स्ट्रॉबेरीच्या गावातील पुस्तक

52

नमिता वारणकर, [email protected]

सातारा जिह्यातील भिलार या गावाची ओळख आता पुस्तकांचे गावम्हणून होणार आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर वसलेले हे निसर्गसंपन्न गाव स्ट्रॉबेरीचे गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे.

सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची ओढ प्रत्येकालाच असते… कारण तेथे फक्त खेळ, खाणं आणि मज्जाच… याशिवाय दुसरं काहीच नाही… पण अशीच संधी वाचनवेडय़ा पर्यटक आणि रसिकांना ‘पुस्तकांच्या गावी’ जाण्याची मिळाली तर… कशी वाटली ही अनोखी कल्पना…

पर्यटक, रसिक वाचक गावांतील आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन निवांत, मनसोक्त दर्जेदार पुस्तक वाचनाचा आनंद घेऊ शकतील, अशी व्यवस्था शासनातर्फे य़ेथे करण्यात आली आहे. यासाठी गावातील ‘स्वत्व’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मंदिरे, घरे, लॉजेस, शाळा अशी २५ ठिकाणे ७५ चित्रकारांनी सुंदर कलाकुसरीने सजवली आहेत. प्रत्येक ठिकाणी कपाट, टी-पॉय, खुर्च्या, सुशोभित छत्री अशा वस्तूही पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी सुमारे ४०० ते ५०० अशी एकूण १५,००० पुस्तके वाचनप्रेमींना वाचता येतील. या सुसज्ज अभिनव संकल्पनेमुळे संपूर्ण भिलार गावाला ग्रंथालयाचे स्वरूप येईल हे नक्की!

ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या गावाच्या धर्तीवर असे गाव विकसित करण्याची ही योजना आहे. भिलार गावात पर्यटकांची वर्दळ जास्त असते म्हणून या योजनेसाठी शासनाच्या वतीने या गावाची निवड झाली. यासाठी भिलारवासीयही पर्यटक वाचनप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य,  बालसाहित्य, इतिहास, निसर्ग, पर्यावरण, पर्यटन, लोकसाहित्य, चरित्रे, आत्मचरित्रे, दिवाळी अंक असा हवा तो साहित्यप्रकार वाचण्याची संधी येथे मिळणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक, लोकअभ्यासकांची माहिती देणारे प्रदर्शनही वाचकांसाठी असणार आहे. यासह शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती येथून मिळेल. विविध साहित्य दालनांमधील अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स आणि ऑडियो बुक्सही उपलब्ध असतील.

आपली साहित्य संस्कृती किती संपन्न, समृद्ध आहे, पुस्तकांचे गाव म्हणजे नेमके काय आहे, हे शाळेतील मुलांनाही कळावे यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजनही या गावात करण्यात येणार आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या अभिनव योजनेमुळे वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी निश्चितच मदत होईल. शैक्षणिक सहलीच्या आयोजनातून १ ते २ दिवस विद्यार्थी पुस्तकांच्या सान्निध्यात राहूही शकतात.

वाचनाची विनामूल्य व्यवस्था

वाचनसंस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी भिलारवासीयांनीही उत्साह दाखवला आहे. वाचकांना आपल्याला हवी ती दर्जेदार पुस्तके विनामूल्य वाचता येणार आहेत. हे भिलार गावाचे अनोखे वैशिष्टय़. वाचनसंस्कृतीचा विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी सुट्टी, नाताळ, दिवाळी अशा सुट्टय़ांमध्ये पुस्तक प्रकाशने, साहित्य गप्पा, पुस्तकांच्या घरात जाऊन आलेल्यांचे अनुभव, अभिवाचन, साहित्य महोत्सव अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन नियमित करण्यात येणार आहे.

गावात कायमस्वरूपी वाचनकट्टा

साहित्यिकांच्या भेटीद्वारे लेखन, संपादन, मुद्रितशोधन इत्यादी विषयांवर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येतील. गावात सार्वजनिक जागांवर कायमस्वरूपी अभिवाचनकट्टा, कविकट्टा असेल. ग्रंथालय, पुस्तकांसह वाचकांना सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. यामुळे भिलारवासीयांना रोजगाराची संधी मिळून आर्थिक स्थैर्य लाभेल. वाचनप्रेमींची वाचनकला जोपासण्यासाठी पुस्तकांचे गावम्हणून भिलारगावाची  निवड म्हणजे आमचाच गौरव आहे, असे भिलारवासी अभिमानाने सांगतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या