हरभजनविरोधात मानहानीचा दावा, वैमानिकाने मागितली भरपाई

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जेट एअरवेजमधून निलंबित झालेल्या वैमानिक बर्न होस्लिन यांनी क्रिकेटपटू हरभजनसिंहवर मानहानी केल्याचा आरोप करत न्यायालयात दावा दाखल केला आहे. हरभजनने भरपाई म्हणून सुमारे ९६ कोटी रुपये द्यावे अशी बर्न होस्लिनची मागणी आहे.

हरभजन सिंह, गायक पुजा सिंह गुजराल आणि जतिंदर सिंह ३ एप्रिल रोजी चंदीगड-मुंबई विमानाने प्रवास करत असताना एक घटना घडली होती. या घटनेसंदर्भात हरभजन सिंहने लागोपाठ ट्विट करत जेट एअरवेजच्या वैमानिक बर्न होस्लिनवर वंशभेदाचा आणि दिव्यांग व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला होता. हरभजनच्या या ट्विटची जेट एअरवेजने गंभीर दखल घेत वैमानिक बर्न होस्लिनला तात्काळ निलंबीत केले होते.

निलंबित झालेल्या बर्न होस्लिनने आता हरभजनच खोटे आरोप करत असल्याचा दावा केला आहे. हरभजनने खोटा आरोप केल्यामुळे आपली नोकरी गेली आणि मानहानी झाली, असे बर्न होस्लिनचे म्हणणे आहे.