अकोला : महिला बॉक्सर साक्षी गायधनीला वर्ष वाया जाण्याची भीती

कोरोना व लॉकडाऊनमुळे खेळाडूंचे वर्ष वाया जायला नको. युवा खेळाडूंसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. कारण याचदरम्यान स्पर्धांच्या मोसमाला सुरुवात होत, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे अकोल्याची 20 वर्षीय बॉक्सर साक्षी गायधनी हिने. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या महिला बॉक्सरने दैनिक `सामना’शी संवाद साधताना करीअर, कुटुंब व बॉक्सिंगशी निगडित विषयांवर दृष्टिक्षेप टाकला.

मेरी कोमकडून प्रेरणा घेतली

मेरी कोम व बॉक्सिंग हे एकमेकांसाठीच बनले आहेत. मेरी कोमने आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी करीत देशाचे नाव उंचावले आहे. तीन मुलांना जन्म दिल्यानंतरही मेरी कोम त्याच जिद्दीने मैदानात उतरते. मेरी कोमची ही बाब प्रकर्षाने आवडते. हीच जिद्द पाहून मलाही बॉक्सिंगच्या रिंगणात उतरून लढण्याची प्रेरणा मिळते, असे भावुक उद्गार साक्षी गायधनी हिने यावेळी काढले.

लॉकडाऊनमध्येही ऑनलाइन सराव कोरोना व लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात रिंगणात जाऊन सराव करायला मिळाला नाही, पण साई केंद्राकडून ऑनलाइन मार्गदर्शन सातत्याने करण्यात येत होते. यामध्ये बॉक्सर्सना योगा, फिटनेस याबाबत मार्गदर्शन करण्यात  आले, असे साक्षी गायधनी यावेळी म्हणाली.

लहान भावाचा आजार वेदनादायकच!

मी आई-वडील व लहान भावासह अकोला येथे राहते. आई घर सांभाळते, तर वडील कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. माझा लहान भाऊ `ऑटिझम’ आजाराने त्रस्त आहे. तो आता 12 वर्षांचा आहे. सर्व प्रकारचे उपाय करून बघितले, पण त्याच्यामध्ये सुधारणा होत नाहीत. त्यामुळे कुटुंब नेहमी चिंतेत असते, असे साक्षी गायधनी यावेळी सांगते.

नोकरीची नितांत गरज

सध्या मी बीएच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र सरकारकडून मेडल्सनुसार स्कॉलरशिप देण्यात येते. स्पर्धांमध्ये जी पदके पटकवली आहेत, त्यानुसार रक्कम दिली जाते. अजून नोकरी मिळालेली नाही. लवकरात लवकर याचा प्रश्न सुटावा. माझ्या नोकरीमुळे आईवडिलांचा आनंदही गगनात मावेनासा होईल, असे साक्षी गायधनी आवर्जून सांगते.

ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून द्यायचेय

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्यात यश मिळाले, पण या खेळामध्ये मोठी झेप घ्यायचीय. देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याचा ध्यास आहे. या दिशेने तयारी करीत आहे, असा विश्वास या कन्येने व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या