ब्रॅण्डेड, कापडी मास्कची क्रेझ धोकादायक, ‘एफडीए’ आयुक्तांचे राज्य सरकारला पत्र

कोरोनाच्या संकटातही लोकांनी डिझायनर मास्क, शर्टाला मॅचिंग मास्क, साडी आणि पैठणीला मॅचिंग मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे तर ब्रॅण्डेड वस्तूंचा शौक असणाऱयांनी ब्रॅण्डेड कंपन्यांचे मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य घरगुती कापडी मास्क वापरतात, पण या मास्कमुळे कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळत असल्याचे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या मास्कची मानके (स्डॅण्डर्ड) व किमती निश्चित करण्याची विनंती अन्न व औषध प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे.

परदेशात कोविडची दुसरी लाट आहे. दिल्लीसह इतर काही राज्यांत कोरोनाचा धोका वाढला आहे. मुंबईसह राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशासह राज्यात कोरोनाच्य दुसऱया लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मास्कच्या किंमतीवरील नियंत्रणाबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष व मास्क व सॅनिटायझरच्या किमती निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. त्यात ब्रँडेड मास्क व कापडी मास्कच्या किमती व मानकांचा प्रश्न उपस्थित केला आहे. दोन प्लाय, तीन प्लाय व एन 95 व्यतिरिक्त इतर वेगगेळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या कंपन्यांचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत.

राज्य सरकारने मास्कच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. पण सध्या ब्रँडेड कापडी मास्क व घरगुती कापडी मास्कसाठी कोणतीही मानके(स्डँडर्ड) नाही. या मास्कचा अंतर्भाव मास्कच्या किमतीबाबत जारी केलेल्या शासन निर्णयात नाही. सामान्य लोक कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कापडी मास्क वापरतात. पण या मास्कबाबत मानके निर्धारित नाहीत. मास्कचा वापर कोणत्या परिस्थितीत करावा याबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली नाहीत आणि या मास्कच्या किमतीवरही नियंत्रण नाही. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरच्य किंमती निश्चित केलेल्या समितीने या बाबी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती या पत्राक्दारे केली आहे.

गरज पडल्यास रेल्वे, विमानसेवा बंद – अस्लम शेख

दिल्ली आणि गुजरातमध्ये ज्याप्रमाणे कोरोना रुग्ण वाढतायत ते पाहता तिथली व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. तेथून येणाऱया प्रवाशांमुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यावर टास्क पर्ह्स काम करत आहे. गरज पडली एसओपी आणू किंवा रेल्वे, विमानसेवा बंद करू, असे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

मास्कचीही ट्रायल घेतात

हल्ली टेलरच्या दुकानांपासून रस्त्यावर फेरीवाल्यांकडे, तयार कपडय़ांच्या दुकानांमध्ये कापडी मास्कची विक्री होते. अनेकजण मास्कचीही ट्रायल घेतात. कपडय़ांवर, चेहऱयावर कसा दिसतो याची ट्रायल घेतात. मॅचिंग होत नसेल तर परत करतात. मात्र मास्कची ट्रायल अतिशय धोकादायक आहे.

लोकांनी कापडी, ब्रॅण्डेड मास्कपासून दूर रहावे. सध्या बाजारात चार रुपयांचे निळ्या रंगाचे मान्यताप्राप्त व मानकांमध्ये समावेश असलेले चांगल्या दर्जाचे मास्क आहेत. कापडी मास्कच्या आत हे चार रुपयांचे मास्क वापरावे. कारण कोणत्याही मास्कमध्ये शास्त्रीय पद्धतीचा लेअर असणे आवश्यक आहे.
– अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

आपली प्रतिक्रिया द्या