बारावी पेपरफुटीवर परीक्षा संपल्यानंतरच कारवाई!

चौकशी सुरू; अहवाल आल्यानंतरच निर्णय, शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई – या वर्षी बारावीचे तब्बल चार पेपर फुटल्याच्या घटना घडल्या असल्या तरी या प्रकरणांतील दोषींवर कारवाई मात्र दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्यानंतरच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. सुरू असणाऱ्या परीक्षांमध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे नऊ विभागांत घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत या वर्षी मराठी, एसपी, गणित आणि बुक कीपिंग अशा चार विषयांचे पेपर परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉटस्ऍपवर आले होते. या घटना मुंबई विभागातून घडल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पेपरफुटीच्या तक्रारीनंतर मुंबई, वाशी पोलीस आणि सायबर सेलने सुमारे डझनभर संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील दोषी विद्यार्थी आणि इतरांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर परीक्षा संपल्यानंतर कारवाई करण्यात येईल. शिवाय या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संबंधितांचा चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच कारवाई करणे योग्य ठरेल.
– दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, मुंबई विभागीय मंडळ

आपली प्रतिक्रिया द्या