भावनांना तोलणारा दिलासा

32

अरुण मालेगावकर

आतापर्यंत उषा मेहता यांचे पाच काव्यसंग्रह आलेत. काही गाजले. काही पुरस्कार मिळवून लोकप्रिय झाले. ‘काटेसावर’ हा त्यांचा सहावा संग्रह. एकूण काव्य निर्माण करणारी कल्पना आणि शक्ती कवयित्रीच्या मनात निरनिराळय़ा सेंद्रिय अनुभवांच्या प्रतिमा घडविण्याचे कार्य करतात. दडपल्या गेलेल्या आणि अतृप्त असलेल्या उदात्त, वैश्विक इच्छांची परिपूर्ती करण्यासाठी प्रतीके घडविते, या प्रतीकांना काव्यरूपात विशिष्ट शैलीत ढाळून काव्य निर्माण करते याची प्रचीती उषाताईंच्या काव्यातून येते.

‘जागेपणी मात्र कुणाबद्दलच, काहीच कसं वाटेनासं झालं! कोरडीठक्क पडलीय विहीर मनाची, कशाबद्दलच काहीच का वाटेनासं झालंय अलीकडे…’ या मुक्तछंदी काव्याला एक अंतर्गत लय आहे. भूतकाळाला उगाच आमंत्रणे न धाडता उषाताई वर्तमानाशी जुळवून घेतात म्हणूनच बहुधा त्यांना आसपासची असुरक्षितता स्वतः सामना करण्यास प्रवृत्त करीत असावी. भवितव्याचीच नाही तर कसलेच काही वाटेनासे झाल्याचे, त्या निश्चिंत असल्याचे सांगतात.

‘आतमध्ये बहरतच असतात पानंफुलं नकळत। हळदिवं ऊन बागडायला आलं की। मंद गुणगुण ऐकू येते दरीमधून’ ही आतली सुरेल लय पकडताना,

गाणं गाऊन काय होणार?

का असं म्हणायचं?

रडून तरी काय होतं?

गाण्यातूनच जगणं फुलतं’ मानसिक शांतीच्या घरात आत्मिक समाधान परिपक्वतेने लाभल्यावर काटेरी फांद्यांच्या वाटेवर वाटचाल करताना, दांभिकांचे मुखवटे फाडताना क्रांतीचा अंगार फुलतो. त्याला एक त्रिकालाबाधित सत्य कवितेचे आश्वासन देते तेवढे कवीला पुरेसे असते. मुखपृष्ठ व रेखाटने मिलिंद मुळीक यांनी काढली असून ती आकर्षक, समर्पक आहेत.

काटेसावर

लेखक..उषा मेहता

प्रकाशक..ग्रंथाली प्रकाशन, मुंबई-१६

पृष्ठs..८८, मूल्य..१२५/- रुपये

 

आपली प्रतिक्रिया द्या