बॉक्सर विकासने शिस्तपालन समितीपुढे बाजू मांडली

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी बॉक्सर विकास कृष्ण हा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियापुढे (बीएफआय) अखेर हजर झाला. आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील उपांत्य फेरीतून माघार घेतल्याबद्दल त्याने ‘बीएफआय’च्या शिस्तपालन समितीपुढे आपली बाजू मांडली. मात्र मांडलेल्या बाजूबद्दल स्पष्टीकरण न देता विकासने आपण सुनावणीवर खूश असल्याचे सांगितले.

विकास म्हणाला, उपांत्य लढतीतून आपण का माघार घेतली? याबाबतचा सविस्तर खुलासा मी ‘बीएफआय’च्या शिस्तपालन समितीपुढे केला आहे. मला बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी ‘बीएफआय’चा आभारी आहे. मी माझी बाजू मांडली आहे. यात शिस्तपालन समितीला काही चुकीचे वाटल्यास ते देतील ती शिक्षा मला मान्य असेल.

‘बीएफआय’ने असित बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय शिस्तपालन समिती नेमली असून यात राजेश भंडारी व निर्वाण मुखर्जी यांचा समावेश आहे. या समितीने रविवारी विकास कृष्णची बाजू ऐकून घेतली. समिती सदस्यांनी आपल्याला आता जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या तयारीसाठी सराव सुरू करण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ या समितीलाही माझ्याबद्दल सहानुभूती वाटत असावी असेही विकासने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या