एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात, दोन्ही पायलटसह 14 जणांचा मृत्यू, 15 गंभीर

2989

एअर इंडियाचे बोइंग 737 हे विमान केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर (कारिपूर एअरपोर्ट) दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या विमानात पायलट-को पायलटसह 190 प्रवासी होते. लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरल्याने ही दुर्घटना झाली.

या अपघातात विमानाच्या पायलट, को-पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 123 जखमी आहेत. यातील 15 गंभीर जखमी आहेत. दरम्यान, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, बचाव पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत 100 जणांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.

वंदे भारत मिशन अंतर्गत प्रवाशांना घेऊन हे विमान दुबईवरून 4 वाजून 45 मिनिटांनी उडाले होते. सायंकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान लँड होणार होते. मात्र लँडिंग दरम्यान हे विमान घसरले आणि दुर्घटनाग्रस्त झाले. यानंतर विमानाचे 2 तुकडे झाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी फोनवर संवाद साधला. तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या