सखेसोबती..बह्मकमळ

352

योगेस नगरदेवळेवर

बऱयाचजणांच्या घरी ब्रह्मकमळ उमलण्याचा सोहळा असतो… पण ते खरे ब्रह्मकमळ असते का?

एका परिचितांच्या घरी फारच लगबग सुरू झाली होती. बऱयाच जणांना त्यांनी रात्री घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. कारणच तसे होते. त्यांच्या घरी कुंडीत लावलेल्या ब्रह्मकमळाला कळय़ा लगडल्या होत्या. त्या टपोऱया झाल्या होत्या. म्हणजे रात्री त्या उमलणार हे नक्की. रात्री उमलणारे हे फूल फार का टिकत नाही? सकाळपर्यंत कोमेजून जाते. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर घरात ब्रह्मकमळ फुलणार याचा आनंद त्यांना होता. संध्याकाळनंतर कळय़ा मोठय़ा होत जाऊन ते फूल उमलले. हे ब्रह्मकमळ उमलताना पाहिले तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशी एक श्रद्धा आहे. खूप प्रतीक्षेनंतर येणारं आणि अत्यंत अल्पकाळ टिकणारं हे देखणं फूल पाहणेच मुळात एक इच्छापूर्ती असते.

खरं तर दारात फुलणारं हे फूल ब्रह्मकमळ नाहीच. हिरव्या पानासारख्या दिसणाऱया खोडाच्या बेचक्यात येणाऱया या फुलाचं कॉमन नाव ‘बेथलहॅम लिली’ आहे. मेक्सिको, मध्य अमेरिकेतून शोभेचं म्हणून बागेत लावण्यासाठी आणलेल्या झाडाला अचानक मानाचं पान मिळून गेलं. वास्तविक हे झाड चक्क निवडुंग म्हणजे कॅक्टस प्रजातीमधलं आहे. या झाडाचं शास्त्रीय नाव ‘एपिफायलय ऑक्सिपेटलम) एप्रिफायलम म्हणजे पानासारख्या भागावर येणारी फुलं आणि ऑक्झिपेटलम म्हणजे पाकळय़ांचा आकार टोकदार. पानासारखा दिसणारा भाग परत दुसऱया जागेत लावल्यास त्यातून नवीन झाड तयार होते.

मग जर हे ब्रह्मकमळ नाही तर मग खरे ब्रह्मकमळ कोणते? ब्रह्मकमळ असल्याने ते सहज उपलब्ध होणारच नाही ना! खऱया ब्रह्मकमळाच्या शोधासाठी आपल्याला हिमालयात जावे लागेल. सुमारे ११ हजार ते १४ हजार फूट उंचीवर हे ब्रह्मकमळ उमलतं. या झाडाचं शास्त्रीय नाव Soussurea Obvallata आहे. यातच Soussurea हे ज्याने ही स्पेसीज शोधून काढली त्या शास्त्रज्ञांच नाव आहे तर Obvallata म्हणजे झाकलेले. या ब्रह्मकमळाच्या फुलाला बोटीच्या आकारासारखी पानांनी झाकलेले असते. बाहेरून जे दिसते ती पिवळसर हिरवी पर्णदले असतात. आतमध्ये असलेल्या फुलाची टोके जांभळय़ा रंगाची असतात. पर्णदलांनी फूल झाकण्याचे कारण म्हणजे इतक्या उंचीवरील थंडीमध्ये आतल्या फुलाला ऊब देणे. हिमालयातील जम्मू-कश्मीर, अरुणाचल प्रदेश यात आढळणारे फूल भूतान, नेपाळ, चीन यातही त्या उंचीवर आढळते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण असलेल्या या फुलाला उत्तराखंड राज्याने राज्य फुलाचा दर्जा दिला आहे. पोस्टल स्टॅम्प बनवूनही या फुलाचा सन्मान केला गेला.

विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर बसलेल्या ब्रह्माने हे विश्व निर्माण केले अशी पुराण कथा आहे. ब्रह्माच्या हातात कमळ दाखवले जाते. तेच हे ब्रह्मकमळ असे मानले जाते.  नवनिर्मितीशी संबंधित अशा कथांनी ब्रह्मकमळाला अलौकिकत्व प्राप्त करून दिले आहे.पावसाळय़ाच्या मध्याला म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये फुले उमलण्यास सुरुवात होते. ऑक्टोबरपर्यंत ती आढळून येतात.

ब्रह्मकमळाच्या मुळांचा उपयोग जखमा किंवा घाव भरून येण्यासाठी केला जातो. कळय़ांचा उपयोग पांढरे डाग व मूत्राशयाच्या विकारावर होतो.

हाड मोडणे किंवा हाडांमधील वेदना, पचनाच्या विकारांवरही या वनस्पतीचा औषधी वापर केला जातो. औषधासाठी, पूजेसाठी होणारी ब्रह्मकमळाची अवास्तव तोड या झाडाच्या अस्तित्वावर आली आहे. देव भावाचा भुकेला असल्याने त्याला मनोभावे वाहिलेले कोणतेही फूल चालते. त्यामुळे खऱया ब्रह्मकमळाचे दर्शन नाही घेता आले तरी घरी फुलणाऱया ब्रह्मकमळाच्या दर्शनाने संतुष्ट होऊया.

आपली प्रतिक्रिया द्या