खोपोलीहून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे चाललेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याची घटना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील शिंग्रोबा घाटात मंगळवारी रात्री उशिरा घडली. चालकाने शिताफीने अवघड वळणावर बस थांबवली आणि पुढील मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये 40 विद्यार्थी आणि तीन शिक्षक होते. या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
श्रीगोंदा येथील चौथीच्या 40 विद्यार्थ्यांची सहल एसटीच्या बसने खोपोली येथील गगनगिरी आश्रम व कोकण दर्शनासाठी आली होती. बसमध्ये तीन शिक्षकही होते. सहलीचा आनंद लुटल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही बस जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील शिंग्रोबा घाटात येताच बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने अत्यंत सतर्कतेने व कौशल्याने बसचा वेग कमी करून ती एका अवघड वळणावर थांबवली.
… तर मोठा अनर्थ ओढवला असता
या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. बस नियंत्रणात आली नसती तर ती दरीत कोसळून मोठा अनर्थ ओढवला असता. या घटनेची माहिती मिळताच बोरघाट येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटीतील विद्यार्थ्यांना उतरवून सुरक्षित ठिकाणी हलवले. कर्जत डेपोतील वाहन दुरुस्ती कर्मचाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. एसटीची दुरुस्ती झाल्यानंतर ती रात्री उशिरा श्रीगोंद्याकडे रवाना झाली अशी माहिती कर्जत डेपोचे व्यवस्थापक देवेंद्र मुळे यांनी दिली.
कारचा भीषण अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाजवळ आज दुपारी 12 च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार समोरील अज्ञात वाहनावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यात चारजण जखमी झाले. कल्पना सैद, कविता शिंगोटे, वसंद सैद, लक्ष्मण शिंगोटे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.