लॉकडाऊनमध्ये वाहने सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागितली, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील धक्कादायक प्रकार

3693

द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दोन वाहनांना सोडण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रकमेबाबत तडजोड करून या पोलीस अधिकाऱ्याने 15 हजार रुपये स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्याला पकडण्यासाठी सापळा रचल्याचा संशय आल्याने संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याच्या कारमधून भरधाव वेगात पसार झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री सव्वा नऊ वाजता उर्से टोलनाका येथे घडली.

या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात 41 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथकात महामार्ग पोलीस केंद्र वडगाव येथे कार्यरत आहे. तक्रारदार हे बाल रोडलाइन्स यांच्या हायड्रोलिक/एक्सएल गाडीवर चालक आहेत. तक्रारदार त्यांच्या गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नई वरून राजकोटकडे जात होते. तक्रारदार आणि त्यांचे सहकारी यांचे अशी दोन वाहने आरोपी लोकसेवकाने मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अडवून ठेवली. दोन्ही वाहने लॉकडाउन उठल्यानंतर (3 मे) नंतर सोडली जातील, असे आरोपीने तक्रारदार चालकाला सांगितले. दोन्ही गाड्या लगेच सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे 10 हजार असे एकूण 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता सापळा रचला. त्यावेळी आरोपीने 15 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. त्यानंतर या पोलिसाला संशय आल्याने लाचेची रक्कम टेबलवर फेकून खासगी कारमधून बेफाम गाडी हाकत फरार झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक टिळेकर, अंकुश माने, चालक पोलीस शिपाई चंद्रकांत कदम यांच्या पथकाने हा सापळा रचला होता

आपली प्रतिक्रिया द्या