अन्याय करणार नाही, करवून घेणार नाही; ब्राह्मण ज्ञातींच्या एकत्रीकरणात निर्धार

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

दिवसेंदिवस ब्राह्मण समाजावरील अन्याय वाढत आहे. द्वेष वाढत आहे. असे असले तरीही ब्राह्मण समाज कोणावरही अन्याय करणार नाही तसेच कोणाकडूनही अन्याय होत असल्यास तो खपवून घेणार नाही, असा निर्धार डोंबिवलीत झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत समाजातील विविध विषय समित्यांच्या नेमणुका करण्यात आल्या.

जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणूक देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणाकरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले. ब्राह्मणांनीही एकत्र येण्याची नितांत गरज असून त्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील ब्राह्मणांनी एकत्र यावे, संघटित व्हावे, असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत महिला समिती, शिक्षण समिती, सांस्कृतिक समिती, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती, युवा समिती अशा समिती नेमण्यात आल्या असून आगामी बैठकीत त्या समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्ञातींसह महासंघाचे सभासद व्हा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या