पश्चिमरंग : ब्राम्झचं अंगाई गीत

>>दुष्यंत पाटील

पाश्चात्त्य संगीतातली एक अजरामर रचना म्हणजे ब्राम्झचं अंगाई गीत. ही संगीत रचना 1868 मध्ये प्रकाशित झाली. इतकी वर्षं होऊनही पाश्चात्य जगात आजपर्यंत या अंगाई गीताची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही.
पाश्चात्त्य संगीतातली एक अजरामर रचना म्हणजे ब्राम्झचं अंगाई गीत (BrahmsLullaby). हे गीत प्रकाशित होऊन जवळपास दीडशे वर्षे झालीत, पण आजही आपल्या बाळांना झोपण्यासाठी पाश्चात्त्य मंडळी या अंगाई गीताचाच सर्रासपणे वापर करताना दिसतात. ‘टॉम अॅण्ड जेरी’सारख्या लहान मुलांच्या कार्टून मालिकांपासून ते टीव्हीवरच्या जाहिरातींपर्यंत यातलं संगीत आजपर्यंत सर्वत्र वापरलं गेलंय. या रचनेची हळुवार असणारी चाल, त्यातली एक विशिष्ट प्रकारची लयबद्धता ताह्या बाळांना निजवण्यासाठी खास ठरते. या रचनेत ब्राम्झच्या आयुष्यातलं एक खास गुपित दडलेलं होतं.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या महान संगीतकारांपैकी एक म्हणजे ब्राम्झ. संगीताच्या इतिहासात एकापेक्षा एक महान संगीतकार देणाऱया जर्मनीमध्ये त्याचा जन्म झाला. संगीतातल्या महान तीन B मध्ये बाख, बिथोव्हन आणि ब्राम्झ यांचा समावेश होतो, असं काही लोक म्हणतात. ब्राम्झनं पियानोच्या रचनांपासून ते ऑर्पेस्ट्राच्या संगीतापर्यंत सर्व प्रकारच्या रचना केल्या.

ब्राम्झच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. आपल्या हृदयाचा आतला कप्पा तो सहसा कधी कुणाला उघडून दाखवायचा नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या नोंदी फारशा मिळत नाहीत. त्यानं इतरांशी केलेल्या पत्रव्यवहारांतून आज आपल्याला त्याच्याविषयी थोडंफार समजतं. असं म्हणतात की, ब्राम्झ हा नेमका कसा माणूस होता ते त्याच्या संगीतातूनच समोर यावं असं त्याला वाटायचं आणि तसं करण्यात तो यशस्वी ठरला.

ब्राम्झ जवळपास 26 वर्षांचा असतानाची गोष्ट. या काळात आपलं जन्मगाव असणाऱया हॅम्बुर्ग इथं त्याचं वास्तव्य होतं. समूहगान करणाऱया मुलींच्या ग्रुपशी त्याचा संबंध या काळात आला. समूह गानातलं संगीत जास्त चांगल्या प्रकारे सादर होण्यासाठी तो मुलींना मार्गदर्शन करायचा. या ग्रुपमध्ये बर्था पोरब्स्की नावाची एक मुलगी होती. खरं तर ती मूळची व्हिएन्नामधली होती, पण हॅम्बुर्गला ती आपल्या पाहुण्यांकडं राहायला आली होती. ब्राम्झ तिच्या प्रेमात पडला. तिलाही तो आवडायचा. दोघांच्यात प्रेमप्रकरण सुरू झालं, पण नंतर बर्थाला व्हिएन्नाला परत जायला लागले. मग हे प्रकरण मागे पडले. कालांतराने तिचे लग्न व्हिएन्ना इथल्याच फेबर नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱयाशी झाले. योगायोगाने 1863 मध्ये ब्राम्झही व्हिएन्नामध्येच राहायला आला. आपलं संगीत सादर करण्यासाठी ब्राम्झला वेगवेगळय़ा शहरांचे दौरे करायला लागायचे, पण जेव्हा तो बाहेर फिरत नसायचा तेव्हा तो व्हिएन्नामध्येच असायचा. फेबर कुटुंबाचे आणि ब्राम्झचे संबंध वाढले. बर्थाचा नवरा ब्राम्झचा आर्थिक सल्लागार म्हणून काम करायचा.

1868 मध्ये बर्थाला दुसरा मुलगा झाला. या मुलाचं नाव योहानस असं ठेवण्यात आलं. ब्राम्झचं नावही योहानस होतं. या काळात ब्राम्झ बॉन इथं होता. त्याला बाळाच्या जन्माची बातमी कळल्यावर त्यानं बाळासाठी अंगाई गीत रचायचं ठरवलं. फेबर कुटुंबीयांसाठी भेट म्हणून ही रचना पाठवण्याचा त्याचा मानस होता. एका व्यक्तीनं करायचं गायन आणि त्यावर पियानोची साथ अशी संगीत रचना त्यानं केली.

या रचनेत ब्राम्झनं एक शक्कल लढवली होती. रचनेतला गायनाचा भाग म्हणजे अंगाई गीत होतं, पण त्याच वेळी पियानोवरचं साथ देणारं संगीत विशिष्ट प्रकारचं होतं. फक्त पियानोचं संगीत ऐकलं तर बर्थाला एका वेगळय़ा गाण्याची आठवण येणार होती. हॅम्बुर्गमधल्या काळात बर्था इतर मुलींसोबत समूहगान करताना एक जुनं प्रेमगीत गायची. ब्राम्झच्या अंगाई गीतातल्या पियानोसाठीचं संगीत या प्रेमगीताची आठवण करून देणारं होतं. या प्रेमगीताशी हॅम्बुर्गमधल्या काळाच्या आठवणी निगडित असल्यानं बर्था आणि ब्राम्झ यांना हे गाणं आठवणींना उजाळा देणारं होतं.

ही संगीत रचना 1868 मध्येच प्रकाशितही झाली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत या अंगाई गीताची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. या रचनेच्या वेगवेगळय़ा वाद्यांसाठी, पूर्ण ऑर्पेस्ट्रासाठी अनेक अरेंजमेंट्स झाल्या. हे अंगाई गीत अजरामर का व्हावं, याचं उत्तर मिळण्यासाठी एकदा यूटय़ूबवर आपण या संगीत रचनेच्या (Brahms Lullby) विविध अरेंजमेंट्स ऐकायलाच हव्यात.

[email protected]