Central Railway News : कसारा इगतपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिक-कल्याण मार्गांवरील कसारा घाटात टीजीआर 3 या बोगद्या जवळ शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास महाकाय दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे ट्रॅकवर दगड, मातीचा ढिगारा पडल्याने मुंबईकडे येणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाड्या रेंगाळल्या. अप लाईनने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक मिडल लाईनने वळवून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनास यश आले.

सकाळी साडेसात वाजेपासून रेल्वेचे कर्मचारी ट्रॅकवरील दरड व मातीचा ढिगारा हटवण्यासाठी प्रयत्न करीत होते. महाकाय दगड उचलण्यासाठी क्रेन, जेसीबीची मदत घेण्यात आली. एकीकडे मुसळधार कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे ट्रॅकवर पडणारा माती, दगडाचा ढिगारा यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल झाले.

थोडक्यात बचावल्या मेल एक्सप्रेस गाड्या

सकाळी मुंबईकडे जाणारी राज्यराणी, पंचवटी एक्सप्रेसची वेळ असते. शनिवारी सकाळी राज्यराणी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात असतानाच घाटात दरड कोसळल्याने पुढील अनर्थ टळला.

सकाळची रेल्वे सेवा ठप्प

शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उंबरमाळी रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गर्दीच्या वेळी 1 तासा हून अधिक काळ रेल्वे वाहतूक ठप्प होती. कसाराकडे येणाऱ्या मेल, एक्सप्रेससह लोकल गाड्या खर्डी ते टिटवाळा दरम्यान तास भर रखडल्या होत्या. परिणामी त्यामुळे चाकरमानी प्रवाशांचे हाल झाले.

गटारीसाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड

दरम्यान, शनिवार, रविवार सुट्टी असल्याने शेकडो मुंबईकर कसारा, इगतपुरीसह भंडारदरा, अकोलेकडे जाण्यासाठी कसारा येथे उतरून खासगी वाहनाने जातात. परंतू आज सकाळ पासूनच पावसाची फटकेबाजी सुरू असल्यने रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.