणारे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. लेखक सचिन जोशी यांचे ‘मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना’ हे ते पुस्तक होय.

हे पुस्तक पालकांना प्रशिक्षित करणारे आहे हे याचे वैशिष्टय़. आजच्या काळातील मुलांच्या संगोपनासंदर्भातील कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक, भावनिक इ. विविध प्रश्नांची दखल घेणारे व त्यावर उपाययोजना सुचवणारे हे पुस्तक पालकांना स्वयंप्रशिक्षित होण्यास निश्चित सहाय्यभूत ठरते. आजच्या गतिमान स्पर्धात्मक विज्ञान युगात याची आवश्यकता आहे.
लहान मूल म्हणजे ओली माती व शिक्षक त्याला योग्य आकार देणारा मूर्तिकार अशी उपमा दिली जायची. पूर्वी ही जबाबदारी केवळ शिक्षकांवर असायची. पालकही हे काम शिक्षकांचेच मानून निर्धास्त असायचे; पण आताचा काळ तसा नाही. केवळ शिक्षकांच्या हाती मुलांची जबाबदारी देऊन चालणार नाही. शिक्षण म्हणजे मुलांना नुसती पुस्तके शिकवणे, माहिती देणे नसून त्यांच्यातील सुप्त गुण व क्षमतांना फुलवणे, विविध अनुभवांतून त्यांना शिकण्यास मदत करणे हे शिक्षकांचे व पालकांचे काम आहे. शाळा कितीही महत्त्वाची आणि कितीही मोठी असली तरी आई-वडिलांना शैक्षणिक जबाबदारी घ्यावीच लागते. पालक, शिक्षक, विद्यार्थी हा शिक्षणातील त्रिकोण आहे. हे कोन परस्परांशी सुसंवादी असणे आवश्यक आहे या जबाबदारीचे भान देणाऱया लेखांचा संग्रह हे या पुस्तकाचे स्वरूप आहे. याची मांडणी ‘मुलांचा भावनिक विकास आणि मुलांचा शैक्षणिक विकास’ अशी दोन विभागांत केली आहे.

पुस्तकातील ‘मुलांचा भावनिक विकास’ या पहिल्या विभागातील प्रारंभीचा लेख ‘सुजाण पालकत्वाची मेख’ हा मुलांसाठी पालकांचा आधार किती महत्त्वाचा असतो हे दर्शविणारा आहे. यात ढोलकीच्या तालावर उंच दोरीवर कसरत करणाऱया डोंबाऱयाच्या लहान मुलीचे उदाहरण दिले आहे. एवढा धाडसी खेळाचा आत्मविश्वास तिला येतो कुठून? प्रेक्षकांना वाटते की, ढोलकीचा आवाज तिला प्रेरणा देतो; पण वास्तविक ढोलकी वाजवणारे तिचे आई किंवा वडील यांच्यावरील तिचा विश्वास हा तिच्यासाठी प्रेरक असतो. पालकांच्या प्रोत्साहनाने अवघड गोष्टीही मुले सहज करू शकतात हे यातून सिद्ध होते. मुलांचा असा विश्वास संपादन करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

या विभागात मुलांच्या विकासातील पालकांचा सहभाग, गोष्टींचे महत्त्व, नातलगांचे महत्त्व, मुलांचे राग व हट्ट, लाड व शिस्तीचे परिणाम, सणवारांचे महत्त्व इ. विषयांवर लेख आहेत. तसेच वाढ व विकासाशी संबंधित शास्त्राrय शोधांची माहिती दिली आहे. या आधुनिक पिढीतील पालकांसमोरील आव्हाने अपूर्व आहेत. एकुलते एक मूल, छोटे कुटुंब, पालकांची स्वत:ची व्यस्तता, स्पर्धात्मकता, सोशल मीडिया, मूल्यांचा ऱहास इत्यादी. या काळात मुलांसमोर अनेक प्रलोभने आहेत, ज्यापासून मुलांचे संरक्षण जागरूकतेने करायचे आहे. या सर्वांचा विचार या लेखांमधून केला आहे. तसेच लैंगिक शिक्षण, एकल पालकत्व, अध्ययन अक्षमता, आहार नियोजन, भाषा संस्कार, मूल्यशिक्षण असे महत्त्वाचे विषयही घेतले आहेत.

‘मुलांचा शैक्षणिक विकास’ या दुसऱया विभागात शालेय परीक्षा पद्धती, शाळा आणि बोर्डाची निवड, अध्ययन निष्पत्ती, कोरोना काळातील शिक्षण, यांत्रिक शिक्षक विरुद्ध मानवी शिक्षक इ. महत्त्वपूर्ण विषय अंतर्भूत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणातील शाश्वत विकास ध्येये तसेच 360 डिग्री प्रोग्रेस कार्ड या नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यमापन पद्धतीचा विशेष परिचय करून दिला आहे.

पालक म्हणून आजच्या काळात नेमकं काय करणं गरजेचं आहे? पालकत्वाची बदलती मूल्यं कोणती? फ्रेम व शिस्त यांची योग्य सांगड कशी घालावी? 21व्या शतकातील कोणती कौशल्ये महत्त्वाची ठरतील? बौद्धिक व भावनिक विकास, पीन टाइम, वर्तन समस्या यांबद्दल योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल? ‘काल’ व ‘आज’ यांचा मेळ कसा घालाल? शैक्षणिक-सामाजिक प्रश्न हाताळताना तोल कसा सांभाळावा? शाळा, बोर्ड, प्रगतिपुस्तक यांबद्दल तज्ञ काय सांगतात? पालकत्वाच्या प्रवासात पडलेल्या असंख्य प्रश्नांची शास्त्राrय उत्तरं देणारे आणि प्रवाही तसेच आकलन सुलभ भाषेतील वैचारिक व उपयोजन मूल्य असलेले हे पुस्तक प्रत्येक जबाबदार पालक व शिक्षणप्रेमींनी अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना
लेखक : सचिन उषा विलास जोशी
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे : 296, मूल्य : 350/- रुपये