कर्जचोरी जोमात, शेतकरी कोमात! कर्जमाफीवरून सरकारची कोंडी कायम, विधानसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी तहकूब

21

सामना ऑनलाईन, मुंबई

नापिकी तसेच कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी झालीच पाहिजे अशी भूमिका घेत सलग तिसऱ्या दिवशी शिवसेना सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत वेलमध्ये धाव घेतली. वेलमध्ये धाव घेत अध्यक्षांच्या दिशेने ‘कर्जचोरी जोमात, शेतकरी कोमात’ असे फलक झळकावत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतरही सरकार गप्प का, असा सवाल करीत शिवसेना सदस्यांनी जोरदार घोषणा दिल्या. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला साथ देत विरोधकही सहभागी झाल्याने दोन वेळा सभागृह तहकूब झाल्यानंतर अखेर विधानसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सलग दोन दिवस झालेल्या सभागृहाच्या तहकुबीनंतर आज सकाळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज पुकारले. मात्र कामकाज पुकारताक्षणीच जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्राच शिवसेनेसह विरोधकांनी घेतला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलण्यास सुरुवात करताच अध्यक्षांनी तुम्हाला काय बोलायचे आहे ते आम्हाला माहीत आहे असे सांगत कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले. पुन्हा ११.३२ वाजता कामकाज सुरू होताच शिवसेनेसह विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतल्याने अवघ्या एकच मिनिटात कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा १२ वाजता कामकाजाला सुरुवात होताच कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली. फलक झळकावत कर्जमाफीच्या जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांनीही याला साथ देत कर्जमाफीची मागणी लावून धरल्याने या गोंधळातच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला चर्चेविना मंजुरी दिली. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी अधिवेशन कार्यक्रमातील बदलाला सभागृहाची संमती मिळविल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. शिवसेनेच्या शेतकऱयांसाठीच्या आक्रमक भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिल्याने भाजप आमदारही वेलमध्ये येऊन घोषणा देऊ लागले.

अवघ्या पाच मिनिटांचे कामकाज

कर्जमाफीसाठी सदस्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृह केवळ पाचच मिनिटे चालले. शेतकरी कर्जमाफीवरून गोंधळ होणार हे लक्षात घेऊन अध्यक्षांनी तिन्ही वेळा तत्काळ तहकुबी आणली. तिसऱ्यांदा तहकुबी आणण्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाला सभागृहाची चर्चेविनाच मंजुरी देण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणावर सदस्यांना काही सूचना नोंदविल्या होत्या. त्यामुळे त्यावर आज चर्चा होण्याची शक्यता असताना शेतकरी कर्जमाफीच्या आग्रही मागणीपुढे अखेर अध्यक्षांना चर्चेविनाच अभिभाषण मंजूर करावे लागले. त्यानंतर गिरीश बापट यांनी अधिवेशन कार्यक्रमातील फेरबदलांनाही सभागृहाची मंजुरी मिळवली. त्यानंतर तत्काळ सभागृह तहकूब झाल्याने आज अवघी पाचच मिनिटे सभागृहाचे कामकाज झाले.

मंगळवारपर्यंत कामकाज तहकूब

शनिवारपासून मंगळवारपर्यंत विधानसभेचे कामकाज होणार नाही. मंगळवारी पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक असल्याने मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार, १५ मार्च रोजी विधानसभेचे कामकाज होणार आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन

शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱयांवरही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलन छेडले. ‘शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, त्यांना तत्काळ कर्जमाफी करा’, ‘एकच नारा शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा’ अशा आशयाचे फलक घेऊन आमदारांनी विधिमंडळाबाहेर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे आमदारही या आंदोलनामध्ये सहभागी झाले. ‘कर्जमाफी झालीच पाहिजे’च्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणून गेला.

आपली प्रतिक्रिया द्या