इयर फोन लावून झोपल्यामुळे तरुणाने गमावला जीव

4

सामना ऑनलाईन। नेगेरी

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. यामुळे काम करताना, जेवताना अगदी झोपतानासुद्धा लोकं मोबाईल बाजूला घेऊन झोपतात. त्यातही रात्रीच्या वेळीस इयर फोन कानात घालून गाणी ऐकणं व चॅटींग करण्याचं फॅड वाढलयं. पण याच फॅडने मलेशियातील एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मोहम्मद आदिल अजहर जहारिन (16) असे या तरुणाचे नाव आहे.

मलेशियातील के नेगरी मधील रेम्बू शहरात राहणाऱ्या मोहम्मदला रात्री उशीरापर्यंत इयर फोन लावून गाणी ऐकण्याची सवय होती. काही दिवसांपूर्वी रात्री इयर फोन कानाला लावून मोबाईल चार्जिंगला ठेवून तो गाणी ऐकत होता. गाणी ऐकता ऐकता त्याला झोप लागली. सकाळी आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठलाच नाही. त्याला गाढ झोप लागली असावी असे तिला वाटले. यामुळे ती नेहमीप्रमाणे आवरून कामाला निघून गेली. संध्याकाळी ती घरी परत आली असता मोहम्मद तिला झोपलेलाच दिसला. यामुळे तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे तिला दिसले. तिने तातडीने त्याला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोहम्मदच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी त्याचे पोस्टमार्टेम करण्यात आले. त्यात शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मोहमम्द मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेला होता. शिवाय त्याच्या कानात इयर फोनही होते. मोबाईलची बॅटरी पुर्ण चार्ज झाली होती. ती तापल्यामुळे त्यातील करंट इयर फोनमधून मोहम्मदच्या कानात गेला. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान मोहम्मदचा फोटोही सोशल साईटवर व्हायरल झाला आहे.