धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने आईच्या अंत्यसंस्कारास मुलाचा नकार, प्रशासन अंत्यविधी करताना लांबूनच नमस्कार

1465

जगभरात कोरोनाचा धोका वाढत असून रुग्णांचा आकडा 12 लाखांच्या पार गेला आहे. हिंदुस्थानमध्येही रुग्णसंख्या 5 हजार पेक्षा जास्त झाली आहे. अमेरिका, स्पेन, इटली येथील आकडेवारी पाहून लोकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. एकीकडे संसर्ग वाढत असताना दुसरीकडे एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका मुलाने चक्क आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.

एका हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एका 69 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिथे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मुलाकडे सोपवण्यात येणार होते. प्रशासनानं तशी संपूर्ण तयारी देखील केली मात्र या महिलेचे कुटुंबीय आपल्यालाही कोरोना होईल या भीतीने पार्थिव घेण्यास आलेच नाहीत. संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णालयाकडून संपूर्ण कुटुंबियांची काळजी घेण्यात येईल असे आश्वासनही रुग्णालयाकडून देण्यात आले. मात्र तरीही कोरोनाच्या भीतीपोटी आपल्या जन्मदात्या आईचे पार्थिव स्वीकारण्यास मुलाने नकार दिला.

लुधियानाच्या पोलीस उपायुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे. कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह न स्वीकारल्यामुळे जिल्हा प्रशासनाला या कोरोनाग्रस्त महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारावेळी कोरोनाचा संसर्ग पसतणार नाही याची काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयाकडून देण्यात आली होती. तरीही पोटच्या मुलामे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हा प्रशासनाने महिलेवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारावेळी मुलगा आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी 100 मीटर लांबूनच आपल्या आईच्या पार्थिवाला अखेरचा निरोप दिला.

आपली प्रतिक्रिया द्या