Breaking – इस्रो चंद्रावर माणूस पाठवणार, के. सिवन यांची माहिती

910
isro-moon
काल्पनिक फोटो

इस्रोच्या ‘चांद्रयान 3’ आणि ‘गगनयान’ मोहिमांची जोरदार तयारी सुरू आहे. यासंदर्भात माहिती देत असतानाच इस्रो चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहीम आखणार आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ‘नक्कीच एकदिवस इस्रो चंद्रावर माणूस पाठवले’, अशी प्रतिक्रिया इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. ‘मात्र इतक्यात त्याच्यावर काम सुरू करण्यात येणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

के. सिवन यांनी पत्रकारांसोबत बोलताना ‘चांद्रयान 3’ विषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘चांद्रयान 2’ मोहीम शेवटच्या टप्प्यात अयस्वी ठरली असली तरी इस्रोने बिलकूल हार मानलेली नाही. इस्रोच्या जिद्दीचे साऱ्या हिंदुस्थानकडून कौतुक करण्यात आले होते. हीच जिद्द दाखवत इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ‘चांद्रयान 3’ मोहिमेसंदर्भात बुधवारी नवी माहिती दिल्याने नागरिकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. ‘चांद्रयान 3’ मोहिमेची तयारी सुरू झाली असून अत्यंत जोमाने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ‘गगनयान’ मोहिमेविषयी बोलताना त्यांनी या मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते रशियामध्ये प्रशिक्षणासाठी जाणार असल्याची माहिती दिली. याआधी निवडण्यात आलेल्या चार जणांना जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रशियाला पाठवणार असे सांगण्यात आले होते. आता मात्र शेवटच्या आठवड्यात रशियात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी रशियच्या यानातून अंतराळात झेप घेतली होती. परंतु आता हिंदुस्थानातील अंतराळवीर हिंदुस्थानच्या यानातून झेपावतील, असेही त्यांनी अत्यंत अभिमानाने सांगितले.

अंतराळ विज्ञानाच्या माध्यमातून हिंदुस्थानवासीयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान’ या दोन महत्त्वपूर्ण मोहिमांसाठीची बरीच तयारी गेल्या वर्षीच करण्यात आल्याचे के. सिवन यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले होते. तसेच ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी सरकारची मंजुरी मिळाली असून या मोहिमेवर 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सिवन यांनी सांगितले. या मोहिमेवर कामही सुरू झाले असून चांद्रयान-3 चे स्वरूप, त्याचे विविध भाग चांद्रयान-2 प्रमाणेच असतील, असेही सिवन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या