गयावया करूनही ज्युडो क्लासमध्ये मुलाला 27 वेळा आपटले, ब्रेनडेड झाल्याने मुलगा कोमात

स्वसंरक्षणासाठी ज्युडो आणि कराटेच्या क्लासमध्ये लहान वयातच मुलांना पाठवले जाते. मात्र काही ठिकाणी ज्या ज्युडो क्लासमध्ये लहान मुलांना न झेपणारं प्रशिक्षण दिलं जातं. यात अनेकदा मुलांना जखमा होतात, ज्या काहीवेळा जीवघेण्या ठरतात. तैवानमध्येही असाच प्रकार घडला असून इथला 7 वर्षांचा मुलगा कोमात गेला आहे. जर त्याला कधी शुद्ध आली तरी तो आयुष्यात जागचा हलू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या मुलाचं खरं नाव कळू शकलेलं नाहीये, मात्र त्याचं टोपणनाव वेई वेई असं असल्याचं कळालं आहे.

वेई वेई हा अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी ज्युडो शिकायला या क्लासमध्ये दाखल झाला होता. आपल्याला मार्शल आर्ट शिकायचे असल्याचा वेई वेईने त्याच्या पालकांकडे हट्ट धरला होता. ज्यामुळे त्यांनी त्याला या क्लासला पाठवायला सुरुवात केली होती. एप्रिल महिन्यातच त्याच्या क्लासची सुरुवात झाली होती.

दोन आठवड्यांपूर्वी प्रशिक्षणाच्या नावाखाली वेई-वेईचा एक मुकाबला ठेवण्यात आला होता. ज्याचं त्याच्या काकाने चित्रीकरणही केलं आहे. या दृश्यांमध्ये दिसतंय की वेई वेईपेक्षा मोठ्या मुलाच्या खांद्यावर बसवून त्याला मॅटवर आदळण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये वेई वेईच्या हृदयाला पीळ पाडणाऱ्या किंकाळ्याही ऐकायला येतात. वेई वेई “माझा पाय” “माझं डोकं”, “मला हे नाही करायचंय” असं जोरजोरात ओरडून सांगत होता, मात्र तरीही प्रशिक्षक थांबला नाही. प्रशिक्षकाने त्याला उभं राहण्यास भाग पाडलं आणि पुन्हा त्याला फेकण्याचे प्रकार सुरू झाले. एकवेळ अशी आली जेव्हा वेई वेई गलितगात्र झाला त्याच्यात उठण्याचे त्राणही शिल्लक राहिले नव्हते, तरीही त्याच्या प्रशिक्षकाला दया आली नाही. त्याने वेई वेईला उचलून पुन्हा आपटलं. यावेळी तो डोक्यावर आपटल्याने त्याने काही सेकंदात उलटी केली आणि तो बेशुद्ध पडला. वेई वेईच्या घरच्यांनी म्हटलंय की त्यांच्या मुलाला किमान 27वेळा आपटण्यात आलं.

वेई वेई सध्या कोमात असून त्याला लाईफ सपोर्ट यंत्रणेवर ठेवण्यात आलं आहे. वेई वेईच्या प्रशिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आपण चुकीचं काहीच केलं नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय. सुरुवातीला या प्रशिक्षकाला न्यायालयाने सोडून दिलं होतं. हा सगळा प्रकार रोजच्या प्रशिक्षणाचा भाग असल्याचं त्याने सांगितल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर वेई वेईच्या पालकांनी पत्रकार परिषद घेतली ज्यानंतर न्यायालयाने जडाहीर केलं की प्रशिक्षकाने गंभीर गुन्हा केला असल्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे प्रशिक्षकाला पुन्हा ताब्यात घेण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या