तरुणीने असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाच्या कानाखाली काढला आवाज

62

सामना ऑनलाईन । मुंबई

नोकरीच्या शोधात असलेल्या गिरगावमधील एका तरुणीने शुक्रवारी माझगाव येथे जबरदस्त कामगिरी केली. नोकरीचे आमिष दाखवून तिला भाऊचा धक्का येथे बोलावून कंपनी मालक तिच्याशी असभ्य वर्तणूक करू लागला तेव्हा अजिबात न घाबरता या भामट्याच्या सदर तरुणीने भररस्त्यात कानाखाली आवाज काढला आणि त्याला यलोगेट पोलिसांच्या ताब्यात देण्याची बहाद्दुरी दाखवली.

मनीषा (नाव बदललेले, 25) ही तरुणी गिरगाव येथे राहते. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱया मनीषाची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्यावर शिक्षणाबरोबरच नोकरी करण्याची नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, मैत्रिणीकरवी मनीषाला माझगाव येथे टेलिकॉनिक प्रेन आणि हायड्रा हिरिंग सिक्युरिटीचे व्यवसाय करणाऱया कलीम खान याचा नंबर मिळाला. त्यानुसार मी त्याला संपर्क साधला असता शुक्रवारी दुपारी कलीमने भाऊचा धक्का येथे बोलावले. नोकरी मिळेल या आशेपोटी मी तेथे गेली, पण त्याच्या मनात भलतेच होते. तो मला पैसे देऊ लागला तसेच खाणाखुणा करून असभ्य वर्तन करू लागला. हा प्रकार पाहून प्रचंड चीड आली. मी सरळ कलीमच्या कानाखाली आवाज काढला. नशिबाने तेथून यलोगेट पोलिसांची मोबाईल पाच ही गाडी जात होती. घडला प्रकार सांगताच अंमलदार पुष्पा गावीत आणि प्रशांत देशमुख यांनी कलीमच्या मुसक्या आवळल्या. मग पवार, मोरे, सायली तळेकर यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. कलीमविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु मनीषाने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद असून तिने दाखवलेल्या धाडसाला सॅल्यूट असल्याचे उपायुक्त रश्मी करंदीकर म्हणाल्या. कलीमच्या मोबाईलमध्ये मनीषाचे डीपीचे फोटो सेव्ह केल्याचे आढळून आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा कपिले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या