प्रेयसीला कोरोना झाल्याचा संशय, प्रियकराने केली निर्घृण हत्या

2650

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. मृतांचा आकडा 50 हजार पार गेला असून 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसचा तडाखा सर्वात जास्त इटली, अमेरिका, स्पेन, फ्रांस, इराण या देशात बसला आहे. इटलीत मृतांचा एकदा 13 हजार पार गेला आहे. यामुळे इथे भीतीदायक वातावरण आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रेयसीला कोरोना झाल्याच्या संशयातून प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली.

इटलीत कोरोनाचे थैमान सुरू आहे. अशातच एका मेल नर्सने आपल्या डॉक्टर प्रेयसी लॉरेनाची हत्या केली. आरोपी डी पेस आणि त्याची प्रेयसी लॉरेना हे दोघेही दक्षिण इटलीतील मेस्सिना येथे काम करत होते. 28 वर्षीय डी पेसने मंगळवारी लॉरेनाची हत्या केली. या नंतर त्याने स्वत: पोलिसांना फोन करून हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपीने आपल्या हाताची नस कापली असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

आरोपीने सांगितले की, तिच्यामुळे मला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे मी तिची हत्या केली. मात्र, पोलिसांना आरोपीच्या कबुलीवर संशय आहे. पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात त्याच्या मृत प्रेयसीला अथवा आरोपीला ही कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस आरोपी पेसकडे अधिक चौकशी करत आहेत.

सोशल मीडियावर संताप
दरम्यान, या घटनेमुळे इटलीत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले आहेत. मृत लॉरेनाने काही दिवस आधी इटलीत कोरोनाबाधितांवर उपचार करताना मृत झालेल्या डॉक्टरांना आदरांजली वाहणारी एक पोस्ट लिहीली होती.

कोरोनाचे थैमान
इटलीमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असून 13 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 15 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

आपली प्रतिक्रिया द्या