ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानचं खातं उघडलं आहे. हिंदुस्थानची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे.

मीराबाई हिने एकूण 202 किलो वजन उचलत यापूर्वीचा ऑलिम्पिकचा विक्रम मोडीत काढला. चीनच्या होऊ झिहुई हिने 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं तर ताईपेईची ऐसाह विंजी सान्टिका हिने 194 किलो उचलून कांस्य पदक पटकावलं.

मीराबाई चानू ही वेटलिफ्टिंग या खेळात महिलांच्या 49 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. मीराबाई चानू हिने हिंदुस्थानला आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदकं जिंकून दिली आहेत. त्यामुळे मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचणार का, याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. त्या अपेक्षांना खरं उतरत मीराबाई चानू हिने रौप्यपदकावर मोहोर उमटवली.

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई हिचं अभिनंदन केलं आहे. ऑलिम्पिकची यापेक्षा सुंदर सुरुवात असूच शकत नाही. मीराबाईच्या कर्तृत्वाने हिंदुस्थानचं नाव उंचावलं आहे. तिचं यश सर्व देशवासीयांना प्रेरित करत राहील, अशा शब्दांत पंतप्रधानांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या