ब्राझीलचे तुफान आजपासून घोंगावणार!

‘सांबा’ नृत्याच्या लयीत फुटबॉल खेळणारा ब्राझील हा ‘नंबर वन’ संघ उद्या मध्यरात्री सर्बियाविरुद्धच्या लढतीने ‘जी’ ग्रुपमधून फुटबॉल वर्ल्ड कपमधील आपल्या अभियानास प्रारंभ करेल. सर्वाधिक पाच वेळा जगज्जेतेपदाचा झळाळता करंडक उंचावणाऱया ब्राझीलला 2002 नंतर विजेतेपदाची चव चाखता आलेली नाही. नेमारच्या नेतृत्वाखालील हा संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांचा दुष्काळ संपविण्याच्या इराद्याने कतारच्या स्वारीवर आलाय.

वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझीलने पात्रता अभियानात 14 विजय, तीन ड्रॉसह एकाही पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. गतवर्षी जुलैमध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या किताबी लढतीत अर्जेंटिनाकडून झालेल्या पराभवानंतर हा संघ आजपर्यंत अजेय आहे. ब्राझीलकडे सुपरस्टार नेमारसह रिचर्डसन, गॅब्रियल जीसस, विनिशियस ज्युनियर व रफिना यांच्यासारखे महारथी सेटर फॉरवर्ड खेळाडू आहेत. शिवाय ब्राझीलकडे 38 वर्षीय थिएगो सिल्वा, डानीलो व पॅसेमीरो अशी तगडी संरक्षण फळी आहे. 39 वर्षीय अनुभवी राइट बॅक संघासाठी लाभदायक ठरेल.

उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया
उरुग्वे व दक्षिण कोरिया हे संघ ‘एच’ गटातून फिफा वर्ल्ड कपमध्ये सलामीला भिडणार आहेत. दक्षिण कोरियाचा स्टायकर सेन ह्यूंग मिन या लढतीत डोळय़ाच्या दुखापतीमुळे एक सुरक्षा मास्कसह खेळणार आहे.

पोर्तुगाल विरुद्ध घाना
गुरुवारी होणाऱया पोर्तुगाल व घाना दरम्यानच्या लढतीवर सर्वांच्या नजरा असतील. कारण या लढतीत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार आहे. घानाकडे थॉमस पार्टे व मोहम्मद कुदुस असे प्रतिभावान खेळाडू आहेत.