प्रेमविवाह करण्यासाठी चारवेळा घरातून पळाली; अखेर पोलीस ठाण्यात लागले लग्न

प्रेमासाठी काहीही…असे अनेकजण म्हणतात. मात्र, वेळ आल्यावर तसे करणारे खूप कमीजण असतात. लहानपणी एकावर प्रेम जडले होते. त्याच्याशीच लग्न करण्याचा निश्चय तरुणीने केला होता. तरुणही लग्नाला तयार होता. मात्र, दोघांच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. अशा परिस्थितीत प्रेम असलेल्या तरुणाशीच लग्न करण्यासाठी तरुणीने तब्बल चारवेळा घरातून पळ काढला. अखेर त्यांचे लग्न पोलीस ठाण्यात लावण्यात आले. ही घटना बिहारच्या रोहतासमध्ये घडली आहे.

पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारी देण्यासाठी अनेकजण येतात. त्यामुळे गुन्हे, चोरी तपास असे वातावरण पोलीस ठाण्यात असते. मात्र, बिहारच्या रोहतासमधील डेहरी येथील पोलीस ठाण्यात चक्क लगीनघाई दिसून आली. या पोलीस ठाण्यात एका प्रेमी जोडप्याचे लग्न लावण्यात आले. या लग्नासाठी आलेल्या भटजींनी मंत्रोच्चारण करत त्यांचे लग्न लावून दिले. तसेच लग्नातील विधीही करण्यात आले. हा विवाह पोलीस ठाण्याच्या महिला प्रमुख माधुरी कुमारी यांच्या देखरेखीखाली करण्यात आला. या अनोख्या विवाहाबाबत त्यांनी माहिती दिली.

टंडवा गावातील अभयकांत आणि पडुहार गावातील प्रियंका यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अभकांतशीच लग्न करण्याचा निश्चय प्रियंकाने केला होता. मात्र, दोघांच्याही घरातून या लग्नाला विरोध होता. अभयकांतशी लग्न करण्यासाठी प्रियंकाने घरातून चारवेळा पळ काढला होता. मात्र, घरच्यांनी प्रत्येकवेळी तिच्यावर दबाव टाकला होता. त्यानंतर तिने थेट अभयकांतचे गाव गाठले.

अभयकांतच्या कुटंबियांनी लग्नाला तीव्र विरोध केला. घरच्यांच्या दबावामुळे अभयकांतनेही प्रियंकाशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रियंकाने थेट पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली. तिच्या तक्रारीची दखल घेत अभयकांतला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याने आपण लग्नाला तयार आहोत. मात्र, कटुंबियांच्या विरोधामुळे आपल्याला लग्न करता येत नसल्याचे सांगितले.

ही परिस्थिती समजून घेतल्यानंतर माधुरी कुमारी यांनी या दोघांचे लग्न पोलीस ठाण्यातच लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलीस ठाण्यात लग्नाची सर्व तयारी करण्यात आली. यावेळी प्रियंका आणि अभयकांत याचे भाऊ उपस्थित होते. इतर कुटुंबिय या लग्नासाठी आले नाहीत. माधुरी कुमारी यांनी केलेल्या मदतीमुळेच आपले लग्न झाले, असे प्रियंकाने सांगितले. आसपासच्या गावांमध्ये या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या