मुलाने महिलेला पळवून नेले; समाजात बदनामीची भीती, कुटुंबातील सात जणांची आत्महत्या

मुलाने समाजातील महिलेला लग्नासाठी पळवून नेले. यामुळे समाजात कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने एकाच कुटुंबातील सातजणांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दौंड तालुक्यातील पारगाव येथे घडली. यामध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. भीमा नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेले कुटुंब मुळचे बीड जिह्यातील आहे. सर्व मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

पती मोहन उत्तम पवार (वय 45), पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय 40), जावई श्याम पंडित फलवरे (वय 28), मुलगी राणी फलवरे (वय 24), नातू रितेश फलवरे (वय 7), छोटू फलवरे (वय 5) आणि कृष्णा  फलवरे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत मोहन पवार हे मूळचे बीड जिह्यातील गेवराई परिसरातील रहिवासी आहेत. ते वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड तालुक्यातील पारगाव येथे राहण्यास आले होते. मोहन हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा लहान मुलगा अनिल पवार (वय 20) याने त्यांच्याच समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते. अनिलने महिलेला पळविल्याचे समजताच मोहन पवार यांनी याबाबत पुण्यात राहणारा मोठा मुलगा राहुल पवार यास माहिती दिली. ‘अनिलने आपल्याच समाजातील मुलगी पळवून नेली आहे. त्याला ती परत आणण्यास सांग; अन्यथा आम्ही कुटुंबासह विष घेऊन आत्महत्या करू,’ असे सांगितले होते. त्यानंतर त्याच दिवशी रात्री मोहन हे कुटुंबीयांना घेऊन समाजात बदनामी होईल या भीतीने दुसरीकडे निघून गेले.

दरम्यान, दि. 18 ते 22 जानेवारी या पाच दिवसांत पोलिसांना पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह आढळले. यामध्ये दोन पुरूष आणि दोन महिलांचा समावेश होता. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसेच नदीपात्रात आणखी मृतदेह असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार यवत पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या बचाव पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. त्यानंतर आज (दि. 24) दुपारी आणखी तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. मृतांपैकी एका महिलेजवळ मोबाईल सापडल्याने मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एकाच कुटुंबातील सातजणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे पुढील तपास करत आहेत.