दोन वेळा प्रेमविवाह करून तिसऱ्यांदा करणार होती ‘अरेंज मॅरेज’; प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरला

1395
murder-knife

मध्य प्रदेश येथील कोचिंग क्लासला जाते सांगून निघालेल्या आणि नंतर हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या या तरुणीच्या हत्येचं रहस्य उलगडलं आहे. आपल्या प्रियकराशी दोन वेळा लग्न करून कुटुंबीयांच्या मर्जीने तिसऱ्यालाच लग्नाला होकार देण्याच्या कारणावरून तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उज्जैन येथील नानाखेडा परिसरातील नटराज या हॉटेलमध्ये शुक्रवारी तनु परिहार नावाच्या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोटावरही वार करण्यात आले होते. हॉटेल रूमचा दरवाजा उघडल्यानंतर आत ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली होती. या तरुणीसोबत सुभाष पोरवाल नावाचा एक माणूसही होता. मात्र, तिच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि अटक केली. त्यावेळी त्याने आपणच तिचा खून केल्याचं कबूल केलं.

एकमेकांचे शेजारी असणाऱ्या सुभाष आणि तनु यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुभाषने दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी 9 जुलै आणि 23 जुलै रोजी कायदेशीर आणि पारंपरिक पद्धतीने असा दोन वेळा विवाह केला होता. याची माहिती सुभाषच्या कुटुंबीयांना होती. मात्र, त्यानंतर तनुला कुटुंबीयांच्या मर्जीने दुसऱ्याच मुलाशी लग्न करायचं होतं. सुभाषने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला होता. मात्र, ती तिच्याच म्हणण्यावर ठाम होती.

तिच्या या बदललेल्या निर्णयाचा राग सुभाषच्या मनात खदखदत होता. त्याने तिला शुक्रवारी नटराज हॉटेलमध्ये बोलवलं होतं. तनु देखील घरी कोचिंग क्लासचं निमित्त सांगून त्याला हॉटेलमध्ये भेटली. तिथेही त्याने तिला समजवायचा प्रयत्न केला. पण, तिने तिथेही तिच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितल्यावर सुभाषला राग अनावर झाला आणि त्याने चाकूने गळा आणि पोटावर वार करून तिची हत्या केली. हत्येनंतर तो बाजारात काहीतरी आणायला जातोय, असं कारण देऊन फरार झाला.

आपली प्रतिक्रिया द्या