
वेळेत ब्लाऊज शिवून न दिल्याप्रकरणी ब्युटिक मालकाला 15 हजार रुपये दंड आकारण्यात आल्याची घटना धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे. यासोबतच तक्रारदार महिलेला एक ब्लाऊज मोफत शिवून देण्याचे आदेशही ग्राहक मंच न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष किशोर वांदे आणि सदस्य वैशाली बोराडे यांनी हा निर्णय दिला आहे. नेहा संत असे दंड ठोठावण्यात आलेल्या ब्युटिक मालकिनीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, स्वाती कस्तुरी नामक महिलेने 13 जानेवारी 2023 रोजी धाराशिवमधील मार्टिन ब्युटिकमध्ये दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. यासाठी संत यांनी 6300 रुपये शिलाईचे पैसे सांगितले. त्यापैकी 3000 रुपये महिलेने अॅडव्हान्स दिले. संत यांनी दिलेल्या मुदतीनुसार 25 जानेवारी 2023 रोजी महिलेला दोन्ही ब्लाऊज शिवून देण्यात येणार होते. मात्र ब्युटिककडून केवळ एकच ब्लाऊज शिवून देण्यात आला.
संत यांनी 1 फेब्रुवारी रोजी दुसरा ब्लाऊज शिवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासनही ब्युटिक मालक संतकडून पाळण्यात आले नाही. यानंतर महिलेने अनेकदा संतकडे वारंवार ब्लाऊज देण्यासाठी तगादा लावला. मात्र संत यांनी दुसरा ब्लाऊज देण्यास नकार दिला. तसेच ब्लाऊज न देण्यामागे काही ठोस कारणही दिले नाही.
अखेर स्वाती यांनी 28 एप्रिल 2023 रोजी आपल्या वकिलाच्या माध्यमातून ब्युटिकला नोटीस बजावले. मात्र ब्युटिक मालक नेहा संत यांनी ही नोटीस स्वीकारली नाही. यानंतर स्वाती यांनी ग्राहक मंचाकडे याबाबत तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने ब्युटिक मालक नेहा संत यांना मानसिक आणि शारीरिक छळ आणि कायदेशीर कारवाईचा खर्च म्हणून तक्रारदाराला 15,000 रुपये देण्यास सांगितले आहे. तसेच 15 दिवसांच्या आत दुसरा ब्लाऊज मोफत शिवून देण्याचे आदेश दिले.