दीपस्तंभावरील मार्गदर्शन

65

नंदकुमार रोपळेकर

सामान्य माणसातच असामान्यत्व असते नव्हे तर ते आहेच याची असंख्य उदाहरणे आहेत पण फार कमी प्रमाणात ती लिखित स्वरूपात छापून आलेली आहेत. अशा या सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारे उत्साही कार्यकर्ते, प्रतिकुल परिस्थितीतही स्वतःचा आत्मविश्वास, कुवत आणि सहनशिलता वाढवत नेत खूप मोठं असं सामाजिक बांधिलकी लाभून कार्य करणाऱयांपैकी एक म्हणजे विलास चाफेकर.

‘जाणीव’ आणि ‘वंचित विकास’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याचा आढावा नव्हे तर आत्मकथन विलास चाफेकर यांनी लिहिले असून ते उन्मेष प्रकाशन संस्थेने नुकतेच प्रकाशित केले आहे. इच्छा असेल तर मार्ग सापडतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विलास चाफेकर. तसं पाहू गेल्यास विलास चाफेकर सामान्य माणूस, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती. पण ध्येयाने पछाडलेली. ज्या समाजात, मातीत आपण जन्मलो, वाढलो याची जाणीव ठेवून लक्ष्य गाठलेले विलास चाफेकर हे होत.

१३ नोव्हेंबर १९४१ या दिवशी विलास चाफेकरांचा जन्म ठाणे येथे झाला. लहानपण आजारातच गेलं. त्यामुळे ते किरकिरे झाले होते. आईला खूप त्रास व्हायचा. वडील असून नसल्यासारखेच होते. बालपणापासून ते शालेय शिक्षणापर्यंतचा मागोवा घेत घेत लेखकाने शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला आहे. उत्कृष्ट वक्ता असलेले विलास चित्र अभिनय यातही बक्षीस मिळवित असे. चाफेकरांच्या मागे कोणी गॉडफादर नाही, कोणाचीही आर्थिक मदत नाही. पण अपार कष्ट करण्याची तयारी, संकटाला सामोरे जाण्याची धमक, सहनशिलता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्च ध्येयाने पछाडलेल्या विलास चाफेकरांनी असंख्य गरजू लोकांच्या जीवनात प्रकाशाची दिवटी पेटविली.

या संपूर्ण आत्मकथनात त्याच्या आयुष्यात आलेली विविध स्तरावरील माणसं, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती, त्यांना निरपेक्ष भावनेने केलेली मदत, एवढेच नव्हे तर कटू अनुभवाचा दाखलाही त्यांनी यात नमूद केला आहे. विशेषतः राष्ट्रीय संघ सेवकाचाही आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याचाही यात उल्लेख केला आहे. विविध ठिकाणी केलेल्या नोकऱया, त्यांना भेटलेली माणसं, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती, स्वभावाचे नेमके वर्णन यात केले आहे.

विलास चाफेकरांनी ‘जाणीव’द्वारा केलेली कामे तसेच ‘वंचित विकास’साठी केलेले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य पाहून स्तिमित व्हायला होते. अशा एकूण 32 संस्था उभे करण्यासच नव्हे तर त्याद्वारे त्यांनी केलेली सामाजिक सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. याशिवाय ‘संवादिनी मासिक’, ‘प्रवाही मासिक’, ‘निर्मळ रानवाडा’, ‘रानवारा’, प्रकाशन, विपुल प्रकाशनादी द्वारा अक्षरसेवाही केली आहे. जाणीव प्रणीत हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले संघटना पुणे येथे लक्षणिक उपोषण करताना, अभिरुची – व्यक्तिमत्त्व विकास केंद्र, जाणीव युवा कार्यकर्ते पथनाटय़ सादर करताना जाणीव संघटनेचा रौप्य महोत्सव, गोसावी वस्ती विकास, नांदेड, वेश्यांच्या मुला-मुलींचे पुनर्वसन करणारे घरकुल, निहार, लोहगाव-पुणे, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी व महिला सबली करणासाठी वसतिगृह, यवतमाळ, एच. आय. व्ही.बाधितांसाठी फिरता दवाखाना, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स अशा अनेक समाजोपयोगी कार्याच्या रंगीत छायाचित्रामुळे विलास चाफेकरांच्या कार्याला भरभक्कम पुष्टी मिळते. एक सामान्याचे असामान्य कर्तृत्व जाणून घेण्यासाठी विलास चाफेकरलिखित ‘रात्रं दिन आम्हां…’ हे आत्मकथन सर्वांनीच वाचले पाहिजे. ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल यात वाद नाही.

रात्रंदिन आम्हा

लेखक..विलास चाफेकर

प्रकाशक ..उन्मेश प्रकाशन, पुणे

मूल्ये…300 रुपये, पृष्ठ..324

 

आपली प्रतिक्रिया द्या